Current affairs | Evening News Marathi
उज्जीवन लघू वित्त बँकेची ‘किसान सुविधा कर्ज’ योजना
उज्जीवन लघू वित्त बँक (USFB) या संस्थेने आपली ‘उज्जीवन किसान सुविधा कर्ज’ योजना सादर केली आहे, ज्यामधून लहान आणि सीमांत शेतकर्यांना आर्थिक पत सेवा देणार.
अश्या योजनेमुळे, उज्जीवन लघू वित्त बँक ही देशातली पहिली लघू वित्त बँक ठरली आहे, जी कृषी आणि संबंधित पूरक क्रियाकलापांसाठी आनुषंगिक मुक्त कर्ज देत आहे. ही कर्ज योजना तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि ओडिशा या चार राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेमधून एका व्यक्तीला 60,000 ते 2 लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज प्रदान केले जाणार.
हे कर्ज दुग्ध खरेदी व व्यवस्थापन, कापणीनंतरची वाहतूक, शेतकी उपकरणांची खरेदी, मत्स्यपालन, शेळीपालन, रेशीम उत्पादन, फुलांची शेती, मशरूम शेती तसेच नारळाच्या शेतीची देखरेख आणि भाजीपाल्याची शेती अश्या क्षेत्रात विकास कामांसाठी उपलब्ध आहे.
उज्जीवन लघू वित्त बँक (USFB)
फेब्रुवारी 2017 मध्ये या बँकेनी आपल्या बँकिंग कार्यांना सुरूवात केली. बेंगळुरू येथे प्रथम शाखा उघडण्यात आली. आज 24 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँकेच्या 450 पेक्षा अधिक शाखा आहेत. या बँकेनी औपचारिक बँकिंग व्यवस्थेबाहेर मोठ्या प्रमाणात असलेल्या मागास ग्राहकांना आधार देण्यात यशस्वीरित्या बाजारपेठ उभी केली आहे.
Current affairs | Evening News Marathi
पंजाब राज्याने ‘स्मार्ट खेडे मोहीम’ या योजनेला मान्यता दिली
दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या पंजाब राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात ‘स्मार्ट खेडे मोहीम’ (Smart Village Campaign) राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामे पूर्ण केली जात आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाने 384.40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 14 वा वित्तीय आयोग आणि मनरेगा कार्यक्रमामधून या योजनेसाठी वित्तपुरवठा केला जाईल.
या योजनेच्या अंतर्गत उपायुक्त अधिकारी विभाग विकास, पंचायत अधिकारी व इतर प्रादेशिक विभागांकडून प्रस्ताव प्राप्त करतील. 25 लक्ष रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना उपायुक्त आणि अतिरिक्त उपायुक्त (विकास) यांच्याकडून मान्यता दिली जाईल आणि 25 लक्ष रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांना संयुक्त विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीकडून मंजुरी देण्यात येईल.
Current affairs | Evening News Marathi
राष्ट्रीय रस्ते सुरक्षा आठवडा 2019: 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी
भारतात 4 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या काळात 30वा ‘राष्ट्रीय रस्ते सुरक्षा आठवडा’ (National Road Safety Week) पाळला जाणार आहे. उद्घाटनप्रसंगी नवी दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था आणि सरकारी व उद्योगांमधील रस्ते सुरक्षेच्या संबंधित असलेले भागधारक यांचा सहभाग असेल.
या आठवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार. त्यामध्ये सुरक्षेसंबंधी उदयोन्मुख कल, रस्ते सुरक्षेसंबंधी अभियांत्रिकी, वाहनाचा विमा, आपातकालीन व्यवस्था, युवांची भूमिका यासंबंधी कार्यशाळा आणि परिसंवाद तसेच रस्ते सुरक्षेसंबंधी कॉर्पोरेटची भूमिका याविषयी उद्योग/कॉर्पोरेट परिषदा आयोजित करणे.
याशिवाय एक मोटारकार रॅली देखील चालवली जाणार, ज्यामधून नियोजित प्रवास कार्यक्रमामधून भारतभर प्रवास करून पुढे बांग्लादेश आणि म्यानमार या दोन शेजारी देशांना भेट दिली जाईल. महात्मा गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमीत्त आयोजित केली गेलेली ही रॅली गांधीजींच्या जीवनाशी जुळलेल्या भारतामधील ऐतिहासिक ठिकाणांना भेट देत, बांग्लादेशाच्या ढाका शहराकडे जाणार आणि 24 फेब्रुवारीला म्यानमारमधील यांगून शहरात त्याचा समारोप होईल. या प्रवासात सुमारे 7250 किलोमीटरचे अंतर कापले जाईल.
Current affairs | Evening News Marathi
राजीव नयन चौबे: UPSC याचे नवे सदस्य
राजीव नयन चौबे यांनी दिनांक 1 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
तामिळनाडू संवर्गामधील भारतीय प्रशासकीय सेवेमधील अधिकारी असलेले चौबे यांनी आपल्या 35 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीच्या काळात केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
भारत सरकारचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) याची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. ही भारताची केंद्रीय निवड संस्था आहे. आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात. त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातील कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.
ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. हा आयोग कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयाच्या अखत्यारीत कर्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्य करतो.
Current affairs | Evening News Marathi
पश्चिम बंगालमधील अंदाल-माल्दा आणि खाना-संथिया या 294 किलोमीटरच्या रेल्वेचे विद्युतीकरण झाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 2 फेब्रुवारी 2019 रोजी पश्चिम बंगाल राज्यातील दुर्गापूर शहराला भेट दिली.
या दौऱ्यादरम्यान अंदाल-संथिया-पकूर-माल्दा आणि खाना-संथिया या एकूण 294 किलोमीटर लांबीच्या रेल्वे विद्युतीकरण पट्ट्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले. या विद्युतीकरणामुळे कोळसा, खडी आणि दगडांच्या चिपा यांची वाहतूक उत्तर आणि ईशान्य भारतात करणे सहज शक्य होणार आहे. याशिवाय, 20 किलोमीटर लांबीचा हिजली-नारायणगड रस्ता राष्ट्राला अर्पण करण्यात आला.
भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे. भारत सरकारच्या केंद्रीय रेल्वे खात्यातील विभाग असा रेल्वे विभाग हा भारतातील संपूर्ण रेल्वे जाळ्याचे नियोजन करतो. रेल्वे खात्याचे कामकाज कॅबिनेट दर्जाचे रेल्वेमंत्री पाहतात व रेल्वे विभागाचे नियोजन रेल्वे मंडळ करते.
भारतातील रेल्वेसेवेचा आरंभ सन 1853 मध्ये झाला. सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. सन 1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.
भारतात पहिली रेल्वेगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकी मध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर, मुंबई ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते.
1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) स्थापन झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.
आज व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.
Current affairs | Evening News Marathi
No comments:
Post a Comment