Current affairs | Evening News Marathi
Current affairs 8 February 2019 Marathi | 8 फेब्रुवारी 2019 करंट अफेयर्स मराठी
थायलंडमध्ये ‘EGAT चषक 2019’ या स्पर्धेचे सुवर्णपदक मिराबाई चानूने जिंकले
भारताची महिला भारोत्तोलक सायखोम मिराबाई चानू हिने थायलंडमध्ये खेळल्या गेलेल्या ‘EGAT चषक 2019’ या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
मिराबाई चानू हिने 49 किलो वजन गटातून खेळताना 192 किलो वजन उचलत सुवर्णपदक मिळविले आहे. 24 वर्षीय चानूने स्नॅचमध्ये 82 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 110 किलो वजन उचलत पहिले स्थान पटकावले. या गटात जपानच्या मियाके हिरोमीने (183 किलो) रौप्य व पापुआ न्यू गिनीयाच्या लोआ डिका टौआने (179 किलो) कांस्यपदक मिळविले.
विदर्भाच्या संघाने सलग दुसर्यांदा रणजी करंडक जिंकला
विदर्भाच्या संघाने रणजी करंडक या प्रथम श्रेणीच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाला पराभूत करून लागोपाठ दुसऱ्या वर्षीही स्पर्धा जिंकली आहे.
लागोपाठ रणजी करंडक जिंकण्याचा विक्रम करणारा विदर्भ हा पाचवा संघ ठरला आहे. रणजीच्या अंतिम सामन्यात दोन्ही डावांत प्रत्येकी 5 गडी बाद करून विदर्भाच्या आदित्य सरवटेने चंद्रशेखर याच्या 1977–78 या 41 वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी केली.
रणजी करंडक
रणजी करंडक स्पर्धा भारतात खेळली जाणारी प्रथम श्रेणी आंतर्देशीय क्रिकेट स्पर्धा आहे. यात सध्या 37 संघ खेळतात. 1934 साली पहिल्यांदा ही स्पर्धा खेळली गेली. तर विजय हजारे करंडक स्पर्धेला ‘रणजी एक दिवसीय करंडक’ म्हणून देखील ओळखले जाते. ही देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा मर्यादित षटकांसह सन 2002-03 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर खेळली जात आहे. या स्पर्धेचे प्रसिद्ध भारतीय क्रिकेट विजय हजारे यांच्या नावावरून नामकरण केले गेले आहे. यामध्ये 27 संघ खेळतात.
रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात: RBI
दिनांक 7 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक पार पडली. त्यावेळी RBIचे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले गेले.
बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, रेपो दरात (repo rate) 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे,
- नवा रेपो दर – 6.25%
- नवा रिव्हर्स रेपो दर – 6%
या निर्णयामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होणार आहेत. सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. तसेच सध्या सुरु असलेल्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बँकेचा हप्ताही कमी होणार आहे.
अन्य ठळक बाबी
- यंदाच्या 2019-20 या आर्थिक वर्षात सकल स्थानिक उत्पन्नाचा (GDP) दर हा 7.4% राहण्याचा अंदाज आहे.
- महागाईचा दर 3.2% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पहिल्या सहामाहित हा दर ते 3.4% आणि तिमाहित 3.9% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाच्या रकमेत सुमारे 60 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी या कर्जाची मर्यादा 1 लक्ष 60 हजार रुपये झाली आहे.
RBI विषयी
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.
RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.
दिनकर गुप्ता: पंजाब राज्याचे नवे पोलीस महानिदेशक
दिनांक 7 फेब्रुवारी 2019 रोजी 1987 सालच्या बॅचचे IPS अधिकारी दिनकर गुप्ता यांनी पंजाब पोलीस विभागाचे महानिदेशक म्हणून पदाचा भार सांभाळला आहे.
गुप्ता यांची नियुक्ती सुरेश अरोरा यांच्या जागी करण्यात आली आहे. सुरेश अरोरा यांनी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली आहे.
मॅकेडोनियाने NATO गटाचा भाग बनण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली
दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजी उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) याच्या 29 सदस्य देशांनी नुकतेच नाव बदललेल्या मॅकेडोनिया या देशासह एक करार करीत NATOचा 30वा सदस्य देश म्हणून स्वीकारले आहे.
