सर्वाधिक विजय मिळवणारे पुरुष टेनिसपटू
🔹फेडररचे एकेरीत 1100 विजय
स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपल्या टेनिस कारकिर्दीत आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. त्याने गॅरी वेबर ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत जपानच्या युची सुगितावर ६-३, ६-१ असा विजय मिळवला. हा विजय फेडररच्या कारकिर्दीतील ११००वा विजय ठरला. विजयानंतर फेडरर म्हणाला, ‘माझ्या नावावर असा काही विक्रम नोंदविला जाणार आहे, याची मला स्टुटगार्टमध्येच कल्पना देण्यात आली होती. पण हा विक्रम वगैरे माझ्या डोक्यातच आले नाही. विजयाचा हा आकडा तसा मोठा आणि त्यामुळेच मी समाधानी आहे. आशा आहे या आकड्यांमध्ये अजून वाढ होईल.’
सर्वाधिक विजय मिळवणारे पुरुष टेनिसपटू:
जिमी कॉनर्स अमेरिका १२५६
रॉजर फेडरर स्वित्झर्लंड ११००
इव्हॅन लेंडल चेक प्रजासत्ताक १०६८
गुलेर्मो व्हिलास अर्जेंटिना ९२९
जॉन मॅकन्रो अमेरिका ८७७
आंद्रे आगासी अमेरिका ८७०
रफाएल नदाल स्पेन ८४९
स्टेफन एडबर्ग स्वीडन ८०१
नस्तासे रोमानिया ७८०
नोव्हाक जोकोविच ७७५
🔹‘मिल्की वे’मध्ये आहेत पृथ्वीसारखे १० ग्रह
पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरूच असून, आपल्या ‘मिल्की वे’ आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखे दहा नवे ग्रह सापडले आहेत. आठ वर्षांपासून आकाशगंगेमध्ये नव्या ग्रहांचा शोध घेणाऱ्या केप्लर दुर्बिणीच्या निरीक्षणांचा हा शेवटचा टप्पा होता.
‘नासा’ने २००९मध्ये केप्लर ही दुर्बिण प्रक्षेपित करताना, पृथ्वीसारख्या आणि जीवसृष्टी असू शकणाऱ्या ग्रहांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या दुर्बिणीने पृथ्वीपासून उत्तरेला तीन हजार प्रकाशवर्षे दूर असणाऱ्या सिग्नस तारकासमूहातील दोन लाखांपेक्षा जास्त ग्रहांची निरीक्षणे करत नवे ग्रह शोधून काढले आहेत. यामध्ये २१९ नवे ग्रह सापडले आहेत. त्यातील दहा ग्रह पृथ्वीसारखे असून, त्यावर जीवसृष्टीची शक्यता नाकारता येत नाही.
या नव्या शोधानंतर ‘मिल्की वे’ आकाशगंगेतील ग्रहांची संख्या चार हजार ३४ झाली असून, यातील ४९ ग्रहांवरील परिस्थिती जीवसृष्टीसाठी पूरक आहे. यामध्ये ग्रहांच्या पृष्ठभागावर पाणी राहू शकते किंवा जीवांसाठी अन्य गोष्टी पोषक आहेत. आकाशगंगेतील सूर्यमालेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांना ‘एक्सोप्लॅनेट’ असे म्हटले जाते. ‘मिल्की वे’मध्ये आतापर्यंत सापडलेल्या ग्रहांपैकी निम्म्यापेक्षा जास्त ‘एक्सोप्लॅनेट’ आहेत.
नव्याने सापडलेले ग्रह वेगवेगळ्या आकारमानांचे आणि वेगवेगळ्या रुपामध्ये आहेत. पृथ्वीपेक्षा १.७५ पटीपर्यंत आकार असणारे ग्रह खडकाळ पृष्ठभागाचे आहेत. त्यांना ‘सुपर अर्थ’ असे म्हणण्यात आले आहे. पृथ्वीपेक्षा दोन ते ३.५ पटीपर्यंत असणारे ग्रह वायूंनी तयार झाले आहेत. त्यांना ‘मिनी नेपच्युन’ असे नामकरण करण्यात आले आहे. पृथ्वीशी आकारमानाने साम्य असणाऱ्याच ग्रहांवर शास्त्रज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यावरील जीवसृष्टीची शक्यता आणि त्या ग्रहाची निर्मिती कशी झाली, याविषयीची माहिती निरीक्षणांमधून मिळू शकते.
