🔹अभिनेत्री सुमिता सान्याल यांचे निधन
ज्येष्ठ हिंदी-बंगाली अभिनेत्री सुमिता सान्याल यांचे 9 जुलै 2017 रोजी निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कोलकात्याच्या देशप्रियो पार्कमधील राहत्या घरी सान्याल यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी काही हिंदी सिनेमांमध्ये काम केले होते. यामध्ये ‘आनंद’सारख्या अजरामर कलाकृतीचा समावेश आहे. ‘आनंद’मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना यांसोबत काम केले आहे. तसेच गुड्डी, आशीर्वाद, मेरे अपने यांसारख्या सिनेमांमध्येही सान्याल यांची महत्त्वाची भूमिका होती.
सुमिता सन्याल यांचं खरं नाव मंजुळा सन्याल असून त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९४५ ला दार्जिलिंगमध्ये झाला होता. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या असून त्यात बंगाली चित्रपटांचं प्रमाण जास्त आहे. ‘कुहेली’, ‘आशिर्वाद’, ‘गुड्डी’, ‘मेरे अपने’ या चित्रपटांतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. हिंदी चित्रपट आणि नाटकांसोबतच मालिकांमध्येही त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या.
१९६० साली ‘खोखाबाबुर प्रत्याबर्तन’ या बंगाली सिनेमातून सान्याल यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. पुढे दिलीप कुमार यांसोबत ‘सगीना महतो’, विश्वजीत यांसोबत ‘कुहेली’ आदी ४०हून अधिक बंगाली सिनेमांमध्ये काम केले. सान्याल यांनी सुबोध रॉय यांच्याशी विवाह केला.
🔹भारत, अमेरिका, जपानचा संयुक्त युद्ध सराव ' मलबार 2017 '
चीनसोबत सीमेवर तणावाचं वातावरण असताना दुसरीकडे भारताने अमेरिका, जपानच्या नौदलासोबत आजपासून युद्ध सराव सुरू केला आहे. 'मलबार २०१७' या युद्ध सरावातून तिन्ही देशांच्या सैन्यातील संबंध अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे. १७ जुलैपर्यंत हा युद्ध सराव चालणार आहे. अशा प्रकारचा युद्ध सराव आयोजित करण्याची ही २१ वी वेळ आहे.
नौदलाच्या पूर्व विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ एच. सी. एस. बिष्ट यांनी बंगालच्या उपसागरात हा युद्ध सराव सुरू करण्याची घोषणा केली. समान धोके आणि अव्हानांचा बिमोड करण्याचा या सरावाचा हेतू आहे, असं बिष्ट म्हणाले. पण भारतीय समुद्रात चिनी पाणबुडीच्या उपस्थितीबाबत त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
'मलबार २०१७' या युद्ध सरावात १६ लढाऊ जहाज, ९५ लढाऊ विमानं आणि दोन पाणबुड्यांचा समावेश आहे. सलग चौथ्या वर्षी जपानची मेरीटाइम सेल्फ डिफेन्स फोर्स (MSDF) मलबारमध्ये सहभागी झाली आहे. १९९२ पासून बंगालच्या उपसागरात दरवर्षी भारत आणि अमेरिकेच्या नौदलात हा युद्ध सराव आयोजित करण्यात येतो.
🔹मोबाईलमध्ये GPS अनिवार्य, किंमती वाढणार!
