Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, August 30, 2017

    चालू घडामोडी 30 ऑगस्ट 2017 (text)

    Views
    चालू घडामोडी 30 ऑगस्ट 2017 (text)

    🔹‘तेनसिंग नोर्गे’ पुरस्कार रोहन मोरेला प्रदान

    देशातील साहसी खेळासाठी दिला जाणारा ‘तेनसिंग नोर्गे’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे याला मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. देशातील सागरी जलतरण, गिर्यारोहण आणि हवाई साहसी खेळ यात आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्यास दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो. या वेळी सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या ३१ वर्षीय रोहनची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पाच लाख रुपये रोख, प्रशस्तीपत्रक, प्रतिमा आणि ब्लेजर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. रोशनने १९९६मध्ये म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षी धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे ३५ किलोमीटर (सागरी) अंतर पार केले होते. त्यानंतर त्याने इंग्लिश खाडी, अमेरिकेतील कॅटलिना खाडी, मोलिकोई खाडी, न्यूयॉर्कमधील मॅनहंटन बेटाजवळील ४५ किलोमीटरची खाडी, आयर्लंड-स्कॉटलंडमधील आयरीश खाडी, जपानमधील त्सगरू खाडी आणि स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर खाडी यशस्वीरित्या पार केली आहे.

    🔹झझारिया, सरदार यांना खेलरत्न प्रदान

    हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जन्मदिनी आणि राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून भारतातील गुणवत्तावान खेळाडूंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिव्यांग खेळाडू देवेंद्र झझारियाला रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाबद्दल तर गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल हॉकीचा माजी कर्णधार सरदार सिंग यांना खेलरत्न पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. झझारिया हा खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेला पहिलाच दिव्यांग खेळाडू ठरला.

    भालाफेकपटू दिव्यांग खेळाडू झझारियाने २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकले होते तर २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही त्याने पुन्हा सुवर्णपदकविजेती कामगिरी केली. गेल्या काही वर्षांत सरदारच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक स्पर्धा जिंकल्या आणि भारताची कामगिरी आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली.

    झझारियाने दोन ऑलिम्पिक पदके तर जिंकलीच पण २०१३मध्ये जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्ण जिंकले होते. त्याच्या कामगिरीची दखल घेत खेलरत्नसाठी त्याच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.

    ३१ वर्षीय सरदारसिंगवर लैंगिक शोषणाचे आरोप होते पण त्याने हे आरोप फेटाळले होते तसेच सरकारने नियुक्त केलेल्या समितीने सरदारवर विश्वास दाखविला म्हणून त्याची खेलरत्नसाठी निवड निश्चित झाली.

    अर्जुन पुरस्कार विजेत्यांत क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर तसेच चेतेश्वर पुजारा यांचा समावेश होता. पण पुजारा इंग्लंडमध्ये असल्यामुळे या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकला नाही.

    एकूण १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार होते. पुजारा वगळता इतरांनी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून पुरस्कार स्वीकारले.
    झझारियाव्यतिरिक्त या सोहळ्यात मरियप्पन थंगवेलू व वरुण भाटी यांनाही गौरविण्यात आले. दोघांना अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    पुरस्कारांनी सन्मानित खेळाडू असे:

    खेलरत्न :

    देवेंद्र झझारिया (दिव्यांग खेळाडू), सरदार सिंग (माजी हॉकी कर्णधार)

    अर्जुन पुरस्कार :

    व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी), खुशबीर कौर (अथलेटिक्स), अरोकिन राजीव (अथलेटिक्स), प्रशांती सिंग (बास्केटबॉल), देवेंद्रो सिंग (बॉक्सिंग), चेतेश्वर पुजारा (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), ओईनम बेमबेम देवी (फुटबॉल), एसएसपी चौरसिया (गॉल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी), जसवीर सिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश (नेमबाजी), अँथनी अमलराज (टेबलटेनिस), साकेत मायनेनी (टेनिस), सत्यव्रत कादियन (कुस्ती), मरियप्पन थंगवेलू (दिव्यांग खेळाडू), वरुण भाटी (दिव्यांग खेळाडू)

    🔹‘जॅम’मुळे सामाजिक क्रांती

    ‘जॅम’ अर्थात ‘जन धन, आधार व मोबाइल’ या त्रयीमुळे सामाजिक क्रांती सुरू झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी येथे केला. यामुळे नागरिक एकसमान डिजिटल, आर्थिक व डिजिटल मंचावर येतील. ही प्रक्रिया जीएसटीमुळे तयार झालेल्या एकसमान बाजारपेठेसारखी आहे, असेही जेटली यांनी सांगितले. पंतप्रधान जन धन योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये जेटली यांनी हे मत व्यक्त केले आहे.

    देशात ‘एक अब्ज व्हिजन’ सरकारने ठेवले आहे, असे सांगून जेटली यांनी याचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, एक अब्ज आधार क्रमांक एक अब्ज बँक खात्यांशी जोडले जातील तसेच ते एक अब्ज मोबाइल फोनशीही जोडण्यात येतील. यामुळे देशातील सर्व नागरिक आर्थिक व डिजिटल मुख्य प्रवाहात सामील होतील.

    जीएसटीने एक कर, एक बाजारपेठ व एक देश ही स्थिती निर्माण केली आहे, ज्याची तुलना जॅमशी होऊ शकते. जॅम ही केवळ सामाजिक क्रांती नसून त्याचे अनेक लाभ सरकारलाही होत आहेत, तसेच ते गरीबांनाही होत आहेत. गरीबांना यामुळे आर्थिक सेवांचा उपभोग घेता येणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे सरकार देत असलेली विविध अनुदाने नागरिकांपर्यंत थेट पोहोचू शकल्याने वाया जाणारे किंवा चुकीच्या हातांत पडमारे अनुदान वाचवणे सरकारला शक्य झाले आहे. सरकार ३५ कोटी लाभार्थींना ७४ हजार कोटी रुपयांचे थेट हस्तांतरण करत आहे. हे हस्तांतरण पहल, मनरिगा, ज्येष्ठ नागरिक पेन्शन व विद्यार्थी शिष्यवृत्ती अशा योजनांमध्ये होत आहे.

    आजमितीला सुमारे ५२.४० कोटी आधार क्रमांक ७३.६२ कोटी बँक खात्यांशी जोडले गेले आहेत. यामुळे केवळ बँक खाते असलेल्या गरीबांना त्यांच्या बँक खात्यात पेमेंट केली जात आहेत. आधार जोडणीमुळे सुमारे सात कोटी पेमेंट गरीबांना दिली गेली आहेत. भीम अॅप व युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) यामुळे जॅम पूर्णतः कार्यरत झाल्याचा दावाही जेटली यांनी केला आहे.

    🔹चक्रीवादळामुळे हाहाकार

    हार्वे या चक्रीवादळामुळे टेक्सस प्रांतात पाऊस आणि पुरामुळे हाहाकार उडाला आहे. वादळाने आतापर्यंत दहा जणांचा बळी घेतला असून, रस्ते, घरे आणि परिसरात सगळीकडे पाणीच पाणी साठले आहे. तीस हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, लेक ब्रायनचे पाणी गळ्यापर्यंत आल्याने दोन भारतीय विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    पावसात आणि पुराच्या पाण्यात अडकलेल्यांच्या सुरक्षेसाठी बोटींचा वापर केला जात आहे. पुरातून सुटकेचा प्रयत्न करणारे सहा जणांचे एक कुटुंब पाण्यात वाहून गेले. त्यात चार मुलांचा समावेश होता. अखंडपणे पडणाऱ्या पावसामुळे ह्युस्टनचे जनजीवन विस्कळित झाले आहे. ह्युस्टन ते न्यू ऑर्लिन्स या पट्ट्यात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. काही नागरिक घरांच्या छतांवर चढून बसले आहेत. काही जणांनी तर छपरांवर तंबू उभारला आहे. ते सर्व जण बोटी अथवा हेलिकॉप्टरची वाट पाहात आहेत. दरम्यान, या भागात अजूनही २४ इंचांच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. लुईझियाना येथे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे

    🔹जपानच्या दिशेने क्षेपणास्त्र

    अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाने आपल्या राजधानीतून जपानच्या दिशेने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या लष्कराने आणि जपान सरकारने केला आहे. उत्तर कोरियाकडून वारंवार होत असलेल्या क्षेपणास्त्र चाचणीने अमेरिकेबरोबरील संबंधांत तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, या प्रक्षेपणाचा आपल्यासह अमेरिकेकडून अभ्यास करण्यात येत असल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे, तर हे क्षेपणास्त्र प्रशांत महासागरात कोसळल्याचा दावा जपानने केला आहे.

    उत्तर कोरियाने जपानवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सोडण्यावरून दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिका या तिन्ही देशांशी उत्तर कोरियाचे संबंध आणखी तणावाचे बनले आहेत. ‘उत्तर कोरियाच्या या कृतीमुळे जपानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा दलाची तत्काळ बैठक बोलावण्यात यावी; तसेच जपानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडक पावले उचलण्यात येतील,’ जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी म्हटले आहे, तर ‘आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत,’ असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

    उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वीच कमी पल्ल्याच्या तीन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. महिन्याभरापूर्वी दोन इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणीही केली होती. ही चाचणी अमेरिकेच्या भूभागाला क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात होते. त्या शिवाय उत्तर कोरियाने अमेरिकेच्या गुआमच्या दिशेने अनियंत्रितपणे क्षेपणास्त्र सोडण्याची धमकीही दिली होती; परंतु अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या धमकीला ‘अमेरिकाही शस्त्रास्त्रसज्ज आहे,’ असे सडेतोड उत्तर दिले होते. उत्तर कोरियाच्या या कृतीमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियातून निर्यातीवर आणि देशातील गुंतवणुकीवर निर्बंध घातले होते.

    ‘कडक पावले उचलू’

    ‘उत्तर कोरियाकडून जपानच्या दिशेने सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामुळे जपानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. आम्ही या क्षेपणास्त्राची सर्व माहिती घेत असून, त्याचा अभ्यास करीत आहोत, याबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा दलाची तत्काळ बैठक बोलावण्यात यावी; तसेच जपानी नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील,’ जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी म्हटले आहे.

    🔹क्रीडा संचालकपदी केंद्रेकरांची नियुक्ती

    राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांची अखेर बदली करण्यात आली असून, त्यांची राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण संचालकपदी नियुक्ती झाली आहे. केंद्रेकर यांच्या जागी यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतापसिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे.

    कृषी सचिवांच्या परवानगीशिवाय घेतलेली बैठक केंद्रेकर यांना भोवली. ते मंगळवारी कृषी आयुक्तालयात ‘शेतकरी योजना आणि निधीचा वापर’ या विषयावर राज्यातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आढावा घेत असतानाच त्यांच्या बदलीचा आदेश थडकला. त्यामुळे खळबळ उडाली. सचिंद्र प्रतापसिंह यांना तत्काळ पदाची सूत्रे स्वीकारण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

    केंद्रेकर यांच्या बदलीची गेल्या आठवडाभरापासून चर्चा सुरू होती. त्यांनी काही दिवसांपूर्वी कृषी सचिवांच्या परवानगीशिवाय बैठक घेतली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. अखेर त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांची १५ मे रोजी या पदावर नेमणूक झाली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांनी पदभार स्वीकारला होता. केवळ दोन महिन्यांतच त्यांना पायउतार व्हावे लागले आहे.

    No comments:

    Post a Comment