आपण एकटेच आहोत का, हा आपल्यासमोरील महत्त्वाचा प्रश्न होता. मात्र, आपण एकटे नाहीत, असेच केप्लर दुर्बिणीने अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
- मारियो पीरेज, केप्लर मोहिमेतील शास्त्रज्ञ
* दोन लाख सिग्नस तारकासमूहामध्ये निरीक्षणे करण्यात आलेल्या ताऱ्यांची संख्या
* या मोहिमेत सापडलेले नवे ग्रह २१९
* पृथ्वीसारखी परिस्थिती असणारे नवे ग्रह १०
🔹राहुल कोसम्बी, ल म कडू यांना साहित्य अकादमी पुरस्कार
साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या समजला जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यंदा दोन मराठी साहित्यिकांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. साहित्यिक ल.म. कडू यांना २०१७ चा बाल साहित्य पुरस्कार तर राहुल कोसम्बी यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्यिक ल.म. कडू यांच्या 'खारीच्या वाटा' या कादंबरीसाठी हा पुरस्कार झाहीर झाला आहे. तर राहुल कोसम्बी यांच्या 'उभं आडवं' या पुस्तकाला २०१७ चा युवा साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पर्यावरण, गावकरी आणि त्यांच्यावर होणारा विकासाचा परिणाम यावर कडू यांनी आपल्या 'खारीच्या वाटा' कादंबरीतून भाष्य केलं आहे. एका लहान मुलाच्या जीवनात कशाप्रकारे उलथापालथ होते. धरणामुळे त्याचं गाव विस्थपित होतं. पण त्या गावात त्यानं पाळलेली खार तिथेच राहतं. अतिशय मार्मिकपणे त्यांनी विकासाचे समाजावर होणारे परिणाम कादंबरीत टिपले आहेत.
राहुल कोसम्बी यांनी 'उभं आडवं' या पुस्तकातून समाजातील वास्तवावर लिखाण केलं आहे. आपल्या भोवती घडणाऱ्या घटनांचे त्यांनी विश्लेषण केलं आहे. तसंच यातून सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक भान दिसून येते. पुस्तकातील त्यांच्या विवेचन परिवर्तनाच्या चळवळीशी जोडलले आहे.
🔹राष्ट्रपतिपदासाठी विरोधकांकडून मीरा कुमार
'रालोआ'ने दलित चेहरा असलेल्या रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने माजी लोकसभाध्यक्षा मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची आज बैठक पार पडल्यानंतर सोनिया गांधी यांनी मीरा कुमार यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देत असल्याची घोषणा केली.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधी पक्षाकडून संयुक्त उमेदवार निवडीसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली १७ विरोधी पक्षांची बैठक पार पडली. मीरा कुमार या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून दलित चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या कन्या असलेल्या मीरा कुमार यांनी लोकसभाध्यक्षपद भूषवलेले आहे. राष्ट्रपतिपदासाठी विरोधी पक्षाकडून मीरा कुमार यांच्या नावासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, गोपाल कृष्ण गांधी आणि भारिपचे नेते प्रकाश आंबडेकर यांच्या नावाची चर्चा होती.
🔹चेन्नईकर तरुणाने बनवलेल्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे ‘नासा’कडून यशस्वी प्रक्षेपण
भारतीय मुलगा रिफत शाहरूख याने तयार केलेल्या जगातील सगळ्यात हलक्या अशा अवघ्या ६४ ग्रॅम वजनाच्या उपग्रहाचे ‘नासा’ने आज यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे प्रेक्षपण होताच चेन्नईत रिफत आणि त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. १८ वर्षांच्या रिफत शाहरुखने ‘कलामसॅट’ नावाचा उपग्रह तयार केला होता. नासा आणि ‘आय डुडल लर्निंग’ने आयोजित केलेल्या ‘क्युब इन स्पेस’ या स्पर्धेत तो सहभागी झाला होता आणि या स्पर्धेसाठी त्याने ठोकळ्याचा आकाराचा उपग्रह तयार केला होता.
जानेवारी महिन्यात रिफतने आपला महत्त्वकांक्षी प्रकल्प नासाकडे सुपूर्त केला. जगातील अनेक उपग्रहांवर अभ्यास करण्यात आल्यावर रिफतने बनवलेला उपग्रह सर्वात हलका आणि लहान असल्याचे नासाने म्हटले आहे, तेव्हा हा उपग्रह जूनमध्ये प्रक्षेपित करणार असल्याची माहिती नासाने गेल्याच महिन्यात दिली होती. भारतीय विद्यार्थ्याने एका स्पर्धेत बनवलेला उपग्रह पहिल्यांदाच नासा प्रक्षेपित करण्यात आला आहे, ही दुसरी अभिमानाची बाब आहे. २४० मिनिटांची ही प्रक्षेपण मोहिम असून तो १२ मिनिटे अंतराळाच्या कक्षेत ‘कलामसॅट’ भ्रमण करणार आहे.
🔹रोगप्रसारक डासांची उत्पत्ती मर्यादित करण्यासाठी संशोधन
जालना शहराजवळ दावलवाडी येथे चाचणी
डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे आजार वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती कमी होण्याच्या संदर्भात सध्या जालना शहराजवळील दावलवाडी येथे संशोधन आणि चाचणी सुरू आहे. बाहय़ वातावरणात परंतु पिंजऱ्यात बंदिस्त डासांवर सध्या या संदर्भात प्रयोग सुरू आहे. अशा प्रकारच्या नर डासांची निर्मिती करायची, की त्यांचा स्थानिक मादी डासाशी संबंध आला तर होणारी पैदास उपजण्याआधीच मृत्युमुखी पडावी, असे या संशोधनाचे उद्दिष्ट आहे. बाहय़ वातावरणात परंतु बंदिस्त क्षेत्रात या संदर्भात चाचण्या घेण्यात आलेल्या आहेत.
