Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Thursday, October 26, 2017

    स्पर्धा परीक्षांमधील समज-गैरसमज

    Views

    स्पर्धा परीक्षांमधील समज-गैरसमज



                                      स्पर्धापरीक्षांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेले अनेक प्रश्न व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण काल केला. हे प्रश्नोपनिषद आपण आज चालू ठेवू. स्पर्धापरीक्षा देऊ बघणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या पालकांना अनेक समज-गैरसमजांचा सामना करावा लागतो. योग्यवेळी योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे या क्षेत्रातील करिअरविषयी अनेक चुकीच्या संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात तयार होतात. अशाच काही चुकीच्या कल्पनांमुळे अनेकजण स्पर्धापरीक्षांच्या वाटेलाच येत नाहीत. 'हा नाद खुळा!' असे त्यांना वाटते. हा व्हायरस डिलिट करण्याचा अॅण्टी-व्हायरस आपण टाकूया...



    खूप वर्षे अभ्यास करावा लागतो:

    - आपल्याकडे स्पर्धापरीक्षांचे वातावरण आता कुठे तयार होते आहे. जे उत्तरेत व दक्षिणेत पूर्वीच तयार झाले आहे. त्यामुळे अनेकांना या परीक्षांबद्दल उशिरा माहिती मिळते. त्यामुळे त्यांची सुरुवातही उशिरा होते. आपला एक उमेदवार रोहिदास दोरकुळकर याला एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहितीच वयाच्या तिसाव्या वर्षी मिळाली. तरीही त्यानंतर त्याने जिद्दीने अभ्यास करून मुख्याधिकारी हे पद मिळवले व तो त्या पदावर काम करतो आहे. त्यामुळे पद मिळवण्यासाठी वेळ लागतो त्यामागे हे एक कारण असते. इतरही कारणे असतात. काहींनी उमेदवारांच्या मनात असे भरवून दिले असते की परीक्षा उत्तीर्ण व्हायला अनेक वर्षे लागतात. मग काहींचा पंचवार्षिक योजना पद्धतीने कारभार चालतो.

    अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे खरे असले तरी अशा पायऱ्या बनवत जायचे नाही. शाळा-कॉलेजमध्ये अभ्यास ठरलेल्या स्वरूपाचा असतो, तर स्पर्धापरीक्षांमध्ये अभ्यास हा गतिमान असतो. एकच एक पुस्तक वाचून सगळा अभ्यास होत नाही. पण, याची दुसरी बाजू अशी की काही विद्यार्थी पसरटपणे काहीही वाचत बसतात. त्यांना कोणीतरी सांगितले असते की, 'स्पर्धापरीक्षेत सूर्याच्या अधिपत्याखाली असलेले सर्वकाही विचारतात'. माझी एक स्टुडंट मुलगी सुरुवातीला जवाहरलाल नेहरूंचे 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' वाचत बसली होती. कारण कोणीतरी तिला सांगितले की तिथून सुरुवात कर. प्रत्यक्षात स्पर्धापरीक्षांचा अभ्यासक्रम हा पुरेसा स्पष्ट करून दिला आहे व त्या त्या विषयानुसार वाचण्यासाठी संदर्भग्रंथही उपलब्ध आहेत. मग असे असताना फोकस नसताना केलेला अभ्यास आणि नेम न धरता केलेला गोळीबार यांचा काहीच उपयोग होत नाही. काहीजण (व जणी) आपण या मोठ्या परीक्षा देत आहोत या कल्पनेच्या प्रेमात पडलेले असतात. जसे काही परीक्षा देणे हेच करिअर. खरेतर परीक्षा फक्त साधन असून, अधिकारी बनून देशसेवा करणे हे साध्य आहे. साधनांचे साध्यात रूपांतर करून काहीच साध्य होत नाही.

    काहीजण कोणतेही मार्गदर्शन न घेता 'एकला चलो रे' म्हणत एकटेच भटकत निघतात. ते बऱ्याचदा भरकटतात हे वेगळे सांगायला नको. आयुष्यात एखादी छोटी गोष्ट साध्य करण्यासाठीही अनेकांची मदत लागते; तर मग एवढी मोठी झेप कुणाच्या मदतीशिवाय कशी शक्य होईल? थोडक्यात मार्गदर्शन, अभ्यासगट, अभ्यास साहित्य या सर्वांचा योग्य प्रमाणात वापर करणे आवश्यक आहे. अभ्यास (search) आणि संशोधन (research) यांच्यातील सीमारेषाही ओळखता आली पाहिजे. स्पर्धापरीक्षांमध्ये आधीच उपलब्ध माहितीचा अभ्यास करून त्याचा सारांश आत्मसात करायचा असतो, नवीन शोध लावायचा नसतो. मुळात एका वर्षाच्या मर्यादित कालावधीत ते शक्यही नसते. ही लक्ष्मणरेषा एकदा आखता आली आणि काटेकोरपणे पाळता आली तर यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे थांबण्याची गरज नाही.



