Current affairs | Evening News Marathi
Current affairs 26 September Marathi |
26 सप्टेंबर 2019 करेंट अफेयर्स मराठी
अडवाणी-मेहता जोडीने 2019 IBSF जागतिक स्नूकर स्पर्धेचे सांघिक विजेतेपद जिंकले
मंडाले (म्यानमार) येथे खेळविण्यात आलेल्या ‘2019 IBSF जागतिक स्नूकर’ स्पर्धेच्या सांघिक विजेतेपदावर भारतीय जोडीने नाव कोरले. भारताच्या पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी हे विजेतेपद जिंकले.
या विजयासह अडवाणीच्या खात्यावर हे 23वे जागतिक जेतेपद जमा झाले आहे. तर आदित्यचे हे पहिले-वहिले विश्वविजेतेपद ठरले.
IBSF विषयी
आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स आणि स्नूकर महासंघ (IBSF) ही अशी संस्था आहे जी जगभरातल्या नॉन-प्रॉफेशनल स्नूकर आणि इंग्लिश बिलियर्ड्स या क्रिडाप्रकारांवर नियंत्रण ठेवते. 1971 साली “वर्ल्ड बिलियर्ड्स अँड स्नूकर कौन्सिल” या नावाने याची स्थापना झाली, ज्याचे 1973 साली नाव बदलून वर्तमान नाव देण्यात आले. संघटनेचे मुख्यालय दुबई (संयुक्त अरब अमिरात) येथे आहे.
16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार जाहीर
16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार जाहीर
16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग हिला राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी तातडीने पावले उचलण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल 'राईट लाईव्हलीहूड' या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या पुरस्काराला 'प्रतिनोबेल किंवा पर्यायी नोबेल' म्हणून ओळखले जाते. नोबेल शांतता पुरस्कारासाठीही ग्रेटाला नामांकन देण्यात आले आहे.
4 डिसेंबरला म्हणजेच नोबेल पारितोषिक वितरणाच्या सहा दिवस आधी स्टॉकहोम येथे हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
ग्रेटा थनबर्ग कोण आहे?
ग्रेटा थनबर्गने स्वतःची ओळख 16 वर्षांची पर्यावरणप्रेमी कार्यकर्ता असा करून दिला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी तिने गेल्या वर्षी म्हणजेच 2018 साली ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर तिने शुक्रवारी सतत आंदोलने केली आहेत, त्यामुळे वर्षभरात कितीतरी शुक्रवार ती शाळेतही जाऊ शकलेली नाही. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली आहे.
ग्रेटाच्या आंदोलनाला “फ्रायडेज फॉर द फ्युचर” असे नाव मिळाले असून हे आंदोलन विविध देशांमध्ये पोहोचले आहे. जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जापानमध्ये ही आंदोलने झाली आहेत. गेल्या शुक्रवारी जवळपास 100 देशांमध्ये हे आंदोलन झाले.
पुरस्कार प्राप्त करणारे इतर
यंदाचा 'राईट लाईव्हलीहूड' पुरस्कार मानवाधिकार कार्यकर्ते अमीनातौ हैदर (पश्चिम सहारा), वकील असलेले गुओ जिआन्मेई (चीन) आणि ब्राझीलचे हुटुकारा यानोमामी असोसिएशन ही संस्था आणि तिचे प्रमुख दावी कोपेनावा यांना देखील जाहीर झाला आहे.
पुरस्काराविषयी
स्विडिश-जर्मन नागरीक असलेले परोपकारी जकोब वॉन यूक्सकुल यांनी नोबेल पुरस्कारांपासून दुर्लक्षित राहिलेल्या लोकांना सन्मानित करण्यासाठी या पुरस्काराची सुरुवात केली होती. 1980 साली या पुरस्काराची सुरुवात झाली. बक्षीस म्हणून दरवर्षी चार विजेत्यांना प्रत्येकी दहा लक्ष क्रोनर (जवळपास 73 लक्ष रूपये) दिले जातात.
No comments:
Post a Comment