नर डास माणसाला चावत नाही आणि त्यामुळे त्याच्यापासून रोगाचा फैलाव होत नाही. डेंग्यू, चिकुनगुन्या तसेच झायकासारख्या रोगाच्या प्रसारास मादी डास कारणीभूत असतो. नर डास रक्तपिपासू नसतो. मादी डास मात्र रक्तापर्यंत पोहोचल्याने डेंग्यू, चिकुनगुन्यासारखे आजार पसरतात. त्यामुळे असे आजार पसरवणाऱ्या डासांचा फैलाव रोखण्यास मदत करण्याच्या दृष्टीने विचार करण्यात येत आहे. त्यासाठी जीबीआयटी अर्थात गंगाभीषण भिकूलाल इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग लिमिटेड आणि ऑक्सिटेक अमेरिकन कंपनीने भागीदारी तत्त्वावर भारतात संशोधन सुरू केलेले आहे.
जीबीआयटी आणि जालना शहरातील प्रसिद्ध महिको बियाणे कंपनीचा जवळचा संबंध आहे. महिकोचे अध्यक्ष बद्रिनारायण बारवाले हेच जीबीआयटीचेही अध्यक्ष आहे. त्यामुळे जालना शहराजवळ दावलवाडी येथे असलेल्या महिकोच्या केंद्रात डासांच्या संदर्भात संशोधन सध्या सुरू आहे. डासाच्या प्रसारास नियंत्रण करू शकणारे म्हणजे ‘उपयोगी एडिस अॅजेप्टी’ निर्माण व्हावेत हा या संशोधनाचा हेतू आहे. ‘उपयोगी एडिस अॅजेप्टी’ नर डास चावत नसल्याने त्यांच्यापासून रोगाचा प्रसार होत नाही. हे नर डास जेव्हा स्थानिक मादी डासाशी संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्यापासून होणारी पैदास जन्मत:च मृत्युमुखी पडते. त्यामुळे डासांची संख्या कमी होते.
सध्या अशा डासांच्या निर्मितीसंदर्भात दावलवाडी येथे मर्यादित स्वरूपाचा अभ्यास सुरू आहे. बाहय़ वातावरणातील पिंजऱ्यात आणि सुरक्षिततेची काळजी घेऊन हे संशोधन सुरू आहे. खुल्या क्षेत्रात ही चाचणी घेण्यासाठी केंद्र सरकारचे संबंधित नियामक मंडळ आणि जेनेटिक इंजिनिअरिंग अॅप्रूव्हल कमिटीच्या परवानगीची आवश्यकता लागणार आहे. जीबीआयटीच्या दाव्यानुसार ब्राझीलसह अन्य काही देशांमध्ये झालेल्या चाचण्यांत या प्रयोगाची उपयोगिता स्पष्ट झालेली आहे.
जीबीआयटीशी संबंधित महिकोचे नाव जनुकीय अभियांत्रिकी शाखेतील प्रगतीच्या आधारे बीटी कापूस बियाण्यांच्या उत्पादनामुळे सर्वदूर परिचित आहे. साधारणत: मागील पंधरा वर्षांपूर्वी कापूस पिकावरील बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बी.टी. पावडरची फवारणी करत असत. बी.टी. अर्थात बॅसिलयस युरिन्जिएन्सीस हा मातीत सापडणारा सामान्य जीवाणू असून त्याचा शोध ५०-५५ वर्षांपूर्वीचा आहे. ज्या जनुकामुळे बी.टी. पावडर बोंडअळी नष्ट करते ते जनूकच बियाण्यांत घालण्यात शास्त्रज्ञांना यश आल्याने कापसाच्या पिकातच बोंडअळीच्या विरुद्ध जगण्याची क्षमता निर्माण झाली. जैवतंत्रज्ञानावर आधारित या कापसाच्या तीन जातींची व्यापारी तत्त्वावर लागवड करण्याची परवानगी महिकोस २००२ मध्ये केंद्र सरकारने दिली होती. बोंडअळी नियंत्रणात आणण्याच्या या प्रयोगानंतर महिकोशी संबंधित जीबीआयटी ही कंपनी आता डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजाराचा प्रसार करणाऱ्या मादी डासांची उत्पत्ती मर्यादित करण्यासाठी संशोधन करीत आहे. डासांची उत्पत्तीच कमी झाली तर त्यामुळे त्यांच्यापासून फैलावणाऱ्या रोगांवर काही प्रमाणावर नियंत्रण येऊ शकेल, यासाठी हे संशोधन आहे.
🔹अफगाणिस्तान, आयर्लंडला कसोटी दर्जा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल नोंदवणाऱ्या आयर्लंड आणि अफगाणिस्तान या संघांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिलासा दिला आहे. आयर्लंड आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांना आयसीसीने पूर्ण सदस्यत्व देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे या दोन्ही संघांसाठी आता कसोटी क्रिकेटचे दार उघडले आहेत.
आयसीसीची गुरुवारी लंडनमध्ये बैठक झाली. या बैठकीत अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघाना पूर्ण वेळ सदस्यत्व देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या दोन्ही देशांनी कसोटी दर्जा मिळवण्यासाठी आपली पात्रता सिद्ध केल्याने आयसीसीने या संघांना पूर्णवेळ सदस्यत्व देत असल्याचे जाहीर केले. कसोटी खेळणाऱ्या देशांच्या यादीत अफगाणिस्तान आणि आयर्लंड ११ वा आणि १२ वा देश ठरणार आहे.
