Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Sunday, November 19, 2017

    राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास' - डाॅ.सचिन जांभोरकर, नागपूर.

    Views
    'राणी पद्मिनी(पद्मावती)चा खरा इतिहास'

    डाॅ.सचिन जांभोरकर,
    नागपूर.

    आपणां सगळ्या भारतीयांना जीजाऊमांसाहेब,पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर,राणी लक्ष्मीबाई,भगिनी निवेदिता,सावित्रीबाई फुले,राणी मां गाईडिन्ल्यू आदि प्रातःस्मरणीय मातृदेवतांइतकीच वंदनीय व पूजनीय असणारी;देव,देश अन् धर्मरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहूति देवून बलिदानाचा अत्युच्च आदर्श प्रस्थापित करणारी चित्तोडची महाराणी पद्मिनी(पद्मावती) हिचा नेमका इतिहास काय आहे,हे कळावे या हेतूने हा लेखनप्रपंच.

             सुलतानी परंपरेप्रमाणे आपला काका व सासरा असणार्या आणि दिल्लीच्या गादीवरील खिलजी राजवंशाचा संस्थापक असणार्या जलालुद्दिन खिलजीचा कपटाने आणि अतिशय क्रूरपणे खून करुन,त्याचे मुंडके भाल्याच्या टोकात खूपसून पूर्ण सैन्यातून मिरवून,त्यानंतर आपले भाऊ व साळ्यांचे मुडदे पाडून 21 ऑक्टोबर 1296 रोजी अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीश्वर झाला.सत्तेसाठीचा रक्तपात आटोपून अल्लाउद्दिनने भारतातील इतर राज्यांवर आक्रमण करुन लूट मिळवण्याचे सत्र सुरु केले.चित्तोड(इ.स.1303),गुजरात(1304),रणथंबोर(1305),मालवा(1305),सिवाना(1308),देवगिरी(1308),वारंगल(1310),जलोर(1311),द्वारसमुद्र(1311)आदि राज्यांवर आक्रमणे करुन अल्लाउद्दिनने परमार,वाघेला,चामहान(चौहान),यादव,काकाटीय,होयसाळ,पांड्य आदि साम्राज्ये उद्ध्वस्त केली. हजारोंचा नरसंहार केला,लाखोंचे धर्मपरिवर्तन केले,कोट्यवधींच्या संपत्ती व हत्ती-घोड्यांची लूट केली आणि आमच्या अगणित माताभगिनींचा शीलभंग करुन त्यांना आपल्या जनानखान्यात भरती केले वा बाजारात विकण्यास्तव गुलाम बनवून नेले.इतिहासकारांच्या लेखण्यांना लिहीतानाही लाज वाटेल इतके रानटी व सैतानी अत्याचार अल्लाउद्दिन व त्याच्या सैनिकांनी आम्हां भारतीयांवर केले. सैतानालाही लाज वाटेल असा हा 'इतिहासप्रसिद्ध' अल्लाउद्दिन खिलजी.

            अल्लाउद्दिन दिल्लीच्या गादीवर असतांना मेवाडात रावळ वंशाचा राणा रतनसिंह गादीवर होता व चित्तोडगड ही त्याची राजधानी होती.आणि रतिप्रमाणे अद्भूत,आरसपानी अशा लावण्याची खाण असलेली पद्मिनी मेवाडची महाराणी होती.सिंहली(श्रीलंकेचा ?)राजा गंधर्वसेन व राणी चंपावतीची रुपगर्विता राजकन्या असणारी पद्मिनी लहानपणापासून युद्धकौशल्यात निपूण होती.तिच्या स्वयंवराचा पण असा होता की जो कोणी तिने निवडलेल्या सैनिकाला लढाईत हरवेल,त्याच्याच गळ्यात ती वरमाला घालेल.आणि असे म्हणतात की तो सैनिक म्हणजे स्वतः पद्मिनीच असे.तर असा पण जिंकून राणा रतनसिंहाने पद्मिनीला वरले.रतनसिंह आपल्या प्रजाहितदक्ष राज्यकारभारासाठी आणि पद्मिनी आपल्या रुपासाठी विश्वविख्यात होते.

