Views
आशियाई फुटबॉल महासंघातर्फे इंडियन सुपर लीगला अधिकृत मान्यता :
- आशियाई फुटबॉल महासंघाने (एएफसी) इंडियन सुपर लीगला (आयएसएल) अखेर अधिकृत मान्यता प्रदान केली. त्यामुळे आता देशात 2017-18 पासून दोन राष्ट्रीय लीग होतील.
- तसेच या लीगला पहिली तीन वर्षे एएफसीची मान्यता नव्हती व गेल्या काही कालावधीपासून त्यांनी मान्यतेसाठी प्रयत्न केला होता.
- एएफसीने अखेर अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) प्रस्ताव मान्य केला.
- आता आयलीग विजेता एएफसी चॅम्पियन्स लीग क्वालिफायरमध्ये सहभाग घेईल, तर पुढील आयएसएल चॅम्पियन एएफसी कप क्वॉलिफाइंगमध्ये सहभागी होईल.
34व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्णपदक :
- भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेतर्फे आयोजित 34व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या उत्कर्ष गोर, संजिती सहा, वेदिका अमीन यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले.
- म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील जलतरण तलावावर ही स्पर्धा सुरू झाली. 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुलांच्या गटात उत्कर्षने 34.30 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
- उत्कर्ष हा दिल्ली पब्लिक स्कुलमध्ये पाचवीत शिकत असून हार्मनी क्लब येथे नरेंद्र आचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
भारताच्या 95 सदस्यांचा संघाची निवड :
- भुवनेश्वर येथे 6 ते 9 जुलै दरम्यन होणाऱ्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने आपला 95 सदस्यांच्या संघाची निवड केली.
- विशेष म्हणजे, भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा यजमान भारताचे नेतृत्व करण्यास सज्ज झाला आहे. भारताच्या संघात 46 महिला खेळाडू आहेत.
- कलिंगा स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त पदके जिंकण्याच्या निर्धाराने भारताने आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारे सर्व खेळाडू लंडन येथे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी थेट पात्र ठरणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा सर्वच खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची बनली आहे.
1 जुलैपासून आधार आणि पॅन कार्ड जोडणे बंधनकारक :
- केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे 1 जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे.
- केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत 12-अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2017-18 च्या वित्त विधेयाकामध्ये कर प्रस्तावात दुरुस्त्याद्वारे सुधारणा करून आधार अनिवार्य केले आणि यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे.
- प्राप्तिकर कायद्यातील तरतुदीनुसार येत्या 1 जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आधार आणि पॅन एकमेकांशी संलग्न असणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्या नागरिकांचे पॅन कार्ड रद्द होईल.
- प्राप्तिकर संकलन वाढवत करचुकवेगिरी करणार्या लोकांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सरकारने म्हटले आहे.
- महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2017 पर्यंत ज्या व्यक्तीला पॅन कार्ड देण्यात आले आहे अश्या प्रत्येक व्यक्तीला कलम 139-एएच्या उपकलम (2) च्या तरतुदींनुसार पॅन कार्ड आधार क्रमांकाची जोडणे आवश्यक आहे.
दिनविशेष :
- प्रसिध्द नाटककर, साहित्यिक व विनोदी लेखक 'श्रीपाद कृष्ण कोल्हटकर' यांचा जन्म 29 जून 1871 मध्ये झाला.
- 29 जून 2000 हा मराठी ऐतिहासीक कादंबरीकार कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर यांचा स्मृतीदिन आहे.