आयर्लंड आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांमध्येच सहभागी व्हायचे. आयर्लंडने आत्तापर्यंत अनेकदा धक्कादायक विजय मिळवत क्रिकेटप्रेमींची दाद मिळवली होती. तर अफगाणिस्ताननेही एकदिवसीय सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करत क्रिकेट विश्वात छाप पाडली होती. अफगाणने काही दिवसांपूर्वीच वेस्ट इंडिजवर मात करत मालिका बरोबरीत सोडवली होती.
अफगाणिस्तान संघासाठी हे मोठे यश असल्याचे सांगितले जाते. अफगाणिस्तान हा नेहमीच युद्धाच्या सावटाखाली वावरणारा देश असून अशा कठीण परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानची क्रिकेटमधील कामगिरी कौतुकास्पद आहे. दुसरीकडे आयर्लंडच्या संघाने गेल्या तीन वर्ल्ड कपमध्ये दिग्गज संघांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
🔹राम नाथ कोविंद राष्ट्रपतिपदाचे उमेदवार
भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा सदस्य आणि बिहारचे विद्यमान राज्यपाल राम नाथ कोविंद यांची राष्ट्रपतिपदाचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून निवड करण्यात आली आहे. या पदासाठी निवडणूक झाल्यास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. देशाचे सर्वोच्च पद भूषविणारे ते दुसरे दलित व्यक्ती असतील. निवडीबद्दल कोविंद यांनी आनंद व्यक्त केला असून आपल्याला सर्व पक्ष पाठिंबा देतील अशी अपेक्षा बोलून दाखविली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली. तत्पूर्वी त्यांची भाजपच्या संसदीय समितीने निवड केली. 71 वर्षीय कोविंद हे प्रसिद्धीच्या झोतात नसलेले दलित नेते आहेत. तळागाळातील समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी पाच दशके कार्य केलेले आहे. महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यांच्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाची पार्श्वभूमी त्यांच्यापाशी आहे. 1998 ते 2002 या कालावधीत ते भाजपच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. अखिल भारतीय कोली समाजाचेही ते अध्यक्ष होते. 8 ऑगस्ट 2015 या दिवशी त्यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून उत्तर प्रदेशातील कानपूर विद्यापीठात त्यांनी ही पदवी आणि कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. राजकारणातील प्रवेशापूर्वी त्यांची यशस्वी वकील म्हणून ख्याती होती. त्यांनी 1977 ते 1979 या काळात दिल्ली उच्च न्यायालयात वकीली केली. 1980 ते 1993 या काळात ते केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयातील वकील होते. 1978 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणून नोंदणी झाली होती.
त्यांचा संसदीय कालावधीही अनेक कारणांनी गाजला होता. ते संसदेच्या अनुसूचित जाती, जमाती कल्याण समितीचे सदस्य होते. सामाजिक न्याय आणि सबलीकरण संसदीय मंडळातही त्यांची भूमिका महत्वाची होती. 1997 मध्ये त्यांनी अनुसूचित जाती आणि जमातींच्या हितांना बाधा पोहचविणाऱया एका केंद्र सरकारी आदेशाविरोधात आंदोलन पुकारले होते. नंतर केंद्रात रालोआचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्याने घटनासुधारणा करून हे आदेश रद्द ठरविले होते.
▪️गरिबांचे वकील म्हणून प्रसिद्ध
आपल्या वकिलीच्या काळात त्यांनी समाजाच्या दुबळय़ा वर्गाला तसेच गरीब महिला व मुलींना विनामूल्य कायदेशीर साहाय्य मिळवून देण्यात पुढाकार घेतला होता. याच कार्यासाठी त्यांनी विनामूल्य विधीसाहाय्य संस्थेची स्थापनाही केली. कायदा क्षेत्राप्रमाणेच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. ते लखनौच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य होते. तसेच इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते तसेच ऑक्टोबर 2002 मध्ये राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण केले होते.
▪️ते अद्वितीय राष्ट्रपती होतील…
राम नाथ कोविंद हे प्रज्ञावान व्यक्तिमत्त्व असून ते राष्ट्रपतिपदाची महती आणखीनच वाढवतील. ते निश्चितपणे थोर आणि अद्वितीय राष्ट्रपती म्हणून देशाच्या सन्मानात भर टाकतील, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते पददलितांसाठी आणि गोरगरिबांसाठीचे आपले कार्यही अधिक जोमाने सुरू ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
▪️नितीश कुमार याना आनंद
कोविंद यांच्या निवडीबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आनंद व्यक्त केला आहे. बिहारचे राज्यपाल देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याच्या तयारीत आहेत, हे सुखावह आहे. मात्र, त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
▪️नकारात्मक प्रतिक्रिया नाही
एक दलित देशाचा राष्ट्रपती होणार असेल तर बहुजन समाज पक्षाची प्रतिक्रिया नकारात्मक असणार नाही. मात्र कोविंद हे भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांच्याऐवजी राजकारणातीत अशा दलिताची निवड करण्यात आली असती तर जास्त आनंद झाला असता, अशी प्रतिक्रिया बहुजना समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी व्यक्त केली आहे.