जानेवारी २०१८ पासून देशातल्या प्रत्येक मोबाईलमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) असणे बंधनकारक होणार आहे. दूरसंचार मंत्रालयाने हा फतवा काढला आहे. फोनमध्ये जीपीएस सुविधा उपलब्ध करून देण्याने फोनच्या किंमतींमध्ये किमान ३० टक्के वाढ होईल असे सांगत मोबाईल कंपन्यांनी जीपीएस बंधनकारक करण्याला विरोध दर्शवला आहे. पण या कंपन्यांची याचिका दूरसंचार मंत्रालयाने फेटाळून लावली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य हवे, त्यासाठी मोबाईल फोनमध्ये जीपीएस यंत्रणा कार्यान्वित असणे गरजेचे आहे, त्यामुळे यापुढे याप्रकरणी मोबाईल कंपन्यांच्या कोणत्याही सबबींची दखल घेतली जाणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. 'आपत्कालीन परिस्थितीत केवळ जीपीएस यंत्रणेमुळे मोबाईलधारकाचा ठावठिकाणा कळतो. त्यामुळे १ जानेवारी २०१८ पासून प्रत्येक फोनमध्ये जीपीएस बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,' असे इंडियन सेल्युलर असोसिएशनला एका पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
केंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ पासून मोबाईलमध्ये 'पॅनिक बटण' आणि १ जानेवारी २०१८ पासून जीपीएस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी मार्चपासून जे नवे मोबाइल बाजारात उपलब्ध झाले, त्यात पॅनिक बटण आहे. फोनच्या किंमतीतच या बटणाची किंमत समाविष्ट झाली. पण जीपीएसमुळे बेसिक फिचर्स असणाऱ्या फोनची किंमत किमान ४०० रुपयांनी वाढणार आहे. याचा परिणाम विक्रीवर होईल अशी उत्पादकांना भिती आहे. याऐवजी फोनला डेटा कनेक्शन नसतानाही टेलीकॉम टॉवरमधून लोकेशन शोधण्याचा पर्याय मोबाईल हँडसेट उत्पादक कंपन्यांनी पुडे केला आहे.
🔹'पॅरिस करारा’वर परस्पर सहमती; अमेरिकेचा वेगळा मार्ग
‘जी-२०’ परिषदेमध्ये अमेरिका वगळता इतर सर्व देशांची पॅरिस हवामानाच्या कराराच्या मुद्द्यावर शनिवारी परस्पर सहमती झाली. पॅरिस कराराच्या मुद्द्यावर स्वतंत्रपणे भूमिका घेण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला रशिया, चीन, युरोपिय युनियन यांच्यासह १९ सदस्यांनी पाठिंबा दिला. व्यापार आणि उद्योगविषयक सहकार्यासाठी अमेरिकेने तयारी दर्शवली असून, याबाबत योग्य ती भूमिका घेण्यात येईल, असेही अमेरिकेने स्पष्ट केले.
दरम्यान, पॅरिस कराराच्या मुद्द्यावर भारत ठाम असून, भारताची गरज आणि तत्त्व यांचा आधार घेऊनच हवामानबदलाबाबत कराराप्रमाणे भारत योग्य ती कार्यवाही करेल, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागलाय यांनी स्पष्ट केले. पॅरिस कराराबाबत अमेरिकेने जाहीर केलेल्या भूमिकेनंतर भारताने भूमिका स्पष्ट केली आहे.
▪️ट्रम्प-पुतिन भेट
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये शनिवारी चर्चा झाली. यांच्याखेरीज ट्रम्प यांनी थेरेसा मे, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही चर्चा केली. पुतिन यांच्याबरोबर खूप छान चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. २०१६मधील निवडणुकांमध्ये रशियाने हस्तक्षेप केल्याच्या आरोपानंतर ट्रम्प यांचे पुतिन यांच्या भेटीबद्दलचे हे पहिलेच विधान आहे.
▪️इतर नेत्यांच्या भेटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांना ‘नॉर्वेजियन पेन्शन फंड’ भारतामध्ये गुंतवण्याचे आवाहन केले. सोलबर्ग यांनी मोदींना या वेळी फूटबॉल भेट दिला. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन, इटलीचे पंतप्रधान पाओलो जेंटिलोनी, अर्जेंटिना अध्यक्ष मौरिशिओ मॅक्री यांच्या भेटी घेतल्या.
🔹५० हजारांपर्यंतचं गिफ्ट GST मुक्त!
जीएसटी देशभरात लागू झाल्यानंतर त्यातले खाचखळगे हळूहळू बाहेर येऊ लागले असून ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचं गिफ्ट दिल्यास त्यावर जीएसटी द्यावा लागेल असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज केलेल्या एका ट्विटमध्ये केले आहे.
कंपन्यांकडून दरवर्षी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या गिफ्टच्या अनुशंगाने हे ट्विट करण्यात आले आहे. वर्षभरात दिल्या जाणाऱ्या गिफ्ट्सची किंमत ५० हजारांच्या आत असल्यास त्यावर कोणताही कर लागणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्याला कोणतीही महागडी वस्तू वा मालमत्ता खरेदी करून दिल्यास तो एकप्रकारचा 'पुरवठा' मानला जाईल. अर्थातच त्यावर अन्य वस्तूंच्या पुरवठ्याप्रमाणे जीएसटी लागेल. त्यात ५० हजार रुपयांपर्यंत टॅक्स लागणार नाही.
🔹अहमदाबाद ठरले जागतिक वारसाप्राप्त शहर
▪️भारतातील पहिलेच शहर : आनंदाचा क्षण असल्याचे मोदींचे उद्गार
गुजरातमधील अहमदाबाद आता जागतिक वारशाचे शहर ठरले आहे. युनेस्कोकडून हा दर्जा मिळविणारे देशातील हे पहिलेच शहर आहे. याच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर ‘हा देशासाठी आनंदाचा क्षण असल्याचे’ नमूद केले. युनेस्कोच्या 41 व्या सत्राच्या पोलंडच्या क्राको शहरात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
अहमदाबादमध्ये हिंदू, इस्लाम आणि जैन धर्माच्या लोकांचे एकत्रित वास्तव्य आणि येथील उत्तम स्थापत्यकलेमुळे याची निवड झाली. अहमदाबादमध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे संरक्षणप्राप्त असणारी 26 ठिकाणे आहेत. महात्मा गांधी देखीर येथे 915 ते 1930 दरम्यान वास्तव्यास होते. येथे त्यांच्या आठवणी टिकवून ठेवणारी अनेक स्थळे आहेत. अहमदाबादच्या निवडीला तुर्कस्तान, लेबनॉन, टय़ूनिशिया, पेरू, कजाकिस्तान, फिनलँड, झिम्बॉब्वे आणि पोलंड समवेत 20 देशांनी समर्थन दिले.
▪️युनेस्कोचे वक्तव्य
15 व्या शतकात सुल्तान अहमद शाह याने वसविलेले अहमदाबाद साबरमती नदीच्या पूर्व किनाऱयावर वसलेले आहे. या शहरात स्थापत्यकलेची अनोखी उदाहरणे आहेत, यात भद्रा गढा, किल्ल्याच्या भिंती आणि त्याचे प्रवेशद्वार, येथील अनेक मशिदी आणि मकबरे, तसेच नंतरच्या काळात उभारण्यात आलेली अनेक हिंदू आणि जैन मंदिरे देखील असल्याचे युनेस्कोने आपल्या वक्तव्यात नमूद केले.
उपखंडातील दोनच शहरांचा समावेश
जगात 287 जागतिक वारसाप्राप्त शहरे आहेत. यातील फक्त दोन शहरे भारतीय उपखंडात आहेत. एक नेपाळमधील भक्तपूर आणि दुसरे श्रीलंकेतील गाले यांचा समावेश आहे. अहमदाबादला वारसाप्राप्त शहराचा दर्जा मिळाल्यानंतर येथील पर्यटनात वृद्धी होईल अशी अपेक्षा आहे.
▪️भारतीयांसाठी अभिमानाची बाब
भाजप अध्यक्ष अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि अहमदाबादचे महापौर गौतम शाह यांनी देखील शहराला मिळालेल्या सन्मानावर आनंद व्यक्त केला. हा सन्मान प्रत्येक भारतीयासाठी गर्वाची बाब असल्याचे अमित शाह यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
🔹हवामान बदल विरोधातील मोहिमेकरता भारताचे कौतुक
हवामान बदलाच्या मोहिमेवरून जागतिक बँकेने भारताचे कौतुक केले आहे. हवामान बदल विषयक मोहिमेत भारताची भूमिका सातत्याने वाढत आहे. सौरऊर्जेबाबत वाढती प्रतिबद्धता, नव्या पद्धती आणि 2030 पर्यंत सर्व लोकांना वीज पुरवठय़ासाठी केल्या जाणाऱया उपायांची सुरुवात करत हवामान बदल विरोधात चालविल्या जाणाऱया मोहिमेत भारत ‘नेता’ ठरल्याचे उद्गार जागतिक बँकेने काढले. स्वच्छ उर्जेच्या वापराला बळ देत भारताने हवामान बदल रोखण्याच्या दिशेने गंभीर योगदान दिले आहे. भारत आणि इतर ठिकाणी सौरऊर्जा कोळशाची जागा घेत आहे. 2022 पर्यत 160 गिगावॅट क्षमतेचे पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना भारत सरकारने आखली आहे. यामुळे लाखो लोकांना मदत मिळेल आणि त्यांची मुले रात्री अभ्यास करू शकतील असे बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले. सरकारच्या या मोहिमेमुळे गुंतवणूकदारांना भारताच्या सौरबाजारात गुंतवणूक करण्याची संधी मिळेल असा दावाही अहवालात करण्यात आला.
