ज्येष्ठ लेखिका कृष्णा सोबती यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर
साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव
साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आजवर कृष्णा सोबती यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
१९८० मध्ये ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १९९६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली. कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या ‘जिंदगीनामा’, ‘ऐ लडकी’, ‘मित्रो मरजानी’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या. हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून ती भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्पना विलास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
‘नफिसा’, ‘सिक्का बदल गया’ ‘बादलोंके घेरे’, ‘बचपन’ या कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या. त्या एक व्याख्यात्या आणि भाषांतरकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याबाबतही सरकारकडून विचारणा झाली होती मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला. सोबती यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण लाहोरमध्ये झाले. फाळणीनंतर सोबती यांनी आपल्या नवऱ्यासोबत भारतात वास्तव्य करणेच पसंत केले.
सोबती यांच्या हिंदी लिखाणात पंजाबी आणि उर्दू शब्द सर्रास यायचे. त्यांनी कादंबरीत किंवा कथांमध्ये निर्माण केलेल्या काल्पनिक पात्रांच्या तोंडी सामान्यांना समजेल अशी भाषा आहे. त्याचमुळे त्यांची पुस्तके आणि कादंबऱ्या गाजल्या. ‘मित्रो मरजानी’ ही कादंबरी त्यांनी १९६६ मध्ये लिहिली. या कादंबरीत विवाहित स्त्रीच्या लैंगिक भावनांचे चित्रण होते त्यामुळे ही कादंबरी त्याकाळी चर्चेचा विषय ठरली होती. हिंदी भाषेला वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या या लेखिकेला साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात येणार आहे.
कृषीपंपांना वीज पुरवण्यासाठी अभिनव ‘सौर-मंत्र’!
राज्यातील एकूण वीजवापराच्या ३० टक्के वीज ही शेतीसाठी वापरली जाते.
पथदर्शक प्रकल्पाचे आज राळेगणसिद्धीत भूमिपूजन
राज्यभरातील कृषीपंपांना अखंड वीजपुरवठा करण्याचे आव्हान पेलताना सरकारची दमछाक होते. त्यात वीजबिले थकण्याचे प्रमाणही लक्षणीय असल्याने खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा, हे आव्हानही असतेच. या परिस्थितीवर मात करीत शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसभर बारा तास सलग वीज पुरविण्यासाठी नवा अभिनव ‘सौर-मंत्र’ दुमदुमणार आहे. पारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे शनिवारी दोन मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जात असून राज्यातील ही पहिलीच ‘सौर कृषीवाहिनी योजना’ इतर राज्यांनाही मार्गदर्शक ठरणार आहे.
महानिर्मिती आणि मुंबई येथील ‘संगम एनर्जी अॅडव्हायजर’ ही कंपनी यांच्यावतीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा,’ या पद्धतीने सहभागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथून नारायण गव्हाण वीजउपकेंद्रापर्यंत सौर वीजवाहिनी उभारून वीज नेली जाईल. परिसरातील शेतीपंपांना त्याद्वारे दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्यात येईल. या प्रकल्पात सौरपॅनेल उभारण्यासाठी घेतलेली जागा टेकडीवर असून पिकांखालील क्षेत्र वापरले जाणार नाही. फेब्रुवारी अखेपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.
राज्यातील एकूण वीजवापराच्या ३० टक्के वीज ही शेतीसाठी वापरली जाते. पण पावसाळ्यानंतर विहिरीचे पाणी वाढून विजेची मागणी वाढते. त्यामुळे रोहित्रांवर अतिरिक्त दाब येतो. रोहित्र जळण्याचे आणि बिघडण्याचे प्रमाण वाढते. त्यात ग्रामीण भागात १२ तास भारनियमन केले जाते. महिन्यातील १४ दिवस तर शेतीपंपांना केवळ रात्रीच वीजपुरवठा केला जातो. या सर्व समस्यांतून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्री या योजनेसाठी आग्रही होते, अशी माहिती महानिर्मितीचे अधीक्षक अभियंता आर. बी. चव्हाण यांनी दिली. तर या योजनेची सुरुवात नगर जिल्ह्यातून होत आहे, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची असल्याचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या भूमिपूजनास ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, पालकमंत्री राम िशदे, खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी आदी उपस्थित राहणार आहेत.
अण्णा आणि मुख्यमंत्री एकत्र!
- भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते होणार असून अण्णा हजारे हेदेखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांत हजारे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यामुळे या कार्यक्रमात दोघेही नेमके काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.
आकडेमोड..
- दोन मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी साडेतीन हेक्टरची जागा शेतकऱ्यांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे.
- प्रकल्प उभारणीसाठी ८ कोटी रुपयांचा खर्च. प्रतियुनिट २ रुपये ९४ पैसे दराने वीजपुरवठा.
- जमिनीचे भाडे आणि वीजवाहिनी यासाठी महानिर्मिती ७० लाखांचा खर्च करणार.
शेतीपंपाला कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने रोहित्र जळतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी वेळ जातो. रात्री सर्पदंश आणि बिबटय़ाचे हल्ले, हे धोके असल्याने पिकांना पाणी देणे धोकादायक बनले आहे. आता सौर कृषीवाहिनीमुळे शेतकऱ्यांची समस्या दूर होईल.
– लाभेश औटी, उपसरपंच, राळेगणसिद्धी
बैल घोड्यासारखा धावू शकतो का?
मुंबईः पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि मराठवाड्यात बैलगाडा शर्यती प्रचंड लोकप्रिय असल्या तरी मुंबई उच्च न्यायालयाने अशा शर्यतींवर बंदी आणल्यामुळे राजकीय पुढाऱ्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळेच या प्रश्नावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली असून, ही समिती शर्यतींच्या दृष्टीने बैल आणि घोडा यांच्यातील शरीररचनेचा तुलनात्मक अभ्यास करून आपला अहवाल महिनाभरात राज्य सरकारला सादर करणार आहे.
बैलगाडा शर्यतीला राज्य सरकारने परवानगी द्यावी या मागणीसाठी गेल्या शनिवारी पुणे-नाशिक महामार्गावर चाकणनजीक सर्वपक्षीय आंदोलन झाले. बैल रस्त्यावर सोडून महामार्ग अडविण्यात आला होता. या कोंडीत हजारो वाहने अडकून त्यांतील पुणे व नाशिककरांचे तीन-चार तास अतोनात हाल झाले. बैलगाडा शर्यतीच्या परवानगीचा प्रश्न न्यायालयीन चौकटीत अडकला आहे. पण, तमिळनाडूची जनता रस्त्यावर उतरून जलिकट्टू (बैलांच्या शर्यतीचा खेळ) सुरू करण्यात यश मिळविते. मात्र, ‘शेतकऱ्यांसाठी सरकार’ असा कैवार मिरविणारे महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकार बैलगाडा शर्यती सुरू करण्यातील कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी प्रभावी प्रयत्न करताना दिसत नाही, असा आरोप होत आहे. ‘बैल हा घोड्यासारखा कार्यकौशल्य प्रदर्शित करणारा प्राणी नाही. बैलाची शरीररचना विचारात घेता हा प्राणी शर्यतीमध्ये धावण्यासाठी सक्षम नाही’, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्या पार्श्वभूमीवर बैल आणि घोडा यांच्या तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी सरकारने पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती नेमली आहे.
No comments:
Post a Comment