            रतनसिंहाच्या दरबारी राघव चेतन नावाचा एक कलाकार होता.कसल्यातरी गुन्ह्यासाठी राण्याने राघव चेतनला अपमानित करुन दरबारातून हाकलून दिले.सूडाग्निने पेटलेला राघव चेतन दिल्ली राज्यातील एका वनात जावून बसला जेथे खिलजी नियमितपणे शिकारीला येत असे.एके दिवशी खिलजीचे शिकारी टोळके येताना पाहून राघव चेतनने सुंदर बासरी वाजवणे सुरु केले.बासरीचे सूर ऐकून अल्लाउद्दिनने त्याला आपल्यासमोर हजर करण्यास सांगितले.त्यावेळी त्याने राणी पद्मिनीच्या अनुपम सौंदर्याचे रसभरित वर्णन करुन सांगितले की,"तुझ्यासारख्या पराक्रमी पुरुषाच्या जनानखान्यात पद्मिनी नसणे हा तुझ्या पराक्रमाचा अपमान आहे."हे ऐकून खिलजीच्या व्याभिचारी व लंपट मनात पद्मिनीच्या प्राप्तीची इच्छा बळावली.आणि पद्मिनीसाठी खिलजीने जानेवारी 1303मध्ये चित्तोडगडावर स्वारी केली व गडाला वेढा घातला.राजपूतांच्या चिवट प्रतिकारामुळे आठ महिने होवूनही खिलजीला काहीच यश मिळत नव्हते.तेंव्हा त्याने रतनसिंहाकडे निरोप पाठवला की ,"मला जर राणी पद्मिनीचे दर्शन करविण्यात आले,तर मी दिल्लीला निघून जाईन." प्रजाहितास्तव राण्याने हे मान्य केले.परंतु यामागील कुटिल डाव ओळखून राणी पद्मिनीने स्वतः समोर न जाता आरशातून खिलजीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवण्यात यावे,असे सूचविले.त्याप्रमाणे खिलजीला पद्मिनीचे प्रतिबिंब दाखवण्यात आले अन् कपटी,लंपट खिलजी राणीचे रुप पाहून आणखीनच चेकाळला.'अतिथी देवो भव' या भारतीय मूल्याचे पालन करण्यास्तव (परंतु देश-काल-पात्राचा विवेक न केल्यामुळे जी आपल्याच अंगावर उलटून अनेकदा आपली 'सद्गुणविकृती' ठरली) रतनसिंह गडाच्या दरवाजापर्यंत गेला.मात्र खिलजी व त्याच्या सैनिकांनी कपटाने राजाला कैद करुन खाली आपल्या पाडावात नेले आणि निरोप पाठवला की ,"राणा जीवंत हवा असेल तर पद्मिनीला आमच्या स्वाधीन करा."
       
             गडावर सैनिकी खलबतं झडलीत. आणि गडावरुन निरोप गेला की,"राणी पद्मिनी तिच्या पन्नास दासींसमवेत अल्लाउद्दिनच्या डेर्यात दाखल होईल,पण त्याबदल्यात राणा रतनसिंहास सोडून देण्यात यावे." ठरल्याप्रमाणे राणी व तिच्या दासी एका-एका पालखीत व त्या पालखी उचलणारे चार-चार पालखीचे भोई खिलजीच्या डेर्यात दाखल झाले.राणी पद्मिनीची पालखी खिलजीच्या शामियान्यासमोर थांबली.राणा रतनसिंहाला मोकळे करुन घोड्यावर बसवण्यात आले.पद्मिनीच्या पालखीतून एक स्त्री उतरली.अन्य पन्नास पालख्यांतून पन्नास दासीही उतरल्या. संकेत झाला.आणि....आणि हे काय?क्षणात पद्मिनी, त्या दासी व त्या भोयांच्या हातात पालखीत लपवून ठेवलेल्या तलवारी तळपायला लागल्या.दगा झाला होता तर!राणीचा मामा गोराच पद्मिनीचा वेश घेवून आणि त्याचा पुतण्या बादल(ही गोरा-बादलची काका-पुतण्याची जोडगोळी राजस्थानी लोकगीतांमध्ये फार प्रसिद्ध आहे.)काही निवडक सैनिकांना घेवून स्त्रीवेश धारण करुन खिलजीच्या डेर्यात घुसले होते.काही कळायच्या आतच सपासप कत्तल सुरु झाली व भूमाता उष्ण शत्रूशोणिताचे पान करुन तृप्त व्हायला लागली.गोरा तर खुद्द अल्लाउद्दिनच्या तंबूत शिरला व त्याची गर्दन उडवणार तो त्याने आपल्या दासीला समोर केले.स्त्रीवर वार न करण्याच्या राजपूत बाण्यामुळे गोरा थांबला अन् मागून आलेल्या खिलजीच्या सैनिकांनी गोराचे मुंडके धडावेगळे केले.आपल्या स्वामीचे प्राण वाचविण्यासाठी गोराने हौतात्म्य पत्करले.बादल व अन्य राजपूत सैनिक आपल्या राण्याला घेवून झपाट्याने गडावर निघून गेले अन् खिलजी हात चोळत राहिला.
          