🔹गंगा नदीला सजीवतेचा दर्जा देण्यास स्थगिती
उत्तराखंड सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीदरम्यान गंगा नदीबाबत दिलेल्या आदेशामुळे उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. उत्तराखंड न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी गंगेला सजीव नदी (लायव्हींग एन्टायटी)चा दर्जा दिला होता. गंगा ही भारतातील सजीव नदी आहे. त्यामुळे जिवंत व्यक्तीला मिळणारे सर्व हक्क आणि अधिकार तिला मिळणे आवश्यक असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने 20 मार्च 2017 रोजी दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणीदरम्यान दिला होता. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय स्थगित केला आहे. दरम्यान, दुसरीकडे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा नर्मदा नदीला सजीव नदीचा दर्जा घोषित केला आहे.
ऐतिहासिक महत्व असलेल्या गंगा नदीला धर्मग्रंथामध्ये पवित्र नदीचा दर्जा देण्यात आलेला आहे. याकरिता त्या नदीकडे आम्ही ‘सजीव नदी’च्या दृष्टिकोनातून पहातो. देशात राहणाऱया एका व्यक्तीला कायदा आणि संविधानान्वये जे हक्क व अधिकार प्राप्त होतात, ते गंगेला मिळणे आवश्यक असल्याचे मत उत्तराखंड उच्च न्यायालयाने 20 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत मांडले होते.
साध्या, सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास एखादी व्यक्ती जर गंगा नदी प्रदूषित करत असेल तर त्याच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.
पौराणिक ग्रंथामध्ये विशेष महत्व असलेल्या ‘सरस्वती’ नदीचा शोध घेण्यासाठी सरकारने अथक प्रयत्न केले. मात्र, गंगा नदीबाबत असा प्रयत्न झालेला दिसून येत नाही. गंगेबाबत शासकीय पातळीवर विशेष लक्ष दिले असते, तर या नदीला पूर्वीचे रुप आणि प्रवाह नक्कीच प्राप्त झाला असता, असेही उच्च न्यायालयाने म्हटले होते.
▪️उत्तराखंड सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव
गंगा, यमुनासह सहाय्यक नद्यांबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात उत्तराखंड सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. जर गंगा नदीला आलेल्या पुरामध्ये एखादा व्यक्तीचा मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीचे वारसदार राज्याच्या मुख्य सचिवांकडे गंगा नदीविरोधात नुकसानभरपाईसाठी धाव घेऊ शकतात का? जर असा प्रसंग उद्भवला तर यामधून मार्ग कसा काढायचा असा प्रश्नही राज्य सरकारने उपस्थित केला होता.
🔹आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारत अव्वल
चीनला मागे टाकत ऐतिहासिक कामगिरी, 12 सुवर्णांसह एकूण 29 पद
भारताने शेवटच्या दिवशी 5 सुवर्णपदके मिळवित पहिल्यांदाच आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदके मिळवित पहिले स्थान मिळविण्याचा ऐंतिहासिक पराक्रम केला. भारताने चीनची मक्तेदारी संपुष्टात आणत एकूण 29 पदके पटकावली. त्यात 12 सुवर्ण, 5 रौप्य व 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. चीनने दुसरे स्थान मिळविताना 8 सुवर्ण, 7 रौप्य, 5 कांस्यपदके मिळविली.
