Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Saturday, September 23, 2017

    आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉईड यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...

    Views

    ------------------------------------------
    ‘स्वप्नात आपल्याला काय दिसतं याचा अर्थ लावणं हा मार्ग आपण बेसावध किंवा झोपेत असताना आपल्या मनात काय सुरू असतं हे समजून घेण्यासाठी खूप चांगला आहे’ असं सिग्मंड फ्रॉईड (१८५६-१९३९) म्हणे. त्याच्या मानसशास्त्रावरच्या संशोधनानं अख्या जगात फार खळबळ माजवून दिली होती. आजही मानसशास्त्र म्हटलं की लोकांना पहिली आठवण येते ती फ्रॉईडचीच! ज्या माणसांना लहानपणी त्यांची आई आत्मविश्वास देत नाही. उलट त्यांचं खच्चीकरण करत राहते त्या मुलांना मोठेपणी अनेक मानसिक प्रश्नांना सामोरं जावं लागतं, असा दावा फ्रॉईडनं आपल्या संशोधनातून केला. यासाठी त्यानं स्वत:चंही उदाहरण घेतलं होतं. फ्रॉईड लहान असताना त्याची आई त्याचं भरभरून कौतुक करायची आणि त्याच्या चुका मोठ्यानं माफ करायची. आपलं मन आनंदी आणि खंबीर बनण्यात याचा अतिशय मोठा वाटा होता असं ते नेहमी म्हणायचे. मुलांना हिडीसफिडीस करून त्यांचं मन अतिशय कमकुवत बनवणाऱ्या आयांची उदाहरणंही तो द्यायचा. पण आपल्या वडिलांशी मात्र त्याचं नातं जरा वेगळंच होतं असं मत त्यानंच नंतर त्याच्या अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षांमधून मांडलं.

    शाळेत फ्रॉईड हा अतिशय बुद्धिमान होता. तो हिब्रू, ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, आणि इंग्रजी अशा भाषा भराभर शिकला. पण हे सगळं असूनही त्याला आपल्या आयुष्याची दिशाच सापडत नव्हती! १८७३ साली व्हिएन्नाच्या विद्यापीठात त्यानं वैद्यकशास्त्र शिकण्यासाठी प्रवेश घेतला खरा, पण त्यात त्याचं फारसं मन लागेना. त्यातच आपण डॉक्टर होऊन वैद्यकीय व्यवसाय करावा अशी त्याची इच्छाच नव्हती. त्याला तर संशोधनच करत राहायचं होतं. नशिबानं त्याला एका शरीरशास्त्रज्ञाकडून माणसाच्या मेंदूविषयी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आपल्या मेंदूच्या आतल्या सगळ्या घडामोडी किंवा हालचाली या शारीरिक आणि रासायनिक संकल्पनांमधून पूर्णपणे समजून घेणं शक्य असतं हा विचारही त्याच्या मनावर कोरला गेला. माणसाचं मन हे ‘लिबिडो’ नावाच्या अदृश्य मानसिक शक्तीच्या प्रवाहामुळे सतत एकापाठोपाठ एक विचार करत राहतं असंही त्यानं म्हणून ठेवलंय.

    फ्रॉईड वयाच्या पंचविशीत मार्था बर्नेस नावाच्या एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडला होता. त्या दोघांना लग्न करायचं होतं. पण फ्रॉईडची संशोधनात होणारी कमाई दोघांचा संसार व्यवस्थित चालवू शकण्याइतकी नव्हती. पुढच्या ४ वर्षांमध्ये फ्रॉईडनं तिला सुमारे ९०० प्रेमपत्रं लिहिली! दीर्घ प्रतिक्षेनंतर १८८६ साली त्या दोघांचं लग्न झालं. ते ५१ र्वष टिकणारं होतं, आणि त्यांना सहा मुलं होणार होती. लवकरच मानसशास्त्रावर तो हुकूमत गाजवायला लागला. आता त्याला कोकेनविषयी कळालं. त्यानं अनेकांना त्यांच्या रोगांमुळे होणारं दु:ख विसरण्यासाठी कोकेनचं सेवन करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली.

