Current affairs | Evening News Marathi
Current affairs 19 Marathi |
19 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
जम्मू-काश्मीर विधान परिषद विसर्जित करण्याचे आदेश
जम्मू व काश्मीरचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, तेथली 62 वर्षे जुनी विधान परिषद विसर्जित करण्याचे आदेश जम्मू व काश्मीर प्रशासनाने दिले आहेत. हे आदेश राज्य सरकारचे सचिव फारुक अहमद लोन यांनी दिले.
‘जम्मू-काश्मीर पुनर्गठन कायदा-2019’ मधल्या कलम 57 अन्वये जम्मू-काश्मीर विधान परिषद विसर्जित करण्यात आली. त्यामुळे विधान परिषदेतील सर्व कर्मचारी 22 ऑक्टोबरपासून सामान्य विभाग प्रशासनाकडून येणार्या सूचनांचे पालन करणार आहेत.
सूचनांचे स्वरूप
विधान परिषदेतल्या 116 कर्मचार्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडून येणार्या सूचनांचे पालन करावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
विधान परिषदेने वेळोवेळी खरेदी केलेली वाहने राज्याच्या वाहन विभागाच्या संचालकांकडे हस्तांतरित करा, तसेच विधान परिषदेची इमारत, त्यातील फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे संपत्ती विभागाच्या संचालकांकडे हस्तांतरित करा, असे या आदेशात म्हटले आहे.
पार्श्वभूमी
- दिनांक 1 सप्टेंबर 2019 या दिवशी लडाख आणि जम्मू-काश्मीर हे दोन नवीन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात येणार आहेत.
- केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 निष्प्रभ करून, जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्य आणि नोकर्यांसाठी दिला गेलेला विशेष दर्जा काढला होता.
- संसदेत कायदा मंजूर झाल्यानंतर 1957 साली 36 सदस्यसंख्या असलेली विधान परिषद स्थापन करण्यात आली होती. 87 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधान परिषद कार्य करीत होते.
प्रथम ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ कार्यरत
19 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2019 या काळात भारत आणि नेपाळ या देशांदरम्यान पहिली ‘बुद्धिष्ट सर्किट ट्रेन’ प्रवास करणार आहे. भारतीय रेल्वेच्या पुढाकाराने सादर करण्यात आलेली ही पहिली बौद्ध सर्किट ट्रेन आहे.ही रेलगाडी नवी दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकातून निघाली व तिथेच गाडीचा प्रवास संपणार. प्रवासादरम्यान गौतम बुद्धांच्या जीवनाशी संबंध असलेल्या भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांमधल्या महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली जाणार आहे.
प्रवासाबद्दल
- लुंबिनी (बुद्धांचे जन्मस्थान), बोधगया (आत्मज्ञान प्राप्तीचे ठिकाण), सारनाथ (बुद्धांचे पहिले प्रवचन) आणि कुशीनगर (बुद्धांच्या निर्वाणाची जागा) यासारख्या महत्त्वाच्या बौद्ध स्थळांचा या प्रवासात समावेश करण्यात आला आहे.
- गाडीमध्ये अधिक सुरक्षिततेसाठी वैयक्तिक डिजिटल लॉकर, पायाची मालिश करणारे, शॉवर, क्यूबिकल्स, स्वतंत्र सोफा बैठक, CCTV कॅमेरे, स्मोक डिटेक्शन अलार्म सिस्टम अश्या सोयी-सुविधा आहेत.
- गाडीत हायजेनिक किचन कार आणि डायनिंग कारची सुविधा आहे, ज्यामुळे प्रवासी ताजे गरम जेवणांची मागणी करू शकतात.
- प्रवासाचे व्यवस्थापन इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) करीत आहे.
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘प्रसाद’ (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि ‘स्वदेश दर्शन योजना’ सन 2014-15 मध्ये सुरू केली. देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा (circuit) प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे.
या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी आतापर्यंत 15 पर्यटन परिक्रमांची (circuit) ओळख पटविण्यात आलेली आहे. ते आहेत - बुद्धीष्ट परिक्रमा, ईशान्य परिक्रमा, तीर्थंकार परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरण परिक्रमा, वन्यजीवन परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, सूफी परिक्रमा, आध्यात्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment