हवामान बदल प्रदर्शन मानांकन यादीत भारत 11व्या स्थानी
‘जर्मनवॉच’ अहवालात प्रसिद्ध केलेल्या ‘हवामान बदल प्रदर्शन मानांकन यादी 2019’ मध्ये भारत 11 व्या क्रमांकावर आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन स्थानांनी पुढे आले आहे.
पर्यावरणविषयक कृतींमध्ये भारत जागतिक नेत्यांपैकी एक बनला आहे. विशेषत: भारताने अक्षय ऊर्जा श्रेणीमध्ये उत्तम कार्यप्रदर्शन दाखवले आहे आणि मध्यम प्रदर्शकांच्या गटात सामील झाले आहे. उत्सर्जन श्रेणीमध्ये भारतामधील दरडोई हरितगृह वायूंचे उत्सर्जन तुलनेने कमी आहे.
पवन ऊर्जा क्षेत्रात जागतिक पातळीवर भारत चौथ्या स्थानी आहे, तर सौर ऊर्जा स्थापित क्षमतेच्या बाबतीत सहावा आणि एकूणच अक्षय ऊर्जा क्षेत्रामध्ये पाचव्या स्थानी आहे.
अन्य ठळक बाबी -
- वैश्विक कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढले आहे.
- यादीत शीर्ष तीन स्थान रिकामी आहेत. चौथ्या स्थानी एकत्रितपणे स्वीडन आणि मोरोक्को आहेत. तर अमेरिका आणि सौदी अरब या देशांचा शेवटी क्रम लागतो आहे.
- अभ्यास केलेल्या 56 पैकी 40 देशांमध्ये सन 2011 ते सन 2016 या काळात उत्सर्जन कमी झाले आहे.
- पहिल्यांदाच मध्यम प्रदर्शक देशांच्या गटात चीनने स्थान मिळवले आहे. चीन यादीत 33 व्या स्थानी आहे.
सुप्रसिध्द इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
साहित्य क्षेत्रात मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या सालाचा म्हणजेच 2018 चा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ सुप्रसिध्द इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना जाहीर झाला आहे. यंदाचा हा 54वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे.
अमिताव घोष यांच्याविषयी -
अमिताव घोष यांच्या 'द शॅडो लाइन्स' या 1988 साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फिक्शन आणि नॉन फिक्शन अशा दोन्ही प्रकारांत अमिताव घोष यांनी विपुल लेखन केले आहे.
अमिताव घोष यांचा जन्म कोलकातामध्ये 11 जुलै 1956 साली एका बंगाली कुटुंबात झाला. घोष यांनी आपल्या कारकिर्दीचे सुरुवात इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्रामधून केली. ते हार्वर्ड विद्यापीठाचे गेस्ट लेक्चररदेखील होते. घोष यांच्या द सर्कल ऑफ रीजन, द श्याडो लाइन्स, द कलकत्ता क्रोमोजोम, द ग्लास पॅलेस, द हंगरी टाइड या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री (2007) पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्काराविषयी -
हा भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिला जाणारा भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान आहे. 11 लाख रूपये रोख, प्रमाणपत्र आणि देवीसरस्वती यांची कांस्य प्रतिकृती असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार 1961 सालापासून दिला जात आहे. हा पुरस्कार भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे 22 अधिकृत भाषांपैकी कोणत्याही भाषेमधील लेखणासाठी कोणत्याही भारतीयाला बहाल केला जातो.
ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीकडून पुरस्कारासाठी निवड केली जाते. आतापर्यंत हिंदी भाषेत 11, कन्नड भाषेत 8, बंगाली भाषेत 6 तर गुजराती, मराठी, ओडिया आणि उर्दू भाषेत 4 ज्ञानपीठ पुरस्कार दिले गेले आहेत.
अशोक गेहलोत: राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेस पक्षाचे अशोक गहलोत यांची पुनर्निवड केली जाणार आहे. तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड करण्यात आली आहे.