    १८८६ साली फ्रॉईड व्हिएन्नामध्ये परत आला आणि त्यानं मेंदूच्या विकारांवर उपचार करण्यासाठी आपला स्वत:चा दवाखाना उघडला. पण सुरुवातीला त्याची मतं कुणाला फारशी पटायची नाहीत. जोसेफ ब्रूयर नावाचा एक मानसोपचारतज्ज्ञ मात्र याला अपवाद होता. मग फ्रॉईड आणि ब्रूयर यांनी मिळून बेभान होणाऱ्या हिस्टेरिक रुग्णांना असं का होतं याचा खोलात जाऊन अभ्यास केला. त्यावर १८९५ साली त्या दोघांचं एक पुस्तकही प्रकाशित झालं. याच काळात फ्रॉईडनं त्याची आजही आदरानं वापरलेली मानसिक रोगांवर केल्या जाणाऱ्या उपचारांची पाळंमुळं रोवली. माणसाच्या मनाचा एक भाग नेहमीसारखा विचार करत नसतो. त्या भागावर कुठला तरी परिणाम झाला की तो भ्रमिष्टासारखा वागायला लागतो ही फ्रॉईडच्या विचारांची मूळ दिशा होती.

    अनेक रुग्णांना तपासून त्यानं त्यांचं विश्लेषण केलं आणि त्यासंबंधीची माहिती विस्तारानं लिहून ठेवली. या सगळ्या काळात तो मानसिक संतुलन ढळलेल्या लोकांना मुद्दाम त्यांना हवं तसं बोलू देत राही. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की इतरांना जरी अशा लोकांची बडबड निर्थक आणि असंबद्ध वाटत असली तरीही प्रत्यक्षात अनेकदा वस्तुस्थिती बरोबर याच्या उलटी असते. या बडबडीतून त्या माणसाच्या आठवणी, अनुभव, स्मृती, आणि त्याचा त्याच्या वागण्या-बोलण्यावर होणारा परिणाम यांच्याविषयीचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे फ्रॉईडच्या हाती आले. आपल्याला ‘आपलं मन आपल्या पूर्णपणे ताब्यात आहे’ असं नेहमी वाटत असतं. हा केवळ भास असतो, असं मत फ्रॉईडनं बनवलं. कारण हा भास नसेल तर कुठलाच माणूस वेडय़ासारखा वागला नसता.
    कुणाचाच आपापल्या मनावरचा ताबा गेला नसता. याचाच अर्थ आपल्याला जाणवत असलेल्या भावना आणि संवेदना या आपल्या मेंदूमध्ये सुरू असणाऱ्या प्रक्रियांपैकी थोडय़ाच गोष्टी असतात. हे सोडून आपल्या मनात अनेक गोष्टी सुरू असतात. दाबलेल्या भावना आणि घाईघाईत दामटून आणलेलं मानसिक संतुलन या गोष्टी अधूनमधून उफाळ्या मारुन बाहेर येत राहतात, असंही मत त्यानं मांडलं.