स्लोव्हेनिया, क्रोएशिया आणि मॉन्टेनेग्रो हे युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाचे अन्य तीन माजी देश सुद्धा NATOचे सदस्य आहेत.
उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO)
उत्तर अटलांटिक करार संघटना (North Atlantic Treaty Organization -NATO) ही दि. 4 एप्रिल 1949 रोजी उत्तर अटलांटिक कराराच्या आधारावर उत्तर अमेरिकेतल्या व युरोपीय राज्यांनी तयार केलेली आंतर-सरकारी सैन्य युती आहे. NATOचे मुख्यालय ब्रुसेल्स (बेल्जियम) मध्ये आहे. आता 30 देश या गटाचे सदस्य आहेत.
मॅकेडोनिया
मॅकेडोनिया हा दक्षिण यूरोप खंडातील मध्य बाल्कन बेटावर असलेला एक देश आहे. हा भू-परिवेष्टित देश आहे आणि याला कोसोवो, सर्बिया, बल्गेरिया, ग्रीस आणि अल्बानिया या देशांच्या सीमा लागलेल्या आहेत. स्कोप्जे हे या देशाचे राजधानी शहर आहे.
1990च्या दशकात युगोस्लाविया 7 देशांमध्ये विखुरले गेले, ते म्हणजे - बोस्निया आणि हर्जेगोविना, क्रोएशिया, मॅकेडोनिया, मॉन्टेनेग्रो, सर्बिया, स्लोव्हेनिया.
पूर्वीच्या युगोस्लाव्ह प्रजासत्ताकाच्या नावावरून 27 वर्षांपासून चालू असलेला वाद सोडविण्यासाठी ग्रीस आणि मॅकेडोनिया यांनी जानेवारी 2019 मध्ये अखेर त्यांच्यामधील ऐतिहासिक ‘प्रेस्पा’ करारास सहमती दिली. नव्या कराराच्या अंतर्गत, मॅकेडोनिया या देशाला अधिकृतपणे “उत्तर मॅकेडोनिया प्रजासत्ताक” (Republic of Northern Macedonia) म्हणून ओळखले जाणार. सध्या संयुक्त राष्ट्रसंघात हा देश ‘मॅकेडोनियाचा माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताक’ म्हणून औपचारिकपणे ज्ञात आहे.
जागतिक बँकेच्या अध्यक्ष पदासाठी अमेरिकेकडून डेव्हिड माल्पास यांचे नामांकन
जागतिक बँक (WB) याचे पुढील अध्यक्ष (प्रेसिडेंट) म्हणून अमेरिकेकडून डेव्हिड माल्पास यांचे पदासाठी नामांकन देण्यात आले आहे.
जागतिक बॅंकचे वर्तमान प्रमुख जिम योंग किम यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या अध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया चालविण्यात आली आहे. प्रथेप्रमाणे जागतिक बँकेचा प्रमुख हा अमेरिकेचा रहिवासी असावा लागतो. जर जागतिक बँक समूहाच्या संचालकांनी मतदानातून डेव्हिड माल्पास यांच्या नावाला स्वीकृती दिली तर ते बँकेचे प्रमुख बनतील.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) याचे व्यवस्थापकीय संचालक (MD) हे पद युरोपला देण्यात आले आहे.
जागतिक बँक (WB)
ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 सालच्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.
‘भारत-अमेरिका CEO मंच’ याची स्थापना
नवा ‘भारत-अमेरिका CEO मंच’ (US-India CEO Forum) याची स्थापना करण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या सरकारकडून देशाच्या खासगी क्षेत्रातल्या सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
त्यामध्ये मास्टरकार्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अजय बंगा आणि क्वालकॉम कंपनीचे CEO स्टीव्ह मोलेनकोफ यांचा देखील समावेश आहे. निवडलेल्या व्यक्ती दोन वर्षांच्या कार्यकालावधीसाठी मंचाचे सदस्य असतील.
दोन्ही देशांमधील व्यवसायिक आणि आर्थिक संबंधांमध्ये विश्वास आणि मजबूती आणण्याकरिता हे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. मंचाची पहिली बैठक दिनांक 14 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्लीत नियोजित करण्यात आली आहे.
संयुक्त राज्ये अमेरिका (USA/US/अमेरिका) हा उत्तर अमेरिकेतला एक देश आहे. वॉशिंग्टन डी.सी. हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि अमेरिकन डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
No comments:
Post a Comment