भूपेश बघेल: छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री
छत्तीसगड राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी भूपेश बघेल (काँग्रेस पक्षाचे) यांची निवड करण्यात आली आहे. भूपेश बघेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.
भूपेश बघेल यांनी 1980च्या दशकात काँग्रेसमधून राजकारणास सुरुवात केली होती. दुर्ग जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष झाले. ते सन 1990-94 पर्यंत जिल्हा युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष होते. 2000साली जेव्हा छत्तीसगड वेगळे राज्य झाले तेव्हा ते पाटण मतदारसंघातून निवडून आले. याचदरम्यान ते कॅबिनेट मंत्रीही झाले. 2003 साली काँग्रेस सत्तेतून बाहेर झाल्यानंतर भूपेश यांना विरोधी पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले. 2014 साली त्यांना छत्तीसगड काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले.
छत्तीसगड राज्य विधानसभा निवडणूक निकाल -
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल दि. 11 डिसेंबर 2018 रोजी जाहीर केले गेलेत.
छत्तीसगड (एकूण 90 जागा)
काँग्रेस
68
भाजप
15
अन्य
7
भारतातली विधानसभा निवडणूक म्हणजे ती निवडणूक ज्यामध्ये भारतीय मतदाता विधानसभा (किंवा विधिमंडळ / राज्य विधानसभा) मधील सदस्यांची निवड करतो. ही निवडणूक दर 5 वर्षांनी आयोजित केली जाते आणि विधानसभेच्या सदस्यांना आमदार (MLA) म्हणून संबोधले जाते. विधानसभा निवडणूका सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकाच वर्षी घेतल्या जात नाहीत. विधानसभा निवडणूका या देशातील 29 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांपैकी 2 (दिल्ली आणि पुडुचेरी) मध्ये आयोजित केल्या जातात.
‘राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था’ (NRTI): वडोदरात देशातले पहिले रेल्वे विद्यापीठ
गुजरातच्या वडोदरा शहरात देशातले पहिले रेल्वे विद्यापीठ उभारण्यात आले असून त्याला ‘राष्ट्रीय रेल्वे आणि परिवहन संस्था’ (NRTI) असे नाव देण्यात आले आहे.
या विद्यापीठाचे लोकार्पण केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि गुजरातचे मुख्यमंत्री विज रुपाणी यांच्या हस्ते पार पडले.
रशिया आणि चीननंतर, रेल्वेच्या कामकाजाशी संबंधित शिक्षण देणारे हे जगातले तिसरे विद्यापीठ आहे. ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजीत BSc आणि ट्रान्सपोर्टेशन मॅनेजमेंटमध्ये BBA हे दोन अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केले आहेत. ट्रान्सपोर्ट अँड सिस्टीम डिझाइन, ट्रान्सपोर्ट सिस्टीम्स इंजिनियरिंग, ट्रान्सपोर्ट पॉलिसी अँड इकॉनॉमिक्स यासारख्या क्षेत्रांमध्ये 2019-20 च्या शैक्षणिक सत्रापासून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा उद्देश विद्यापीठाने राखला आहे.
बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन इन ट्रान्सपोर्ट मॅनजमेंट या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रात व्यवस्थापन तंत्राचे शिक्षण दिले जाणार असून हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असेल.
बॅचलर ऑफ सायन्स इन ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा असून यात वाहतूक क्षेत्रात वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे.
मिस इंडिया वर्ल्डवाइड 2018 विजेती: श्री सैनी (अमेरिका)
पंजाबमध्ये जन्माला आलेली भारतीय वंश असलेली अमेरिकेची श्री सैनीहिने ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2018’ स्पर्धेचा मुकुट जिंकला.
ऑस्ट्रेलियाची साक्षी सिन्हा आणि ब्रिटनची अनुशा सरीन ह्या स्पर्धेच्या 27 व्या आवृत्तीमधील अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेत्या ठरल्या आहेत.
न्यू जर्सीच्या फोर्ड्स सिटीमध्ये या सौंदर्यस्पर्धेचे आयोजन केले गेले होते. यावर्षी 17 देशांमधून भारतीय मूळ असलेल्या सौंदर्यवतींनी भाग घेतला होता.
स्पर्धेविषयी -
मिस इंडिया वर्ल्डवाइड ही 1990 साली महिलांसाठी सुरू करण्यात आलेली एक सौंदर्यस्पर्धा आहे. या स्पर्धेत भारतामधील आणि इतर देशांमध्ये भारतीय मूळ असलेल्या रहिवासी स्पर्धक भाग घेतात.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरामधील ‘इंडिया फेस्टिवल कमिटी’ या स्पर्धेचे आयोजन करते आणि धर्मात्मा सरन हे या समितीचे संस्थापक आहेत.
बेल्जियम: 2018 सालाचा पुरुष हॉकी विश्वचषक विजेता
पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेल्जियमने नेदरलँड संघाला 3-2 ने पराभूत करून प्रथमच विजेतेपद जिंकले आहे. भारतात भुवनेश्वर (ओडिशा राज्य) शहरात ‘FIH हॉकी विश्वचषक 2018’ स्पर्धा या देशात खेळली गेली.
स्पर्धेचे अन्य पुरस्कृत -
- गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या स्थानासाठी (कांस्यपदक) झालेल्या लढतीत इंग्लंडचा पराभव केला.
- तीन गोल झळकावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या टॉम क्रेगला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) हे फील्ड हॉकी आणि इनडोर फिल्ड हॉकी खेळाचे आंतरराष्ट्रीय प्रशासकीय मंडळ आहे. याचे मुख्यालय लुसाने (स्वित्झर्लंड) येथे आहे. FIH चे पाच खंडात एकूण 128 सदस्य संघ आहेत. FIH दर चार वर्षांनंतर पुरुष हॉकी विश्वचषक (1971 सालापासून) महिला हॉकी विश्वचषक (1974 सालापासून) या स्पर्धा आयोजित करते.
रशियाचे ‘अॅकेडेमिक लोमोनोसोव्ह’: जगातली पहिली पाण्यावर तरंगती अणुभट्टी
रशियाने प्रथमच एक तरंगते अणुऊर्जा निर्मिती केंद्र एका जहाजावर उभे केले आहे आणि ही जगातली पहिली पाण्यावर तरंगत असलेली अणुभट्टी आहे.
या तरंगत्या अणुभट्टीला ‘अॅकेडेमिक लोमोनोसोव्ह’ हे नाव देण्यात आले आहे. ही अभिनव संकल्पना रशियाच्या ‘रोसेटोम’ या अणुऊर्जा कंपनीने साकारली आहे. याची उभारणी सेंट पीटर्सबर्गमध्ये केली गेली.
या अणुऊर्जा संयंत्राचा आकार 144 मीटर x 30 मीटर असा असून हा 21,000 टन वजनी आहे. यामध्ये प्रत्येकी 35 मेगावॉट क्षमतेचे दोन रिएक्टर आहेत, जे 2 लक्ष लोकसंख्या असलेल्या शहराला वीज पुरवठा करण्यास सक्षम आहेत. यामुळे दुर्गम भागात वायू व तेल उत्खनन मंचांना वीज दिली जाऊ शकणार. याच्या मदतीने वर्षाला 50 हजार टन कार्बन-डायऑक्साइडचे उत्सर्जन टाळले जाऊ शकते.
ऑस्ट्रेलियाने इस्रायलची राजधानी म्हणून जेरुसलेमला मान्यता दिली
दि. 16 डिसेंबर 2018 रोजी ऑस्ट्रेलियाच्या सरकारने विवादित जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आणि तेल अवीवमधील त्यांचे दूतावास जेरुसलेममध्ये हलविण्याची घोषणा देखील केली आहे. या निर्णयानंतर ऑस्ट्रेलिया त्यांचे तेल अवीवमधील दूतावास शांती करारानंतर जेरुसलेममध्ये हलवेल.
यासोबतच ऑस्ट्रेलिया विवादित जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला समर्थन देणार्या देशांमध्ये सामील झाला आहे. शिवाय मार्शल बेटे, मायक्रोनेशिया, नौरु, पलाउ, टोगो, ग्वाटेमाला आणि इस्रायल या देशांनी जेरूसलेमला इस्रायलची राजधानी मानण्यास समर्थन दिलेले आहे.
मात्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने जेरुसलेमला इस्रायलची राजधानी मानण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरुद्ध मतदान केले आहे. हा एकतर्फी निर्णय अमान्य केलेला आहे.
जेरुसलेम राजधानीचे ठिकाण करण्यावरून इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात दीर्घकाळापासून विवाद सुरू आहेत. दोन्ही देश जेरुसलेम हा आपल्या देशाचा भाग असून आपली राजधानी असल्याचा दावा वारंवार करीत आहेत. यहुदी धर्म, इस्लाम व ख्रिश्चन धर्माचे मुख्य ठिकाण म्हणून जेरुसलेम शहराची ओळख असल्याने हा आंतरराष्ट्रीय विवादाचा मुद्दा बनत आहे.
‘हवाई उड्डाण व सागरी संपर्क अधिनियम-2018’ अधिसूचित
केंद्र सरकारने ‘हवाई उड्डाण व सागरी संपर्क अधिनियम-2018’ अधिसूचित केले आहे. या नियमानुसार, लोकांना भ्रमणध्वनीचा (सेलफोन) वापर करण्याची परवानगी दिली जाणार.
ठळक वैशिष्ट्ये -
- भारतीय क्षेत्रात विमानप्रवासादरम्यान कॉल करण्यास आणि इंटरनेटचा वापर केला जाईल.
- भारतीय आणि परदेशी विमानसेवा आणि जलवाहतूक कंपन्या भारतीय दूरसंचार परवाना धारकासह भागीदारीमध्ये या सेवा प्रदान करू शकतात.
- इन-फ्लाइट आणि मेरीटाईम कनेक्टिव्हिटी (IFMC) जमिनीवर तसेच उपग्रहाद्वारे दूरसंचार नेटवकचा वापर करुन प्रदान केली जाणार. ही सेवा भारतीय आणि परदेशी उपग्रहांचा वापर करून दिली जाणार.
- स्थानिक मोबाईल नेटवकमध्ये हस्तक्षेप टाळण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्रात किमान 3,000 मीटर उंची गाठल्यानंतर IFMC सेवा सक्रिय केली जाईल.
No comments:
Post a Comment