अशोक गहलोत हे राजस्थानातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी दोनदा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.
राजस्थान विधानसभा निवडणूक 2018 निकाल -
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचे निकाल दि. 11 डिसेंबर 2018 रोजी जाहीर केली गेलीत.
राजस्थान (एकूण 199 जागा)
| काँग्रेस | 99 |
| भाजप | 73 |
| अन्य | 27 |
भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो. ही निवडणूक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते. विधानसभा निवडणूका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत. विधानसभा निवडणुका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.
महिंद्रा राजपक्षे यांनी श्रीलंकेचे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला
श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी दि. 15 डिसेंबर 2018 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्यांना पंतप्रधान म्हणून काम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी केली असून खटल्याची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्या आदेशात बदल करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, त्यांच्या निवडीने घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता. या त्यांच्या निर्णयामुळे देशात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला राजकीय संघर्ष संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
श्रीलंका हा हिंद महासागरातला भारताच्या दक्षिणेकडे असणारा एक बेट राष्ट्र आहे. हा भारताच्या शेजारचा देश आहे. कोलंबो ही या देशाची राजधानी आहे आणि श्रीलंकी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे.
रामफल पवार: राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचे नवे संचालक
नेटग्रिडचे संयुक्त सचिव रामफल पवार यांची राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (NCRB) याच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे. पवार भारतीय पोलीस सेवेचे पश्चिम बंगाल संवर्गाचे 1988 सालाचे अधिकारी आहेत.
याव्यतिरिक्त, गुप्तचर विभागाचे (IB) संचालक राजीव जैन तसेच संशोधन व विश्लेषण शाखेचे (R&AW) सचिव अनिल के. धस्माना यांचा कार्यकाळ सहा महिन्यांसाठी वाढविण्यात आला आहे.
संस्थेविषयी -
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (NCRB) याची स्थापना गृह मंत्रालयाकडून 11 मार्च 1986 ला करण्यात आली. या विभागाचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. हे विभाग देशभरात नोंद झालेल्या खटल्यांचे विश्लेषण करून ‘भारतात गुन्हेगारी’ नावाचा अहवाल दरवर्षी प्रकाशित करते. ‘भारतात गुन्हेगारी’ ची पहिली आवृत्ती सन 1953 मध्ये प्रकाशित झाली.
DIPP अंतर्गत ‘राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे प्रोत्साहन परिषद’ स्थापन होणार
वैद्यकीय उपकरणे संदर्भात क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाच्या (DIPP) अंतर्गत ‘राष्ट्रीय वैद्यकीय उपकरणे प्रोत्साहन परिषद’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशाखापट्टनम येथे ‘वैद्यकीय उपकरणे विषयक चौथ्या जागतिक मंचा’च्या कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
परिषदेविषयी -
- परिषद भारतीय उद्योगांसाठी वेळोवेळी परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित करणार, संस्थांना आणि संबंधित विभागांना तांत्रिक मदत पुरविणार, वैद्यकीय उपकरणांसाठी आंतरराष्ट्रीय नियम आणि मानकांच्या दृष्टीने उद्योगांना जागृत करणार तसेच धोरण वा योजना तयार करण्यासाठी सरकारला सल्ला देणार.
- परिषदेचे नेतृत्व औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाचे सचिव करणार. आंध्रप्रदेश मेडटेक झोन परिषदेला तांत्रिक मदत पुरविणार.
आरोग्यसेवा क्षेत्रात वैद्यकीय उपकरणे निर्मिती उद्योग महत्त्वाची भूमिका पार पाडतो. मात्र भारतात तो मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. भारतीय कंपन्या नावीन्यपूर्ण उत्पादने तयार करीत असून प्रोत्साहन परिषद स्थापन केल्यामुळे देशांतर्गत निर्मितीला चालना मिळणार.
No comments:
Post a Comment