Current affairs | Evening News Marathi
Current affairs 15 October Marathi |
15 ऑक्टोबर 2019 करेंट अफेयर्स
जागतिक विद्यार्थी दिन: 15 ऑक्टोबर
2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) 15 ऑक्टोबर हा दिवस "जागतिक विद्यार्थी दिन" म्हणून जाहीर केला. डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा वाढदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात डॉ. कलाम यांच्या कर्तृत्वाचा तसेच वैज्ञानिक आणि राजकीय कारकीर्दीत शिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करतात.
डॉ. कलाम कोण आहेत?
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम (तामिळनाडू) येथे झाला. त्यांनी DRDO आणि ISRO बरोबर एरोनॉटिकल अभियंता म्हणून काम केले होते. ते भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. भारताच्या लक्ष्यभेदी क्षेपणास्त्रांच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 1998 साली जेव्हा भारताने अणुचाचणी घेतली तेव्हा त्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
सन 2002 ते सन 2007 या काळात त्यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले.
भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचे नोबेल जाहीर
भारतीय वंशाचे अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्थर डफलो (फ्रान्सच्या) आणि मायकेल क्रेमर (अमेरिकेचे) यांना यंदाचा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
'जागतिक दारिद्र्य निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टीकोन' या विषयावरील संशोधनात त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी पुरस्कार दिला जात आहे.
विजेत्यांविषयी
- 58 वर्षांचे अभिजीत बॅनर्जी यांचा जन्म 1961 साली मुंबईत झाला. त्यांनी कोलकाता विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1988 साली हार्वर्डमधून पीएचडी केली.
- 1990च्या दशकात क्रेमर यांनी केनियात प्रायोगिक दृष्टिकोनाचा मार्ग दाखविला आणि लवकरच त्याच्यात डफलो आणि बॅनर्जीही सामील झाले.
- 1972 साली फ्रान्समध्ये जन्मलेल्या एस्थर डफलो ह्या अर्थशास्त्राचा हा पुरस्कार जिंकणार्या द्वितीय क्रमांकाच्या महिला आणि सर्वात तरुण व्यक्ती आहेत.
- जागतिक गरिबी दूर करण्यासाठी तिघांनी केलेले संशोधन उपयुक्त ठरले. दोन दशकांच्या कालावधीत त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे विकासशील अर्थशास्त्राचे प्रारूप बदलले आहे. त्यामुळे या क्षेत्रात संशोधनाला आणखी वाव निर्माण झाला आहे.
नोबेल पारितोषिक
स्टॉकहोम (स्वीडन) येथल्या रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने ‘स्वेरिगेस रिक्सबँक प्राइज इन इकनॉमिक सायन्सेस इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल’ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराच्या रूपाने दिली जाणारी 90 लक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे साडे सहा कोटी रुपये) ही रक्कम संयुक्त विजेत्यांमध्ये समानरूपाने विभागली जाते. हा अधिकृतपणे नोबेल पुरस्कार नाही.
नोबेल पारितोषिक हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडनच्या आणि नॉर्वेच्या संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा सन्मान स्वीडनचे संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेच्या सन्मानार्थ सन 1895 पासून दिला जात आहे. पारितोषिकाचे वितरण विविध संस्थांकडून केले जाते. याचे विवरण खालीलप्रमाणे आहे:
- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडीश अकादमी ऑफ सायन्सेस, स्वीडन
- शरीरशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्ली, स्वीडन
- साहित्य: स्वीडिश अकादमी, स्वीडन
- शांती: हे पारितोषिक स्वीडनच्या संस्थेच्यावतीने नॉर्वे या देशातल्या नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.
Evening News, current affairs - Marathi, Evening News - Marathi, CURRENT AFFAIRS | करंट अफेयर्स,
No comments:
Post a Comment