    आपल्या मनाचे ‘इड’, ‘ईगो’, आणि ‘सुपरईगो’ असे तीन भाग असल्याची कल्पना फ्रॉईडनं मांडली. यातल्या ‘इड’चं काम हे आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या इच्छा आणि त्या पूर्ण कशा करायच्या याचं व्यवस्थापन करते. ‘ईगो’चं काम हे ‘इड’मध्ये सतत उत्पन्न होणाऱ्या इच्छा आणि वास्तव यांच्यामधली दरी सतत भरून काढणं हे असतं. ‘सुपरईगो’चं काम हे ‘ईगो’वर लक्ष ठेवणं हे असतं. या सगळ्याचं मूळ लैंगिक भावनांमध्ये असतं, असं अतिशय महत्त्वाचं मतही फ्रॉईडनं मांडलं. ‘आपण कुठल्याही रुग्णाचा किंवा कोणत्याही केसचा अभ्यास करत असलो तरीही यात लैंगिक भावनांचा समावेश असतोच’ असं त्यानं लिहून ठेवलं होतं. आपल्या स्वत:च्या आणि सगळ्या रुग्णांचा अभ्यास केल्यावर त्यानं ‘कुठल्याच वयात माणूस पूर्णपणे निरागस नसतो’ असं म्हणून मोठी खळबळ उडवून दिली! अगदी तान्ह्या बाळानं दूध पिण्यासाठी आईचे स्तन शोधण्यापासून मोठं झाल्यावर (अनेकदा) प्रेमात पडणं इत्यादी सगळ्या गोष्टींचा प्रवास अगदी आखून दिल्यासारखा असतो, आणि त्यात माणसाची सतत नवनवे मार्ग शोधून आपल्या इच्छा पूर्ण करायची धडपड सतत सुरू असते; असं मत त्यानं मांडलं. मुलांविषयीच्या त्याच्या मतांनुसार मुलांच्या वयाच्या पाचव्या वर्षांच्या आधी कधी तरी प्रत्येक मुलगा आपल्या आईवरच्या उत्कट प्रेमात आपले वडील भागीदार असल्याची समजूत करून घेतो, आणि त्यांचा त्यामुळे द्वेष करायला लागतो! पण आपल्यापेक्षा आपला ‘प्रतिस्पर्धी’ जास्त ताकदीचा (!) असल्याचं लक्षात आल्यामुळे मग तो मुलगा त्याची आईकडे बघायची नजर बदलतो, वडिलांबरोबर ‘जमवून घेतो’, आणि मोठं झाल्यावर आपल्या दबल्या गेलेल्या लैंगिक भावना दुसऱ्या बाईच्या संदर्भात जागृत करतो असं फ्रॉईडनं सांगितलं! एका स्त्री रुग्णाची तपासणी करत असताना त्याला हे सगळं ठळकपणे दिसलं. त्या बाईला तिच्या बहिणीच्या नवऱ्याविषयी आकर्षण वाटत असे. नेमकी ती बहीण वारली. त्यामुळे आता पुन्हा तिचा विधुर नवरा आता आपल्याला मिळवता येईल का या ध्यासानं ती हैराण झाली होती आणि तिला वेडाचे झटके वगैरे यायला लागले होते. तिच्याकडे बघणाऱ्यांना हे का होतं हे अजिबात समजत नव्हतं. पण फ्रॉईडनं तिला अनेक प्रश्न विचारून बोलतं केलं आणि त्यातून ही माहिती बाहेर पडली. यामुळे बहुतेक सगळ्या मानसिक रुग्णांचा विकार हा हस्तमैथुन, लैंगिक भावना दाबून ठेवणं इत्यादी गोष्टींशी निगडित असतो असं त्याचं मत झालं. सुरुवातीला स्त्री रुग्णांना झालेला मानसिक विकार हा त्यांच्या लहानपणी त्यांच्या वडिलांनीच त्यांच्यावर केलेल्या आणि दाबून टाकलेल्या लैंगिक अत्याचारांमुळे होतो असं त्याचं मत बनलं होतं. पण नंतर ते बदलून माणसाच्या मनात वारंवार उफाळून येणाऱ्या आणि इलाज नसल्यानं दाबून ठेवलेल्या लैंगिक भावनांमुळे असं होतं असं त्यानं ठरवलं.

