![]() |
अॅलन ट्यूरिंग |
आज आपण संगणक शास्त्राचा वापर करून जी काही तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत, त्याचे सर्व श्रेय अॅलन ट्युरिंगकडे जाते. आधीच्या काळी, संगणक हा फक्त त्यामध्ये फिड करण्यात आलेल्या गोष्टी करण्यापुरताच मर्यादित होता. त्यासाठीदेखील खूप कष्ट घ्यावे लागत. ‘त्या’ काळात अतिशय अशक्यप्राय समजली जाणारी गोष्ट म्हणजे मशीनला विचार करायला लावून, तिच्याकडून एखादे काम करवून घेणे. आणि यात अॅलन यशस्वी झाला होता. अॅलन ट्युरिंगच्या कामाचा, प्रोग्रामिंग भाषा तयार करण्यामध्ये मोठा प्रभाव आहे. एवढेच नव्हे तर आज ‘मानवनिर्मित बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence) ही जी संगणकीय शास्त्राची एक शाखा आहे, तिचादेखील अॅलन ट्युरिंगच जनक आहे. गूगलची ‘सेल्फ-ड्रायव्हिंग कार’, मायक्रोसॉफ्टचे ‘कोर्टाना’ (Cortana) आणि अॅपलची‘सिरी’ (Siri) हे वैयक्तिक सहाय्यक (PA) अॅप्, Cleverbot, ... हे सर्व याच शाखेचे उपयोजनं आहेत. पण दुर्दैवाची बाब म्हणजे, एवढे महत्वाचे संशोधन करूनदेखील त्याला जिवंतपणी कधीच आदराची वागणूक देण्यात आली नाही. त्याच्या वाट्याला नेहमी दुखःच आले. तो समलैंगिक असल्यामुळे त्याचा खूप छळ करण्यात आला. आणि शेवटी परिस्थितीला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
![]() |
Add caption |
अॅलन ट्युरिंगचा जन्म २३ जून,१९१२ साली, लंडन येथे एका उच्च-मध्यम कुटुंबामध्ये झाला. त्याचे वडिल ‘जुलिअस’ हे भारतीय नागरी सेवेत कामाला होते. ते अस्खलितपणे तमिळ आणि तेलुगु भाषा बोलत असत. भारतामध्येच त्यांची भेट ‘इथेल सारा स्तोनेय’ नावाच्या मुलीसोबत झाली. ती मद्रास (सध्याचे चेन्नई) येथील रेल्वे विभागाच्या मुख्य अभियांत्रिकाची मुलगी होती. दोघांचे सुत जुळले होते आणि त्यांचा राहणीमानाचा ‘दर्जा’(?) देखील बरोबरीचा होता. तेव्हा दोघांनी लग्न केले. त्यांना दोन मुले झाली. अॅलन ट्युरिंग हा धाकटा मुलगा होता. अॅलनच्या कुटुंबाचा शैक्षणिक आणि वैज्ञानिक जगाशी फारसा संबंध नव्हता. त्याचा मोठा भाऊ हा लंडनचा कायदेपंडित होता. पण अॅलन ट्युरिंग मात्र त्याच्या कुटुंबीयांपेक्षा खूपच वेगळा बनणार होता. वयाच्या सहाव्या वर्षी, अॅलन ट्युरिंग त्याच्या पालकांसोबत भारतात येणार होता पण तब्येतीच्या कारणास्तव तो आला नाही. त्यानंतर तो ‘शेर्बोर्ने पब्लिक स्कूल’मध्ये गेला.
अॅलन ट्युरिंगला लहानपासुनच गणित व विज्ञानाकडे नैसर्गिक ओढ होती आणि ‘शेर्बोर्ने पब्लिक स्कूल’मध्ये शिक्षकांचा भर हा साहित्यावर होता. अॅलन ट्युरिंगची गणित आणि विज्ञानाविषयी असलेली आवड हि अभ्यासाच्या बाहेरील होती. तेव्हा तेथील शिक्षकांनी अॅलनच्या आईला बोलावून, ‘त्याला जर वैज्ञानिक क्षेत्रात कारकीर्द करायची असेल तर तो येथे त्याचा वेळ वाया घालवत आहे.’ असे स्पष्टपणे सांगितले होते. लहानपणीच ‘कॅल्क्युलस’ (गणिताचा एक प्रकार) न शिकताच तो गणितातील अतिशय कठीण प्रश्न सोडवत असे. वयाच्या १६व्या वर्षी, त्याची आईन्स्टाईनच्या कामाशी ओळख झाली. तेव्हा आईनस्टाईनच्या सर्व कामाचा स्वतःच अभ्यास करून, त्याने त्याच्या नोट्सदेखील बनवल्या होत्या.
ट्युरिंगच्या नोट्सचे पदवी पातळीवर कौतुक केले जाते. अॅलन ट्युरिंग हा इतर मुलांपेक्षा खूपच वेगळा होता. तो नेहमी एकटाच राहत असे. आणि त्याचे वर्गमित्र त्याची नेहमीच चेष्टा करत असे. ट्युरिंगच्या मनावर या सर्व गोष्टींचा परिणाम झाला होता, म्हणूनच त्याने आयुष्यभर पुढे शांततेचा पुरस्कार केला. त्याचा तिथे एकच मित्र होता. त्याचे नाव होते ‘ख्रिस्तोफर मोर्कॉम’. एकदा असेच वर्गमित्र ट्युरिंगची थट्टा करत असताना, ख्रिस्तोफरने त्याची सुटका केली होती. अशाप्रकारे त्यांची ओळख झाली. त्या दोघांनाही गणितामध्ये विशेष रस होता. ट्युरिंगला जी ‘कोड ब्रेकिंग’मध्ये आवड होती, तीदेखील ख्रिस्तोफरमुळेच. ट्युरिंग मात्र ख्रिस्तोफरकडे आकर्षित झाला होता. ख्रिस्तोफर हा ट्युरिंगचा पहिला प्रेमी होता. ते दोघे विविध विषयांवर चर्चा करत असत. पण जेव्हा ख्रिस्तोफर क्षयरोग झाल्याने मेला, तेव्हा त्याच्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला. आणि ‘आता ख्रिस्तोफरची स्वप्ने मलाच पूर्ण करायची करायची आहेत’ या उद्देशाने त्याने खूप अभ्यास करायला सुरुवात केली होती.
पुढे १९३१ साली, गणितशास्त्रामध्ये पदवी घेण्यासाठी तो केंब्रीज येथील किंग्स कॉलेजमध्ये गेला. आणि प्रथम श्रेणी घेऊन तो तेथून बाहेर पडला. तो त्यावेळी किंग्स शिष्यवृत्तीला पात्र ठरला होता, तसेच ‘Probability Theory’ मध्ये योगदान दिल्याबद्दल Smith’s Prize मिळाले होते. त्या काळी ‘Decision Problem’ क्षेत्रात शोध लावण्यासारखे खूप सारे बाकी होते. ‘Decision Problem’ मध्ये एक प्रश्न असतो आणि त्याचे उत्तर फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्येच असू शकते. एका नंतर एक मिळालेल्या उत्तरापासून आपण संच (Set) तयार करत जातो, आणि कोणती समीकरणे सिद्ध करता येतात, कोणती समीकरणे सिद्ध करता येत नाहीत हे पाहू शकतो. वयाच्या २४ व्या वर्षी त्याने, ‘On Computable Numbers with an application to the decision problem’ हा शोधनिबंध जगासमोर सादर केला.
गंमत म्हणजे अॅलन ट्युरिंग ज्या निष्कर्षापर्यंत पोहोचला होता, त्याच निष्कर्षापर्यंत ‘अलोन्झो चर्च’ हा गणितज्ञदेखील पोहोचला होता. पण शेवटी दोन्ही प्रबंधांची तपासणी केल्यावर अॅलन ट्युरिंगची निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची पद्धत हि पूर्णपणे नवीन आणि कल्पक असल्याचे दिसून आले. आणि या प्रबंधाने संपूर्ण तंत्रज्ञान पूर्णपणे बदलणार होते. या प्रबंधामुळेच एक नवीन प्रकारच्या मशीन जन्मास आल्या, त्यांना आपण ‘ट्युरिंग मशीन’ (Turing Machine) म्हणतो. हि एक काल्पनिक/थेरॉटिकल संगणकीय मशीन आहे कि ज्यामध्ये आधीपासूनच काही नियम सेट केलेले असतात, आणि त्या नियमांनुसार मशीनला दिलेल्या इनपुट पासून एक आउटपुट मिळते. थोडक्यात ‘ट्युरिंग मशीन’ हि एक अशी मशीन आहे ज्यामध्ये आधीपासूनच लॉजिक सेट केलेले असते आणि त्याचा वापर करून डेटा वाचू/लिहू शकतो. ‘ट्युरिंग मशीन’ या ‘Theory of Computation’ या संगणक शास्त्राच्या अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शाखेचा केंद्र बिंदू आहेत. सध्या आपण जे संगणक वापरतो त्याचे आर्क्टिक्चर बनवण्याचे श्रेय ‘जॉन वोन न्यूमन’ या गणितज्ञाला देतो. पण त्याच्यावर देखील ट्युरिंगच्या या प्रबंधाचा परिणाम होता आणि हे त्यानेदेखील मान्य केले आहे. यानंतर पुढची दोन वर्षे, तो प्रिन्स्टन येथे Phd च्या अभ्यासाठी होता. येथेदेखील तो विविध प्रयोग करतच राहिला, नवीन गोष्टी शिकतच राहिला. येथे असताना तो क्रिप्टॉलॉजी शिकला, आणि गुप्त संदेश सोडवण्यासाठी एक मशीन तयार करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये देखील संशोधन करत होता.
१९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला नुकतीच सुरुवात झाली होती. त्यावेळी जर्मन लोक त्यांच्या इतर सोबती राष्ट्रांना संदेश पाठवण्यासाठी एका मशीनचा उपयोग करत असत. त्या मशीनचे नाव होते ‘एनिग्मा’. त्याकाळी ‘एनिग्मा’ मशीन हि गुप्त संदेश पाठवण्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित मशीन मानली जात होती. जर्मन लोक तिच्या सहाय्याने अतिशय गुप्त संदेश म्हणजे कुठे हल्ला करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे, कितीही दूरपर्यंत पोहोचवू शकत होते. ज्यांना संदेश पोहोचवायचा आहे आणि जो पाठवत आहे, या दोघांकडेदेखील ‘एनिग्मा’ मशीन असते, त्या दोघांनाही ‘एनिग्मा’ मशीनची सेटिंग्ज माहित असते. आणि त्या सेटिंगचा चा वापर करून ते गुप्त संदेश पाहत असत. पण अशी एक ‘एनिग्मा’ मशीन ब्रिटिशांच्या हाती लागली होती. आणि याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. पण ‘एनिग्मा’ मशीन जवळ असणे म्हणजे सर्व काही गुप्त संदेशांचा आपल्याला उलगडा होईल असे नाही.
‘एनिग्मा’ची सेटिंग्ज ओळखून, संदेश पाहणे हे जगातील सर्वात अवघड काम होते. या सेटिंग्जच्या १५९ दशलक्ष कोटी म्हणजे १५९च्या पुढे १८ शून्य एवढ्या शक्यता असत. एकदा मशीन ची सेटिंग माहित झाली म्हणजे सर्व काही गुप्त संदेश कळतील असेही नव्हते. जर्मन दररोज मध्यरात्री एनिग्मा मशीनची सेटिंग्ज बदलत असत. ब्रिटिशांना पहाटे सहा वाजता एनिग्माद्वारे गुप्त संदेश मिळत असे. तो गुप्त संदेश पाहण्यासाठी जी सेटिंग्ज लागते, ती ओळखण्यासाठी त्यांच्याकडे १८ तास असत. या १८ तासांमध्ये एनिग्मा मशिनच्या दशलक्ष कोटी शक्यतांपैकी जी खरोखरच सेटिंग आहे ती शोधावी लागे. हेसुद्धा दररोज करावे लागे. त्यामुळे एनिग्माला क्रॅक करणे अशक्यच मानले जात होते. त्यावेळी जर्मन गुप्त संदेश फोडण्याचे काम ‘ब्लेचली पार्क’ याठिकाणी चाले. ब्रिटिशांना साहजिकच एनिग्माला क्रॅक करण्यात अपयश येत होते. तेव्हा ‘एसा ब्रीग्ग्स’ या प्रसिद्ध कोड ब्रेकर ने त्यांना ’तुम्हाला विलक्षण बुद्धिमत्ता असलेला माणसाची आवश्यकता आहे. तुम्हाला अॅलन ट्युरिंगच मदत करू शकेल’, असा सल्ला दिला होता. त्यावेळी अॅलन ट्युरिंग केंब्रिज विद्यापीठामध्ये तर्कशास्त्रज्ञ म्हणून काम करत होता. तेव्हासुद्धा तो गणिताच्या क्लासला जात असे. ‘एसा ब्रीग्ग्स’ चा सल्ला एकूण त्यांनी अॅलन ट्युरिंगला मुलाखतीसाठी बोलावले. त्यानंतर ट्युरिंग तेथे पार्ट-टाइम काम करू लागला. पण लवकरच त्याला कामाचे महत्त्व लक्षात आले आणि तो फुल-टाइम काम करू लागला. ब्लेचली पार्क मध्ये ट्युरिंगला एक अतिशय साधे राहणीमान असलेला, कधी कधी बोलताना अडखळणारा, एक विलक्षण बुद्धीचा प्रोफेसर म्हणून ओळखले जात.
![]() |
एनिग्मा मशीन |
![]() |
‘बॉम्ब’ (Bombe) मशीन |
![]() |
द एनिग्मा - आत्मचरित्र |
एवढे महत्त्वाचे संशोधन करून देखील ट्युरिंगला जिवंतपणी तो ज्या प्रकारच्या आदराला पात्र होता, त्या प्रकारची वागणूक मिळाली नाही. उलट त्याला हाल-अपेष्टाच सहन कराव्या लागल्या. पण मरणोत्तर त्याच्या कामाचे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. १९६६ पासून ट्युरिंगच्या सन्मानार्थ संगणकीय कम्युनिटी मध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्यांना ‘ट्युरिंग अवार्ड’ दिला जातो. तो संगणकीय जगतातील सर्वात मानाचा पुरस्कार मानला जातो. प्रिन्स्टन विद्यापीठाने त्याला विद्यापीठाच्या इतिहासातील ‘अल्युमिनि’ मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल दुसरा क्रमांक दिला होता. ब्लेचली पार्क येथे ट्युरिंगचा १.५ टन वजनाचा पुतळादेखील बांधण्यात आला आहे. १९९९ साली ‘टाइम मॅगॅझीन’ ने सादर केलेल्या २०व्या शतकातील महत्वाच्या व्यक्तींच्या लिस्टमध्ये त्याचा समावेश होता. ब्रिटनच्या इतिहासातील महान लोकांमध्ये अॅलन ट्युरिंगचा २१ वा क्रमांक येतो.
‘दि इमिटेशन गेम’ चित्रपटाचे पोस्टर
इतिहासकार असे मानतात कि ‘एनिग्मा’ला ब्रेक केल्यामुळे जवळजवळ युद्धाचा काळ कमी झाला, नाहीतर ते आणखी जवळपास २ वर्षे तसेच चालले असते. ‘एनिग्मा’ला ब्रेक केल्यामुळे १४ दशलक्ष लोकांचे प्राण वाचवण्यास मदत झाली होती. पण ही गोष्ट, त्यावेळीच्या सरकारने जवळपास ५० वर्षे गुपितच ठेवली होती. २४ ऑक्टोबर, २०१३ साली क्वीन एलिझाबेथ II ने अॅलन ट्युरिंगसाठी ‘रॉयल पार्डन’ जाहीर केले आहे. ज्यांना भूतकाळामध्ये ब्रिटीश सरकारकडून त्रासदायक वागणूक दिली असते, अशा व्यक्तींची माफी मागण्याचा ब्रिटीश सम्राटाला विशेष अधिकार असतो. त्यालाच ‘रॉयल पार्डन’ म्हणतात. ‘रॉयल पार्डन’ मागताना अॅलन ट्युरिंगविषयी ‘डॉ. अॅलन ट्युरिंग हे एक असाधारण बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व होते. युद्धाच्या काळात ट्युरिंगने केलेल्या अभूतपूर्व कामासाठी ओळखण्यास तो पात्र ठरतो.’, असे उद्गार काढले होते. ट्युरिंगने प्रसिद्ध केलेले सर्व प्रबंध ‘अॅलन ट्युरिंग- हिज वर्क अँड इम्पॅक्ट’ या पुस्तकात पाहायला मिळतात. आतापर्यंत ट्युरिंगच्या आयुष्यावर खूप पुस्तके आली आहेत. त्यापैकी ‘‘अॅलन ट्युरिंग- दि एनिग्मा’ या पुस्तकावर २०१४ मध्ये ‘दि इमीटेशन गेम’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यामध्ये बेनेडिक्ट कंबरबॅच याने अतिशय सुंदररित्या अॅलन ट्युरिंगची व्यक्तीरेखा साकारली आहे. हा चित्रपट बराच गाजला होता आणि ऑस्करच्या शर्यतीत देखील सहभागी झाला होता.
No comments:
Post a Comment