चालू घडामोडी 10 नोव्हेंबर 2017
लोकसत्ता,
सकाळ,
महाराष्ट्र टाईम्स,
तरुण भारत
‘इंडियन पॅनोरमा’त मराठीचा झेंडा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
गोव्यात होणाऱ्या ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात तब्बल नऊ मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. इंडियन पॅनोरमात मराठी चित्रपटांनी आत्तापर्यंत मारलेली ही सर्वांत मोठी मजल आहे.
गोव्यामध्ये २० ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागातील २६ चित्रपटांची निवड गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली. त्यामध्ये, मराठी चित्रपटांचा झेंडा डौलाने फडकला असून, तब्बल नऊ चित्रपटांचा त्यामध्ये समावेश आहे. ‘इंडियन पॅनोरमा’मध्ये आत्तापर्यंत मल्याळी, तमिळ चित्रपटांचा सर्वाधिक भरणा असायचा. तीन ते चार मराठी चित्रपटांना यामध्ये स्थान मिळायचे. यंदा प्रथमच मराठी चित्रपटांची संख्या सर्वाधिक आहे. इतर सर्व भाषिक चित्रपटांना मागे टाकून इंडियन पॅनोरमावर वर्चस्व राखण्यात मराठी चित्रपटांना यश मिळाले आहे.
६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम चित्रपटांचे सुवर्णकमळ प्राप्त करणाऱ्या ‘कासव’ चित्रपटासह ‘क्षितिज-एक हॉरिझॉन’, ‘कच्चा लिंबू’, ‘मुरांबा’, ‘पिंपळ’, ‘माझं भिरभिरं’, ‘रेडु’, ‘इडक’ आणि ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या १२ सदस्यांच्या परीक्षक मंडळाने देशभरातील दीडशे चित्रपटांमधून पॅनोरमासाठी २६ चित्रपटांची निवड केली आहे. इंडियन पॅनोरमामध्ये निवडण्यात आलेल्या व्हेंटिलेटर, मुरांबा, कच्चा लिंबू यासारख्या चित्रपटांना समीक्षकांसह प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळाली होती. तर, यातील काही चित्रपट येणाऱ्या काळात प्रदर्शित होणार आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या संख्येत वाढ होत आहेच; पण त्याचबरोबर गुणात्मकदृष्ट्या मराठी चित्रपट प्रादेशिक पातळीवर जोरदार स्पर्धा करत आहेत. नवीन विषय, नव्या दमाचे लेखक-दिग्दर्शक, वेगळ्या स्वरूपाची मांडणी यामुळे मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढला असून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये विविध पुरस्कार मिळविण्यात मराठी चित्रपटांनी बाजी मारली आहे.
No comments:
Post a Comment