अमेरिका-भारत मिळून करणार इस्लामिक दहशतवादाचा खात्मा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपतीडोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सुरक्षित ठिकाणांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केला आहे.
- व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केले.
- संयुक्त निवेदनामध्ये इस्लामिक दहशतवाद हा लोकशाहीसाठी खतरा असल्याचे सांगण्यात आले तसेच याचा खात्मा करण्याचे आवाहन करण्यात आले.
- संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींचा सच्चा दोस्त असा उल्लेख केला. तर, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचे निमंत्रण दिले.
सय्यद सलाहुद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित :
- हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील शिखर बैठकीपूर्वीच ही घोषणा करण्यात आली आहे.
- तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी पठाणकोट हल्ला हा आमच्या कारवायांचा भाग असल्याचे सांगत हिजबुल मुजाहिदीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन याने या हल्ल्याची जबाबदारी जाहीरपणे स्वीकारली होती.
- सलाहुद्दीनने भारत-पाक चर्चेशी काहीही देणे-घेणे नसल्याचे सांगत या हल्ल्याचा संबंध जोडू नये, असेही स्पष्ट केले होते. आम्ही भारताच्या लष्करी संस्थांना लक्ष्य बनविले होते. पठाणकोट हल्ला हा या कारवाया सुरू ठेवण्याचाच एक भाग होता, असे सलाहुद्दीन याने पाकिस्तानातील वजूद या उर्दू न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
वैष्णवीने रचला स्मरणशक्तीचा राष्ट्रीय विक्रम :
- दहा मिनिटांत शंभर शब्दांचे पाठांतर करून स्मरणशक्तीच्या जोरावर त्यातील 98 टक्के शब्द सरळ व उलट्या क्रमाने लक्षात ठेवण्याचा राष्ट्रीय विक्रम वैष्णवी मानोहर पोटे या नागपूरकर तरुणीने नोंदवला.
- तसेच या अनोख्या विक्रमासाठी तिला इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्चे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून पुढील वर्षीच्या आवृत्तीत त्याची नोंदही घेण्यात येईल.
- एकपाठी असलेल्या अनेकांनी आपापल्या पद्धतिने विविध विक्रम नोंदविले आहेत. मात्र, वैष्णवीने विशिष्ट्य कॅटॅगरीसाठी "इंडिया बूक ऑफ रेकॉर्डस्"कडे अर्ज केला. त्यानुसार चिटणवीस सेंटर येथे तिने या विक्रमासाठी प्रयत्न केला.
- परीक्षक मनोज तत्ववादी यांनी ऐनवेळी तिला शंभर शब्दांची यादी दिली. एक ते शंभर या क्रमाने असलेले सर्व शब्द पाठ करण्यासाठी वैष्णवीला दहा मिनिटे देण्यात आली. त्यानंतर तिने सरळ व उलट्या क्रमाने काही अपवाद वगळता सर्व शब्द अचूक सांगितले.
सेवाव्रती उद्योजक देशबंधू गुप्ता यांचे निधन :
- औषध निर्मिती क्षेत्रातील जगविख्यात लुपीन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व सेवाव्रती डॉ. देशबंधू प्यारेलाल गुप्ता (वय 80) यांचे 25 जून रोजी निधन झाले.
- लुपीन कंपनीचे देशात 12, तर विदेशात 8 ठिकाणी प्रकल्प आहेत. सर्व प्रकारची औषधे तयार करताना क्षयरोगासंबंधी औषध निर्मितीत ही कंपनी विश्वात पहिल्या क्रमांकाची ठरल्याचे मानली जाते. हजारो हातांना काम देणाऱ्या या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे 48 हजार कोटी रुपये आहे.
- राजगड (जि. अल्वर, राजस्थान) येथील देशबंधू गुप्ता यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्यानंतर राजस्थानमधील बिट आयआयटीमध्ये अध्यापनास सुरवात केली. त्यांचा ओढा व्यवसायाकडे असल्याने त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात पाय रोवले. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी लुपीन फाउंडेशन, देशबंधू ऍण्ड मंजू गुप्ता फाउंडेशनची स्थापना केली.
- तसेच या संस्थांव्दारे परिवर्तनासह ग्रामीण विकासासाठी 'चेंज इंडिया प्रोग्रॅम' हाती घेत देशबंधू गुप्ता यांनी देशात नऊ राज्यातील साडेतीन हजार, तर महाराष्ट्रात सरासरी पंधराशेहून अधिक गावे दत्तक घेतली आहेत.
दिनविशेष :
- 'काळ' या वृत्तपत्राचे संपादक व प्रखर राष्ट्रीय नेते 'शिवराम महादेव परांजपे' यांचा जन्म 27 जून 1864 मध्ये झाला.
- 27 जून 1967 रोजी लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. (Automated teller machine) सुरू करण्यात आले.