🔹ट्रिपल तलाकवर 6 महिन्यांची बंदी
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. तिहेरी तलाकवर 6 महिन्यांची बंदी घालून, सरकारने 6 महिन्यात कायदा करावा, असा सल्ला कोर्टाने दिला आहे.
मुस्लिम समाजाशी निगडीत या महत्त्वाच्या विषयावरील सुनावणी 18 मे रोजी पूर्ण झाली होती. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने तिहेरी तलाकवर दोन्ही बाजूंची मतं ऐकून घेतली. त्यांचे दावे प्रतिदावे तब्बल 6 दिवस सुरु होते. तिहेरी तलाक प्रथेमुळे घटनेतील परिच्छेद 14, 15, 21 आणि 25 चे उल्लंघन होत नाही, असेही सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांनी म्हटले आहे.
🔹सरपंचपदाच्या उमेदवारांकरिता निवडणुकीसाठी खर्च मर्यादा
ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या थेट निवडणुकीतील उमेदवारांसाठी ग्रामपंचायतींच्या सदस्यसंख्येनुसार 50 हजार ते 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे; तसेच सदस्यपदाच्या निवडणुकीतील उमेदवारांसाठी 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत सुधारित खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणुक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
सहारिया यांनी सांगितले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणेनुसार आता सरपंचपदाची थेट निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या उमेदवारांकरिता राज्य निवडणूक आयोगाने खर्च मर्यादा निश्चित केली आहे. सरपंचपदाच्या उमेदवारासाठी संपूर्ण ग्रामपंचायत हे प्रचार क्षेत्र असेल. सर्व ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या निवडणुकांसाठी आयोगाच्या 30 जुलै 2011 च्या आदेशानुसार सरसकट 25 हजार रूपये खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलेली होती. त्यातही आता सदस्य संख्येनुसार बदल करण्यात आला आहे.
🔷 गुगलकडून नवीन ऑपरेटिंग सिस्टीम सादर
गुगलकडून 'अँड्रॉईड ओ' ही नवी ऑपरेटिंग सिस्टीमचे लाँच करण्यात आले आहे. अँड्रॉईडच्या आत्तापर्यंतच्या सिस्टीम्सना खाद्यपदार्थांची नावे देण्यात आली आहेत. त्याच पद्धतीनुसार या सिस्टीमला 'ओरियो' नाव देण्यात आले. न्यूयॉर्कमध्ये यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी 'अँड्रॉईड ओ'चे लाँचिंग करण्यात आले. गुगलकडून लॉन्च करण्यात आलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
अँड्रॉईड ओ या सिस्टीममध्ये 'पिक्चर-इन-पिक्चर मोड' आणि नोटिफिकेशन डॉट अशी फिचर्स असणार आहेत. पिक्चर इन पिक्चर मोडद्वारे आयकॉनच्या डिझाईनमध्ये बदल करता येणार आहेत. याशिवाय नवे इमोजीही उपलब्ध होणार आहेत. तसेच या मोडमध्ये दोन युझर्स एकाचवेळी एक अॅप वापरू शकणार आहेत.