लता मंगेशकर
लता मंगेशकर
जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे . त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.*
भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्या गायक-गायिकांमध्ये लता दीदी या दुसर्या गायिका आहेत..
लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद झालेले आहे.*
बालपन :
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय गोमंतक कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे.
लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.
चित्रपटसृष्टीत इ.स. १९४० च्या दशकात सुरुवातीची कारकिर्द :
इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसर्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.
इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवालें यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.
इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंचे मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई(अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.
ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणार्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.
सुरूवतीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर हिंदुस्तानी शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्तानी उच्चारांचे धडे घेतले.
लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)
No comments:
Post a Comment