भारताच्या पुरुष व महिला 4ƒ400 मी. रिलेमध्ये सुवर्णपदके मिळवित स्पर्धेची शानदार सांगता केली. भारताने या स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी नेंदवताना एकूण 29 पदके मिळविली. यापूर्वी 1985 मध्ये जकार्ता येथे झालेल्या स्पर्धेत भारताने 22 पदके (10 सुवर्ण, 5 रौप्य, 7 कांस्य) मिळवित सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. जपानने 1973 ते 1981 पर्यंत झालेल्या पहिल्या पाच स्पर्धांत सर्वाधिक पदके मिळवित पहिले स्थान मिळविले होते. कुवैतमध्ये 1983 नंतर चीनने वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केली आणि दोन वर्षांपूर्वी वुहान येथे झालेल्या स्पर्धेपर्यंत त्यांनी हे वर्चस्व कायम राखले होते. यावेळी त्यांची मक्तेदारी मोडून काढण्यात भारताने यश मिळविले. पुढील महिन्यात लंडनमध्ये होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी चीनने अव्वल खेळाडूंना राखून ठेवत या स्पर्धेत दुय्यम खेळाडूंना उतरवले होते.
▪️अर्चनाचे सुवर्ण काढून घेतले
भारताचे आणखी एक सुवर्णपदक मात्र हुकले. महिलांच्या 800 मी. धावण्याच्या शर्यतीत अर्चना आढावने सुवर्णपदक मिळविले होते. पण लंकेच्या निमाली वालिवर्षा कोन्डाने फिनिशलाईनजवळ असताना अर्चनाने ढकलल्याची तक्रार केल्यावर अर्चनाचे सुवर्ण काढून घेण्यात आले. यामुळे भारताला एका सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले. अर्चनाने 2 मि. 05 सेकंदाचा अवधी नोंदवला होता तर निमालीने 2:05.23 से. वेळ घेत दुसरे स्थान मिळविले होते. लंकेच्या गायंतिका तुशारीने कांस्य घेतले होते.
शेवटच्या दिवशी भारतीयांनी चमकदार कामगिरी करून स्थानिक प्रेक्षकांना खुश केले. महिलांच्ज्या हेप्टॅथ्लॉनमध्ये स्वप्ना बर्मनने दिवसातील पहिले सुवर्ण भारताला मिळवून दिले. तिने सात क्रीडाप्रकारांत मिळून 5942 गुण मिळविले. यातील 800 मी.ची शेवटची शर्यत पूर्ण केल्यावर ती ट्रकवर कोसळल्यानंतर तिच्यावर लगेचच उपचार करण्यात आले. जपानच्या मेग हेमफिलने रौप्य (5883), भारताच्या पूर्णिमा हेम्ब्रमने कांस्य (5798) मिळविले.
लक्ष्मणन गोविंदाने स्पर्धेतील दुसरे सुवर्ण मिळविताना 10,000 मी. शर्यत जिंकली. त्याने 29 मि.55.87 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. भारताच्याच गोपी थोनकनलने रौप्य (29:58.89) मिळविले. भालाफेकमध्ये कनि÷ विभागात विश्वविक्रम नोंदवलेल्या नीरज चोप्राने 85.23 मी. भालाफेक करीत सुवर्ण मिळविले. देविंदर सिंगने कांस्य (83.29) मिळविले.
पुरुष रिले संघात कुन्हू मुहम्मद, मोहम्मद अनास, राजिव अरोकिया, अमोज जेकब यांचा समावेश होता. त्यांनी 3 मि.2.92 से. अवधी घेत सुवर्ण मिळविले. महिलांमध्ये निर्मला शेरॉन, एम. पुवम्मा, जिस्ना मॅथ्यू, देवश्री मजुमदार यांनी 3:31.34 से. अवधी घेत पहिले स्थान मिळविले. याशिवाया पुरुषांच्या 800 मी. शर्यतीत जिन्सन जॉन्सनने तर महिलांच्या हेप्टॅथ्लॉनमध्ये पूर्णिमा हेम्ब्रमने कांस्यपदक मिळविले.
No comments:
Post a Comment