Current affairs | Evening News Marathi
Current affairs 10 November Marathi |
10 नोव्हेंबर 2019 करेंट अफेयर्स
‘IndAIR’: हवेची गुणवत्ता यासंदर्भातले देशाचे पहिले परस्परसंवादी ऑनलाइन व्यासपीठ
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI) या संस्थेनी ‘IndAIR’ (इंडियन एयर क्वालिटी इंटरएक्टिव रिपॉझिटरी) या नावाने हवेची गुणवत्ता याच्या संदर्भातले देशाचे पहिले परस्परसंवादी ऑनलाइन व्यासपीठ (भांडार) विकसित केले आहे.
भारतातली हवेची गुणवत्ता या विषयात अभ्यास करण्यासाठी आणि संशोधनांसाठी माहिती सहज उपलब्ध व्हावी हे उद्दीष्ट ठेवून हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
या डिजिटल व्यासपीठावर दिल्ली-NCR या प्रदेशाविषयी 262 शोधनिबंध आहेत, जे जगातल्या अश्या व्यासपीठांवर असलेल्या संख्येच्या सर्वाधिक आहे. येथे इंटरनेट-पूर्व काळातली सुमारे 700 स्कॅन केलेली सामग्री, 170 अहवाल, 1215 शोधनिबंध, 100 प्रकरणे आणि 2000 हून अधिक कायदे यांचा संग्रह भारतातल्या संशोधनाविषयी आणि कायद्याचा इतिहास पुरविण्यासाठी केला जाणार आहे.
NEERI विषयी
वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद - राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-NEERI) ही एक संशोधन संस्था असून ती भारत सरकारकडून अर्थसहाय्यित आहे. त्याची स्थापना 1958 साली नागपुरात झाली. NEERI केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे.
NEERI पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकी क्षेत्रातली एक अग्रणी प्रयोगशाळा आहे आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचा एक भाग आहे. NEERIच्या चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबई येथे पाच विभागीय प्रयोगशाळा आहेत.
हितेश देव सरमा: आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे नवे समन्वयक
आसाम राज्यात चाललेल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे नवीन समन्वयक म्हणून हितेश देव सरमा ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हितेश देव सरमा सन 1986च्या तुकडीतले आसाम नागरी सेवा (ACS) अधिकारी आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी NRC समन्वयक प्रतिक हजेला यांच्या बदलीचे आदेश दिले होते. प्रतिक हजेला ह्यांची मध्यप्रदेशात बदली झाल्यानंतर आसाम सरकारने सरमा ह्यांची नियुक्ती केली. ते 11 नोव्हेंबर 2019 रोजी पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
NRC काय आहे?
राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens -NRC) यामध्ये देशातल्या अधिकृत नागरिकांची नोंद होते. ज्या नागरिकांचे नाव NRCमध्ये नसते त्याना अवैध मानले जाते. NRCनुसार 25 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांना भारतीय मानले जात आहे.
NRC भारतीय नागरिकांच्या नावांची एक नोंदणी यादी आहे जी सन 1951 मध्ये तयार करण्यात आली होती. आसाममध्ये बांग्लादेशामधून अवैधपणे आलेल्या लोकांच्या प्रश्नावरुन सर्वोच्च न्यायालयाने NRC अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पहिली NRC यादी 1951 साली जाहीर केली गेली होती.
आसाममधल्या राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) याची अंतिम यादी 31 ऑगस्ट 2019 रोजी जाहीर करण्यात आली होती. त्या अंतिम यादीत 3,11,21,004 नागरिकांचा समावेश करण्यात आला होता तर 19,06,657 नागरिकांना यादीतून वगळण्यात आले होते. या यादीतून आसाममधल्या त्या नागरिकांना वेगळे केले जाणार आहे ज्यांनी 1971 सालानंतर बांग्लादेशातून बेकायदेशीरपणे राज्यात प्रवेश केला होता.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment