चालू घडामोडी 29 ऑक्टोबर 2017
FIFA U-17 World Cup – अंतिम सामन्यात इंग्लंडची स्पेनवर ५-२ ने मात
इंग्लंडनं स्पेनचा ५-२ असा धुव्वा उडवून पहिल्यांदा फिफा १७ वर्षाखालील विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियवर झालेल्या सामन्यात इंग्लंडनं १७ वर्षाखालील विश्वचषकावर आपलं नाव सुवर्णक्षरांनी कोरलं. खरं तर या सामन्याच्या पहिल्या अर्ध्या तासात स्पेननं आपलं वर्चस्व राखलं. सर्जियो गोमेजनं दहाव्या आणि एकतिसाव्या मिनिटाला गोल करुन स्पेनला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यामुळं स्पेन हा सामना एकतर्फी जिंकतो की काय असं वाटत होतं. पण यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडचं फाईन ठरलेल्या रियान ब्रेव्हस्टरनं ४४ व्या मिनिटाला गोल डागून स्पेनची आघाडी २-१ अशी कमी केली. आणि इंग्लंडच्या आशा जिवंत ठेवल्या.
ब्रेव्हस्टरचा हा यंदाच्या विश्वचषकातला आठवा गोल ठरला. उत्तरार्धात तर इंग्लंडनं स्पेनला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. मॉर्गन व्हाईटनं ५८ व्या मिनिटाला गोल करुन इंग्लंडला सामन्यात २-२ अशी बरोबरी साधून दिली. आणि त्यानंतर इंग्लंडकडून गोलचा जणू पाऊसच सुरु झाला. फिलिफ फोडेननं ६९ आणि ८८, तर मार्क गुहीनं ८४ व्या मिनिटाला गोल झळकावून इंग्लंडच्या ५-२ अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं. फिफा १७ वर्षाखालील विश्वचषकातला हा विजय इंग्लंडच्या फुटबॉलमधला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय ठरला. कारण आजवर इंग्लंडाल एकदाही १७ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम चार संघांमध्येही स्थान मिळवता आलं नव्हत.
ब्रेव्हस्टरला गोल्डन बूटच्या पुरस्कारनं गौरवण्यात आलं तर फिलिप फोडेनला गोल्डन बॉलचा पुरस्कार देण्यात आला.
No comments:
Post a Comment