जातीचे राजकारण देशाला अहितकारक
कोविंद यांच्या नावाबद्दल आमच्याशी कोणताही विचारविमर्श करण्यात आला नव्हता. ते दलित आहेत या कारणास्तव जर त्यांची निवड करण्यात आली असेल तर ही राजकीय निवड ठरेल. असे जातीचे राजकारण देशाला मागे नेईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यांना समर्थन द्यायचे की नाही याबद्दल पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
▪️हा सहमतीचा निर्णय नाही
कोविंद यांची उमेदवार म्हणून निवड हा सहमतीचा निर्णय नाही. ही राजकीय निवड आहे. त्यासंबंधात कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय विरोधी पक्षांच्या बैठकीत घेतला जाईल. अद्याप का
ँगेसने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया काँगेसने व्यक्त केली आहे.
अद्रमुक, बिजद यांचा पाठिंबा शक्य
तामिळनाडूतील सत्ताधारी अद्रमुक आणि ओरिसातील सत्ताधारी बिजू जनता दलाचा कोविंद यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. हे पक्ष अद्याप विरोधी आघाडीत सहभागी झालेले नाहीत. तृणमूल काँगेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भूमिकाही अद्याप संदिग्धच आहे. येत्या दोन दीन दिवसात राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. बॉक्स
राष्ट्रपती ‘धर्मनिरपेक्ष’ असावा
देशाचा राष्ट्रपती धर्मनिरेपक्ष असावा, अशी अपेक्षा माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्या कोविंद यांच्या निवडीबद्दल बोलत होत्या. कोविंद यांनी भारतीय घटनेच्या तत्वांचे संवर्धन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
▪️राम नाथ कोविंद यांचा जीवनपट
ड जन्म व जन्मस्थान- 1 ऑक्टोबर 1945, डेरापूर (उत्तर प्रदेश)
ड शिक्षण, विद्यापीठ- बी. कॉम., एलएलबी, कानपूर विद्यापीठ
ड व्यायसायिक कार्य- वकीली, दिल्ली उच्चन्यायालयात वकीली
ड वकीली प्रतिनिधीत्व- सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारच्sा वकीली
ड संसदीय कार्यकाळ- 1994-2000 भाजप राज्यसभा सदस्य
ड आंदोलने, संघर्ष- दलित, अनसूचित जमाती, दुर्बळ घटकांचे अधिकार
ड संस्था, संघटना कार्य- 1998-2002 भाजप दलित मोर्चा अध्यक्ष
ड सामाजिक संस्था- अखिल भारतीय कोली समाज अध्यक्षपद
ड स्वस्थापित संस्था- विनामूल्य विधीसाहाय्य संस्थेचे संस्थापक
ड सांसदीय कार्य- अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणून कार्य
ड व्यक्तिमत्व, स्वभाव- शांत, कष्टाळू आणि संयमित व्यक्तिमत्व
ड बिहारचे राज्यपाल- 8 ऑगस्ट 2015 पासून आतापर्यंत या पदावर
▪️निवडीची काही वैशिष्टय़े…
ड भाजपशी थेट संबंधित असणारे देशाचे पहिलेच राष्ट्रपतीपद उमेदवार
ड के. आर. नारायणन यांच्या नंतरचे दुसरे दलित समाजातील उमेदवार
ड राज्यपालपद भूषवित असताना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी प्रथमच
ड 30 वर्षात प्रथमच उत्तर प्रदेशात जन्मलेली व्यक्ती राष्ट्रपती उमेदवार
🔹नौदलाच्या पहिल्या स्वदेशी फ्लोटिंग डॉकचे अनावरण
नौदलासाठी पहिल्या स्वदेशी फ्लोटिंग डॉक एफडीएन-2चे अनावरण करण्यात आले आहे. जहाजबांधणीच्या क्षेत्रात स्वयंनिर्भरतेचे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. आता डॉकचे चाचणीसत्र चालेल, ज्यानंतर ते नौदलाकडे सुपूर्द केले जाणार आहे.
फ्लोटिंग डॉक सागरी पाण्यावर बनलेले एक प्लॅटफॉर्म आहे, जेथे जहाजांची दुरुस्ती आणि देखभाल होते. एफडीएन-2 ची रचना आणि निर्मिती एलअँडटी शिपयार्डने केली आहे. चेन्नईत मंगळवारी ते सादर करण्यात आले असून हा डॉक कार्यान्वित झाल्यानंतर अंदमान आणि निकोबारमध्ये तैनात नौदलाच्या नौकांसाठीची तांत्रिक दुरुस्ती सेवा सुधारण्यास मदत हेईल.