          आता मात्र झालेल्या प्रकाराने डिवचलेला हा विषारी भुजंग त्वेषाने चालून गेला.काही दिवस गड झुंजविल्यानंतर गडावरील रसद संपत आली आणि अंतिम युद्धासाठी राणा रतनसिंह व राजपूत वीर सिद्ध झाले.25 ऑगस्ट 1303 रोजी गडाचे दरवाजे उघडून, 'जय एकलिंग,जय महाकाल' चे नारे देवून राजपूत सेना खिलजीच्या सेनासागराशी भिडली.परंतु संख्याबळात कमी असल्यामुळे लढाईचा अपेक्षितच निर्णय आला.दहा-दहा सुल्तानी सैनिकांना लोळवून एक-एक राजपूत रणभूमीरुपी मातेच्या चरणी अर्पण होवू लागला.लढाई संपली.राण्यासहित सर्व राजपूत मारल्या गेले.अन् वखवखलेले सुल्तानी लांडगे आपल्याला सोळा हजार राजपूत जनानींची शिकार करायला मिळणार,म्हणून गडात घुसले.
           
           पण गडावर शिरताच पाहतात तर काय,एकही स्त्री दिसेल तर शपथ.थोडे पूढे जावून चित्तोडगडावरील जगप्रसिद्ध 'विजयस्तंभ' ओलांडल्यावर लागणार्या विस्तीर्ण मैदानावर,जिथे आज 'जौहर स्थल' म्हणून पाटी लागलेली आहे,तिथे जावून पाहतात तर काय,अनलज्वाला आकाशाला भिडताहेत.राजपूतांच्या पराभवाची वार्ता मिळताच, खिलजीचे सैन्य गडावर शिरण्यापूर्वीच राणी पद्मिनी व सोळा सहस्र वीरांगनांनी ज्या अग्निसाक्षीने आपल्या प्राणनाथांना वरले होते,त्याच अग्नित उड्या घेतल्या.स्वतःच्या शीलाचे व देव,देश अन् धर्माचे रक्षण करण्यास्तव या सोळा हजार तेजस्वी अग्निशलाका अग्नितच जळून भस्म झाल्यात.आईला मुलींच्याच रक्ताचा अभिषेक घडला.रणभूमीला रणरागिणींच्याच देहाच्या माला अर्पित झाल्या.अन् चित्तोडगडाने अनुभवला एक अलौकिक सोहळा, 'जोहाराचा सोहळा'.तसे चित्तोडगडाने यानंतरही दोन मोठे जोहार अनुभवलेत,पण हा जोहार युगानुयुगे या देशाला प्रेरणा देणारा ठरला.
           
           लढाई संपल्यावर सुमारे 30,000 निष्पाप नागरिकांची अल्लाउद्दिनने कत्तल केली,असे त्याच्याच दरबारातील लेखक अमिर खुस्रोने लिहून ठेवलेय.तसेही प्रत्येक युद्ध आटोपल्यावर तेथील निःशस्त्र व निष्पाप नागरिकांची कत्तल करुन,त्यांच्या मुंडक्यांचे पहाड रचून त्यापुढे बसून मदिराप्राशन करणे,हा अल्लाउद्दिनचा आवडता छंद होता,असे म्हणतात.आणि म्हणूनच अशा क्रूर,रानटी श्वापदाचे थोडेही महिमामंडन भारतीय जनमानस कधीही स्वीकार करु शकत नाही.आणि आम्हां सार्या भारतीयांना मातृवत् पूजनीय असलेल्या महाराणी पद्मिनीच्या चारित्र्यावर यत्किंचितही शिंतोडे उडवलेलेही आम्हांला चालू शकत नाही.अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या गोंडस नावाखाली आणि गल्लाभरु मनोरंजनासाठी आपल्या राष्ट्रीय आदर्शांचा असा अपमान,भारत कधीही सहन करणार नाही.
          
          नुकतेच संजय लीला भन्साळीने मुलाखतीत सांगितलेय की पद्मिनी व अल्लाउद्दिनबाबत काहीही आक्षेपार्ह असे चित्रपटात दाखविण्यात आलेले नाही.आशा करु या की भन्साळी खरे बोलतोय.आपल्या सगळ्यांना या चित्रपटातून खरा आणि यथातथ्य असाच इतिहास बघायला मिळेल,या आशेसह भन्साळीला आणि आपणां सगळ्यांनाही या चित्रपटासाठी शुभेच्छा.

    शेवटी राजपूतान्याच्या गौरवशाली इतिहासातील जोहाराचे हे सोनेरी पान संपवतांना एवढेच म्हणावेसे वाटते-

    ये हैं अपना राजपूताना,नाज इसे तलवारोंपे

    इसने सारा जीवन काटा बरची-तीर-कटारोंपे ।
    ये प्रतापका वतन बना हैं आजादी के नारोंपे
    कूद पडी थी यहाँ हजारों पद्मिनीयां अंगारोंपे ।।
    गूंज रहीं हैं कण-कण से कुर्बानी राजस्थान की
    इस मिट्टी से तिलक करों,ये धरती हैं बलिदान की।।
    ।।वन्दे मातरम्।वन्दे मातरम्।।


          ।।भारत माता की जय।।

    No comments:

    Post a Comment