🔹'४० अंडर ४०' यादीत भारतीय वंशाचे पाच जण
'फॉर्च्यून' या प्रसिध्द मासिकाने जगभरातील चाळीशीच्या आतील युवा आणि सर्वांत प्रभावशाली लोकांची यादी प्रसिध्द केली आहे. विशेष म्हणजे 'फॉर्च्यून २०१७' च्या '४० अंडर ४०' या वार्षिक यादीत भारतीय वंशाच्या पाच जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मूळचे मालवणचे आणि सध्या आयर्लंडचे पंतप्रधान असलेले लिओ वराडकर यांचाही समावेश आहे.
फॉर्च्यून २०१७ '४० अंडर ४०'च्या यादीत सर्वांत प्रभावशाली लोकांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये युवा कलाकार, युवा उद्योजकांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ज्यांनी कमी वयात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे, अशांची नावे या यादीत आहेत.
हे आहेत पाचजण
लिओ वराडकर (वय ३८) :
मूळचे मालवणचे असलेले आणि सध्या आयर्लंडचे पंतप्रधान. वयाच्या २२व्या वर्षी राजकारणात पदार्पण
दिव्या नाग (वय २६) :
अॅपलच्या संशोधन विभागात महत्त्वाचे स्थान.
रिषी शाह (वय ३१) :
आऊटकम हेल्थ कंपनीचे संस्थापक
श्रध्दा अग्रवाल (वय ३२) :
'आऊटकम हेल्थ'च्या सहसंस्थापक
'आऊटकम हेल्थ'ची स्थापना २००६ मध्ये करण्यात आली होती. 'आऊटकम हेल्थ' म्हणजे जगभरातील डॉक्टरांसाठी आरोग्य आणि तंत्रज्ञानविषयक माहिती मिळण्यासाठीचे मोठे व्यासपीठ आहे.
लिला जनाह (वय ३१) :
समासोर्स कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
जनाह यांनी कंपनीच्या माध्यमातून समाजकार्याचे ध्येय ठेवले आहे. गरजू लोकांना काम देऊन त्यांनी दारिद्रय निर्मूलनासाठीची मोहीम हाती घेतली आहे.
या यादीत ३९ वर्षांचे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांना सर्वांत पहिले स्थान देण्यात आले आहे.
🔹कॉल ड्रॉप झाल्यास 10 लाखांपर्यंत दंड, 'ट्राय'ची कठोर पावलं
कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी ‘ट्राय’ अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नियम कठोर केले आहेत. कॉल ड्रॉपच्या नियमांचा लागोपाठ 3 महिने भंग करणाऱ्या कंपन्यांना 10 लाखांचा दंड आकारला जाईल, अशी माहिती ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली.
नियमभंग करणाऱ्या कंपन्यांकडून एक ते पाच लाख रुपयांचा दंड आकारण्याचा सध्या प्रस्ताव आहे. त्यामुळे जर
एअरटेल, वोडाफोन, आयडिया सारख्या सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना कॉल ड्रॉप रोखण्यात अपयश आल्यास दंडाच्या रकमेत दीडपटीनं वाढ करण्यात येईल. सलग तीन महिने कॉल ड्रॉप झाल्यास दंडाची रक्कम तिसऱ्या महिन्यात दुपटीने वाढेल.
कॉल ड्रॉप प्रकरणात सर्वाधिक दंड 10 लाख रुपयांचा असेल. कॉल ड्रॉप मोजण्याबद्दल अनेक मुद्दे आहेत. सरासरीमुळे अनेकदा यातील अनेक मुद्दे समोर येत नाहीत. मात्र नव्या नियमांच्या अंतर्गत अनेक मुद्दे विचारात घेतले जाणार असल्याचंही शर्मांनी सांगितलं.
◾️नवे नियम काय?
कोणत्याही दूरसंचार सर्कलमध्ये एकूण कालावधीच्या 90 टक्के काळात 98 टक्के कॉल्स सुरळीत होणे आवश्यक
एकूण कॉल्सपैकी दोन टक्क्यांहून अधिक कॉल्स ड्रॉप झाल्यास कंपनीकडून दंड आकारला जाऊ शकतो
सर्वाधिक व्यस्त असलेल्या दिवसांमध्ये एका दूरसंचार सर्कलमधील 90 टक्के मोबाईल टॉवरवरील कॉल ड्रॉपचे प्रमाण तीन टक्क्यांहून अधिक असता कामा नये.
🔹संयुक्त जनता दल अखेर एनडीएमध्ये सहभागी
संयुक्त जनता दलाने अखेर भाजपप्रणित ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’त (एनडीए) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. जदयूच्या प्रवेशामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची ताकद आणखी वाढली आहे.
जुलै महिन्यात नितीशकुमार यांनी बिहारमध्ये राजकीय भूकंप घडवला होता. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाच्या ‘महाआघाडी’तून बाहेर पडण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामादेखील दिला. यानंतर अवघ्या १२ तासांमध्ये त्यांनी भाजपचा पाठिंबा मिळवला आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. भाजपशी युती केल्यानंतर नितीशकुमार एनडीएत प्रवेश करणार हे स्पष्ट झाले होते.