एफडीएन-2 मध्ये आधुनिक यंत्रसामग्री आणि यंत्रणा वापरण्यात आली असून यामुळे 8000 टन डिस्प्लेसमेंटासाठी सक्षम युद्धनौकांना डॉक करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. डॉक सामावल्याने यात खराब हवामानात देखील दुरुस्ती आणि पुनर्जेडणी करण्याची क्षमता आहे. तसेच याद्वारे दिवसाच्या वेळी तसेच रात्री कधीही डॉकिंग केले जाऊ शकते. संरक्षण मंत्रालयाने 2015 साली यासाठी मागणीपत्र दिले होते. निर्धारित वेळेपूर्वीच याची निर्मिती पूर्ण झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
🔹पुण्याच्या शिवाजी नगर आणि मुंबईतील ठाणे स्टेशनचा होणार कायापालट
प्रवासासाठी उत्तम आणि खिशाला परवडणारा प्रवास म्हणून रेल्वेच्या प्रवासाकडे बघितलं जातं. पण अनेकदा रेल्वे स्टेशनवरील गर्दी आणि तिथे असलेली अस्वच्छता या कारणांमुळे रेल्वेतून प्रवास नकोसा पण वाटतो. पण लवकरच अलिशान रेल्वे स्टेशनवरून प्रवास करण्याचं प्रवाश्यांचं स्वप्न साकार होणार आहे. यासाठीची पाऊलं उचलायला रेल्वे प्रशासनाने सुरूवात केली आहे. भारतातील एकुण 23 रेल्वे स्टेशन सार्वजनिक आणि खाजगी सहकार्यातून विकसित केली जाणार आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील शिवाजी नगर रेल्वे स्टेशन आणि मुंबईतील ठाणे रेल्वे स्टेशनचा या 23 स्टेशन्समध्ये क्रमांक लागतो. एकदंरीतच शिवाजीनगर आणि ठाणे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअरपोर्टवर जशा सुविधा मिळतात तशाच सुविधा दिल्या जाणार आहेत.
ठाणे आणि शिवाजी नगर व्यतिरिक्त आनंदविहार, चंदिगड, गुजरातमधील गांधीनगर, हावरा, चेन्नई यांचा क्रमांक लागणार आहे. तसंच मुंबईतील मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली, लोकमान्य टिळक या स्टेशनचा या यादीत सहभाग आहे. मध्य रेल्वे मार्गावरच ठाणे स्टेशन हे सगळ्यात गर्दीचं स्टेशन म्हणून ओळखलं जातं. याच ऐतिहासिक ख्याती असणाऱ्या ठाणे रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. यासाठी २०० कोटींची निविदा काढण्यात येणार आहे.
देशातील पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ साली बोरीबंदर ते ठाणे मार्गावर धावली होती. ठाणे स्थानकातून तब्बल ७ ते ८ लाख प्रवाशी प्रवास करतात. मात्र, स्थानकाला ऐतिहासिक वारसा असूनही अद्याप पुरेशा सोयीसुविधा नसल्याची ओरड प्रवाशांकडून ऐकु येते. आता खाजगीकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी ठाण्यातील नागरिकांना आद्ययवत सोई-सुविधा मिळणार आहेत. प्रत्यक्ष सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात होण्यासाठी ठाणेकरांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
देशातील एकूण २३ रेल्वे स्थानकांचा मेकओव्हर करण्याचे रेल्वे मंत्रालयाने ठरवलं आहे. यामध्ये भोपाळमधील हबीबगंज हे देशातील सार्वजनिक आणि खाजगी सहकार्यातून विकसित होणारं पहिलं रेल्वे स्टेशन आहे. हबीबगंज स्टेशच्या विकासाचे अधिकार बन्सल ग्रुपला दिले गेले आहेत. या करारानुसार बन्सल ग्रुपकडे आठ वर्षांसाठी हबीबगंजचे अधिकार राहतील. त्यात त्यांनी स्टेशनचं बांधकाम, देखभाल या गोष्टींकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. कंपनीला स्टेशनच्या मालकीची जमीन ४५ वर्षांच्या लीजने दिली जात असून तिथे जागतिक स्तरावरचे शॉपिंग प्लाझा, रेस्टॉरंटस, खाद्यपदार्थाची दुकानं, पार्किंग सुविधा असणार आहे.
या स्टेशनसाठी सौर ऊर्जेचा वापर केला जाणार असून दिव्यांगांसाठी विशेष सुविधा असतील. यामध्ये बन्सल ग्रुपकडून 400 कोटी रुपये गुंतविले जाणार आहेत. त्यापैकी 100 कोटी रूपये स्टेशनच्या पुर्नविकासावर खर्च केले जाणार आहेत तर बाकी रक्कम इतर सोयी-सुविधा देण्यावर खर्च होतील. आणिबाणिच्या काळात चार मिनिटात सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढता येईल, अशा पद्धतीने हे स्टेशन विकसित केलं जाणार आहे.
🔹मर्सर संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणात मुंबईचा 57 वा क्रमांक
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आकर्षण जगभरातील लोकांना आहे . मुंबईतील वैभवशाली वास्तू पाहण्यासाठी, येथील समुद्रीकिना-यांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक मुंबईत येतात. तसेच अनेक परदेशी नागरिक नोकरीनिमित्त, शिक्षणासाठीही मुंबईत येतात. मात्र, मर्सर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुंबई हे पर्यटकांसाठी आणि नोकरीनिमित्ताने आलेल्या नागरिकांसाठी महाग शहर ठरले आहे. येथे होणारा अर्थार्जनाचा खर्च हा अधिक आहे. जागतिक क्रमवारीत मुंबईचा ५७ वा क्रमांक लागतो. २०१६ साली मुंबईचा ८२ वा क्रमांक होता.
मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्वेक्षण केले जाते . यंदा केलेल्या सर्वेक्षणात मुंबई ५७ व्या क्रमांकावर आहे. अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे . हे शहर सर्वेक्षणात प्रथम स्थानावर आहे. भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चिक ठरत आहे . या सर्वेक्षणात नवी दिल्ली ९९ व्या स्थानावर आहे . तर चेन्नई (१३५), बंगळूरु(१६६), कोलकाता (१८४) या शहरांचाही समावेश आहे . मुंबईने या क्रमवारीत ऑकलँड (६१), डल्लास आणि पॅरिस (६२), कॅनबेरा (७१), सीटल (७६), आणि व्हिएना (७८) या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे. मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे . चीज, बटर, मासे, मटण यांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत .
जगभरातील पर्यटकांची याच खाद्यपदार्थांना अधिक पसंती मिळते. याशिवाय कांदे, टोमॅटो, अननस यासारख्या फळे आणि भाज्यांच्या किमतीमध्येही मोठया प्रामाणात वाढ झाली आहे . वाहतुकीचा खर्चही मुंबईत अधिक दिसून आला आहे . टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेही मोठया प्रमाणात वाढले आहे.
ट्युनिस (२०९), बिशकेक (२०८), कोपजे आणि विन्डोक (२०६), ब्लाटायर (२०५), बिलीसी (२०४), मॉन्टेरेरी(२०३), सॅराजेवो (२०२), कराची (२०१) आणि मिन्स्क (२००) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्व्हेक्षणात नमूद केले आहे . लुएन्डा या शहरानंतर हॉंगकॉंग (२), टोकियो (३), झ्युरिच (४), सिंगापूर (५) ही जगभरातील महागडी शहरे आहेत . याशिवाय सीऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयार्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या दहामध्ये समावेश आहे. या यादीमध्ये युरोप खंडातील शहरांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे .
या सर्वेक्षणाविषयी अधिक माहिती देताना मर्सरच्या भारतातील प्रमुख रुचिका पाल यांनी सांगितले की, २०१६ साली जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किमती मोठया प्रमाणात वाढल्या तर भाड्याने घर घेऊन तात्पुरती स्वताची सोय करणा-यांची संख्या वाढली. यामुळे या किमतीमध्येही आपसूकच वाढ झाली. असे रुचिका पाल यांनी सांगितले.
देशातील शहरांची क्रमवारी-
शहर २०१७-२०१६
मुंबई ५७-८२
नवी दिल्ली ९९-१३०
चेन्नई १३५-१५८
बंगळुरू १६६-१८०
कोलकाता १८४-१९४
🔹इस्रो कार्टोसॅट-२ईसह 31 छोटे उपग्रह पाठवणार अंतराळात
गेल्या काही दिवसांपूर्वीच जीएसएलव्ही मार्क- 3 (GSLV MK III)च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो पीएसएलव्ही या स्वदेशी उपग्रहासह विविध देशांचे आणखी 31 उपग्रह अवकाशात पाठवणार आहे. इस्रोचा पीएसएलव्ही हा उपग्रह स्वताःसोबत 31 छोटे उपग्रह घेऊन शुक्रवारी अवकाशात उड्डाण करणार आहे. या छोट्या उपग्रहांमध्ये ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, फ्रान्स, फिनलँड अशा 14 देशांचे जवळपास 31पैकी 29 उपग्रहांचा समावेश आहे. तसेच तामिळनाडूतल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एक नॅनो उपग्रहसुद्धा आकाशात उड्डाण करणार आहे.
इस्रोचे पीएसएलव्ही हा उपग्रह 14 देशांचे 29 छोटे उपग्रह, भारताचे कार्टोसॅट-२ ई आणि तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले उपग्रह घेऊन अवकाशात प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरीकोटा येथील लाँचपॅडवरून शुक्रवारी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे.
ऑस्ट्रिया, बेल्जियम, चेक रिपब्लिक, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युरोप आणि अमेरिका अशा 14 देशांच्या 29 छोट्या उपग्रहांचा मोहिमेत सहभाग असणार आहे. कार्टोसॅट-२ई या भारतीय उपग्रहाचे वजन 712 किलो आहे. कार्टोसॅट- 2 या मालिकेतील हे सहावे उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून आलेल्या छायाचित्रांचा वापर नकाशा तयार करण्याच्या कामासाठी केला जाणार आहे. शहरी आणि ग्रामीण किनारपट्टीजवळील जमिनीचे नियमन आणि देखरेख करण्यासाठीह या उपग्रहाचा वापर केला जाणार आहे.
🔹देशातल्या पहिल्या ट्रेडमार्कचा दर्जा मुंबईतल्या ताज महाल पॅलेसला
गेट वे ऑफ इंडियाजवळच्या 'ताज महाल पॅलेस' हॉटेलच्या बिल्डिंगला 'ट्रेडमार्क'चा दर्जा मिळाला आहे. न्यूयॉर्कची एम्पायर स्टेट बिल्डिंग, पॅरिसचा आयफेल टॉवर, सिडनीचे ऑपेरा हाऊस या ट्रेडमार्क असलेल्या वास्तूंच्या पंगतीत आता मुंबईतला ताज महाल पॅलेसही जाऊन बसला आहे. 114 वर्षं जुनी असलेली ताजमहाल पॅलेस हॉटेलची बिल्डिंग ट्रेडमार्क लाभलेली भारतातील एकमेव वास्तू आहे.