    १८९५ सालच्या आपल्या पुस्तकात फ्रॉईडनं ही सगळी मतं मांडली. पुढची अनेक र्वष त्यानं याच संदर्भात असेच सनसनाटी निष्कर्ष काढणारी पुस्तकं आणि प्रबंध लिहिले. त्यांच्यापैकी आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ उलगडून दाखवणारं ‘द इन्टरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’ हे त्याचं पुस्तक सगळ्यात गाजलं. याचपाठोपाठच्या पुस्तकात आपल्या रोजच्या आयुष्यात घडणारे विनोद, बोलताना होणाऱ्या चुका आणि गडबडीत गोष्टी विसरून जाणं वगैरे गोष्टींचाही संदर्भही त्यानं आपल्या निष्कर्षांशी लावून दाखवला. इड, ईगो, आणि सुपरईगो यांच्यात सतत सुरू असलेली लढाई आपल्यासमोर या मार्गानी प्रकटते असं तो मानायचा. त्यातूनच बोलताना होणाऱ्या गफलतींना ‘फ्रॉईडियन स्लिप‘ असं नाव पडलं. १९०५ साली फ्रॉईडनं माणसाच्या लैंगिकतेवर एक पुस्तक लिहिलं.
    वयाच्या चाळिशीत फ्रॉईडला अनेक गोष्टींविषयी उगीच भीती वाटे. तसंच आपण कधीही मरू अशा कल्पनेनंही त्याला ग्रासून टाकलं होतं. त्याला अनेक फोबियांनी घाबरवून सोडलं होतं. या काळातच त्यानं आपलं बालपण, पौगंडावस्था, तारुण्य आणि प्रौढत्व या सगळ्या टप्प्यांविषयी नव्यानं विचार केला. तेव्हा त्याला आपली आठवतील तेवढी स्वप्नं आणि आठवणी यांचीही मदत झाली. याच काळात आपण लहानपणी आपल्या वडिलांचा द्वेष करत होतो आणि आपल्याला स्वत:च्या आईबद्दल लैंगिक भावना असायच्या असा निष्कर्ष त्यानं काढून सगळ्या जगाला सनसनाटी धक्काच दिला!

    १९२३ साली फ्रॉईडला जबडय़ाचा कर्करोग झाला. तो ‘चेनस्मोकर’ होता. अनेक र्वष तो दिवसाला २०-२० सिगरेटी ओढायचा! कर्करोग झाल्यावरही हे थांबलंच नाही! त्यामुळे त्याच्यावर तब्बल ३० शस्त्रक्रिया झाल्या! आपल्या विचारशक्तीवर परिणाम होईल या भीतीनं तो पेनकिलर्स घ्यायचा नाही, आणि त्याच्या बदल्यात भयानक वेदना सहन करायचा! आपल्या मृत्यूच्या एक महिना आधीपर्यंत त्याचं लिखाण आणि रुग्णतपासणीचं काम सुरूच असे. १९३८ साली दुसऱ्या महायुद्धात नाझींनी ऑस्ट्रियावर कब्जा मिळवल्यावर फ्रॉईडला तातडीनं इंग्लंडचा आश्रय घ्यावा लागला. तिथे आपल्याला आयुष्याचा कंटाळा आलेला असल्यामुळे आत्महत्या करण्यात मदत करावी अशी विनंती त्यानं त्याचा मित्र आणि डॉक्टर मॅक्स श्करला केली होती. श्करनं त्याला मॉर्फिनची तीन इंजेक्शन्स देऊन फ्रॉईडची आत्महत्या करायची इच्छा पूर्ण केली. त्यात फ्रॉईडचा अंत झाला.

    माणसाच्या मनाचे अंतरंग इतक्या खोलात जाऊन आणि इतक्या धाडसानं फ्रॉईडच्या आधी कुणीच उलगडले आणि मांडले नव्हते. इतक्या वर्षांनंतर आजही फ्रॉईडच्या अनेक सिद्धांतांवर उलटसुलट चर्चा सुरूच असते. काहीही असलं तरी फ्रॉईडनं एकटय़ानं माणसाचा स्वत:कडे आणि समाजाकडे बघायचा दृष्टिकोन पार बदलून टाकला यात शंकाच नाही. माणसाच्या बऱ्याच कृतींच्या मुळाशी सतत अतिशय जोरानं उफाळून येणाऱ्या लैंगिक आणि आक्रमक भावना असतात ही नवी जाण त्यानं जगाला दिली. माणूस आतल्या आत स्वत:शीच सारखा झगडत असतो हे सत्य त्यानं समोर आणलं.


    No comments:

    Post a Comment