एखाद्या ब्रँडचा लोगो, एखादी विशिष्ट रंगसंगती, सांख्यिकी अशा गोष्टींचे ब-याचदा ट्रेडमार्क होत असतात. भारतात ट्रेडमार्क अॅक्ट 1999पासून लागू करण्यात आला आहे. हा कायदा अंमलात आल्यानंतर पहिल्यांदाचा मुंबईतल्या ताजमहाल पॅलेस या हॉटेलच्या बिल्डिंगला ट्रेडमार्कचा दर्जा देण्यात आला आहे. ताज महाल पॅलेस हॉटेलमधल्या वास्तूरचनेचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी आम्ही ट्रेडमार्कचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केल्याचंही ताजमहाल पॅलेस चालवणाऱ्या इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे जनरल काऊन्सिल राजेंद्र मिश्रा म्हणाले आहेत. इंडियन हॉटेल्स कंपनीच्या महसुलात ताज महाल हॉटेलचं योगदान मोलाचे असल्याचंही मिश्रा यांनी सांगितलं आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथे 1903मध्ये ताज महाल पॅलेसची निर्मिती झाली. बांधकाम व्यावसायिक शापूरजी पालनजी यांच्या कंपनीने ही ताज महाल हॉटेलची बिल्डिंग बांधली. ट्रेडमार्कचा दर्जा मिळाल्यामुळे आता कोणालाही ताज महाल पॅलेस हॉटेलच्या छायाचित्राचा व्यावसायिक फायद्याच्या जाहिरातीसाठी वापर करता येणार नाही, जर असे कोणी केल्यास कंपनीला शुल्क द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीत अनेक दुकानांमध्ये ताज महालचे छायाचित्र असलेल्या फोटो फ्रेम्स, कफलिंक्स मिळतात. मात्र आता त्यांना त्या विकता येणार नाहीत.
🔹 बंगरुळ शहरात सुरु झाली डिझेलची होम डिलिव्हरी
दूध आणि वर्तमानपत्राप्रमाणे डिझेलची होम डिलिव्हरी करणारं बंगळुरु देशातील पहिलं शहर बनलं आहे. काही आठवड्यांपूर्वी केंद्र सरकार अशाप्रकारची योजना सुरु करण्याचा विचार करत असल्याची घोषणा पेट्रोलिअम मंत्रालयाने केली होती. फक्त एका वर्षांपुर्वी सुरु झालेल्या स्टार्टअपने 15 जूनपासून 950 लीटर क्षमता असलेल्या वाहनांमधून डिझेलची होम डिलिव्हरी सुरु केली आहे.
🔹न्यूझीलंडच्या ल्युक राँचीने घेतली निवृत्ती
न्यूझीलंडचा यष्टिरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज ल्युक राँची याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. ब्रॅंडन मॅकल्लमने यष्टिरक्षण करणे थांबविल्यापासून राँची हा न्यूझीलंडचा नियमित यष्टिरक्षक झाला होता.
36 वर्षीय राँचीने 85 एकदिवसीय, चार कसोटी आणि 32 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले. 2008 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. कसोटीमध्ये पदार्पण करण्यासाठी मात्र त्याला 2015 पर्यंत वाट पाहावी लागली. 2015 च्या विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेल्या न्यूझीलंड संघामध्येही त्याचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरीही राँची देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि 'आयपीएल'सारख्या ट्वेंटी-20 स्पर्धांमध्ये खेळणार आहे.
🔹जागतिक बॅंकेकडून आसामला 44 दशलक्ष डॉलरचे कर्ज
जागतिक बॅंकेच्या कार्यकारी संचालकांनी आसाम राज्य सार्वजनिक वित्त्त संस्था सुधारणा (ऍस्पायर) प्रकल्पासाठी 44 दशलक्ष डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली. जागतिक बॅंकेच्या 15 जूनला झालेल्या बैठकीमध्ये या कर्जाला मंजुरी देण्यात आली. याबाबत आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्जमंजुरीच्या प्रक्रियेमध्ये सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
🔹2050 मध्ये जगाची लोकसंख्या असेल 9.8 अब्ज !
जगामधील एकूण लोकसंख्या 2050 पर्यंत तब्बल 9.8 अब्ज इतकी होईल, असा अंदाज संयुक्त राष्ट्रसंघाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. जगाची लोकसंख्या सध्या 7.6 अब्ज इतकी आहे.
याचबरोबर, 2024 पर्यंत भारत हा चीनला मागे टाकून जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल, असेही या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
या अहवालामधील अन्य महत्त्वपूर्ण अंदाज -
2050 पर्यंत नायजेरिया हा अमेरिकेस मागे टाकून जगातील तिसरा सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश बनेल
दरवर्षी जागतिक लोकसंख्येत सुमारे 8.3 कोटींची भर पडत आहे. यामुळे प्रजोत्पादनाचा घटणारा दर विचारात घेऊनही 2030 पर्यंत जगाची लोकसंख्या 8.6 अब्ज; 2050 पर्यंत 9.8 अब्ज; तर 2100 पर्यंत 11.2 अब्ज इतकी असेल
नायजेरियामधील लोकसंख्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. याशिवाय 2050 पर्यंत आफ्रिकेमधील 26 देशांमधील लोकसंख्या वाढीचा वेग "किमान दुप्पट' झाला असेल
सध्या जगातील वृद्ध नागरिकांची संख्या 96.2 कोटी इतकी आहे; 2050 पर्यंत ती 2.1 अब्ज; तर 2100 मध्ये ती 3.1 अब्ज इतकी असेल.