    सरकारी नोकरांचीच मुले पास होतात:

    - ज्यांच्या घरी कोणी ना कोणी सरकारी नोकरीत आहे त्यांना या परीक्षेची माहिती लवकर मिळते. त्यांनी या नोकरीतले आव्हान ओळखले असल्याने ते प्रेरित झालेले असतात. त्यामुळे सरकारी नोकरांची मुलेच जास्त प्रमाणात पदप्राप्ती करतात असे काहींना वाटते. पण, खरोखरच असं काही नाही. घरातून अशी कोणतीही पार्श्वभूमी नसणारे अनेकजण नेमाने पद पटकवतात, तर अशी ही उदाहरणे माझ्या डोळ्यासमोर आहेत की आय.ए.एस/आय.पी.एस. अधिकाऱ्यांची मुले खूप प्रयत्न करूनही पद प्राप्त करू शकली नाहीत.



    मुलींना संधी आहे का?सरकारी सेवेत मुलींसाठी खासगी क्षेत्रापेक्षाही चांगली संधी आहे. कारण, सुरक्षित काम, पुरेशा सुट्ट्या व बदलीसाठी भरपूर पर्याय मिळतात. एमपीएससी परीक्षेत मुलींना ३३ टक्के आरक्षण आहे. मात्र, पुरेशा संख्येने मुली स्पर्धापरीक्षांसाठी बसत नसल्याने यशाची संधी जास्त आहे. इतर परीक्षांमध्ये मुलींसाठी वेगळे आरक्षण नसले तरी समान संधी नक्कीच आहे.



    मराठी मुलांवर अन्याय होतो?स्पर्धापरीक्षांचे पारदर्शक रूप बघता एखाद्या प्रांतातील मुलांवर अन्याय होतो किंवा कोणावर कृपा केली जाते, असे म्हणणे कठीण आहे. मागे काही रेल्वेच्या परीक्षांमध्ये सर्वांपर्यंत माहिती पुरेशा प्रमाणात पोहोचली नव्हती. पण, तोही मुद्दा आता सोडवला गेला आहे. आता इंटरनेटच्या मदतीने सर्व माहिती मिळवता येते. महाराष्ट्रात इतर प्रांतातील अधिकारी काम करताना दिसतात, तसेच मराठी मुलेही दुसऱ्या प्रांतात (परप्रांतात नाही) काम करत असतात. आपल्या देशाला घट्ट बांधून ठेवणारी ही व्यवस्था आहे. तेव्हा मराठी टक्का वाढवण्यासाठी प्रथम पुरेशा प्रमाणात मराठी मुलांनी या परीक्षांकडे वळले पाहिजे.



    मराठीत संदर्भ साहित्य उपलब्ध नाही?अशी स्थिती काही वर्षापूर्वीपर्यंत होती, पण आता नाही. आता मराठीत पुरेसे, भरपूर व दर्जेदार अभ्यास साहित्य उपलब्ध होते आहे. अगदी विश्वकोशही (संकेतस्थळावर) मराठीत उपलब्ध आहे.



    आयपीएससाठी उत्तम शारीरिक क्षमता हवी?हा गैरसमज आहे. पोलिस सब-इन्स्पेक्टर पदासाठी शारीरिक चाचणी असते. पण, पोलिस उपअधीक्षक किंवा आय.पी.एस बनायचे असेल तर अशी कुठली चाचणी नाही. फक्त बेताची उंची व चष्मा खूप जास्त नको अशा अटी आहेत. चांगले शरीर कमावले तर मुलाखत घेणारे आपल्याला आय.पी.एस.मध्ये टाकतील असे अनेकांना वाटते. किंवा आपण परकीय भाषा शिकलो तर आपला परराष्ट्र सेवेसाठी विचार केला जाईल, असे काहींना वाटते. मात्र, यातील काहीच खरे नाही. मुख्य परीक्षा व मुलाखत या दोघांची बेरीज करून रँक व उमेदवारांनी दिलेला अग्रक्रम यानुसार पदांचे वाटप होते. त्यामुळे आयोगही ठरवून एखाद्याला एखादे विशिष्ट पद वाटू शकत नाही. उमेदवारांनाही सुरुवातीला फक्त यश मिळाल्याचे कळते, पद कोणते मिळाले ते नंतर कळते.



    पदवीनंतर अभ्यासाला सुरुवात करू की आधी?Earlier you start, early you will reach. त्यामुळे जितक्या लवकर तयारी सुरू करणार तितके चांगले. अजित जोशी सध्या हरयाणात जिल्हाधिकारी आहे. त्याने शाळेत असतानाच स्पर्धापरीक्षांचा विचार सुरू केला होता. इतक्या आधीही सुरुवात करता येते.

    आता पदवीच्या आधी काय काम करायचे? तर थोडा व्यापक दृष्टीकोन ठेवून व्यक्तिमत्त्व विकसनाकडे लक्ष द्यायचे. एकतर पेपर वाचनाला सुरुवात करायची. आजूबाजूच्या गोष्टींबद्दल सजग व्हायचे. वक्तृत्व, निबंधलेखन, वादसभा, नाटके यात भाग घ्यायचा, ट्रेकिंग करायचे. टीव्हीवर 'बिग फाइट'सारखे चांगले कार्यक्रम बघायचे. ग्रंथालयाचे सदस्यत्व घेऊन ग्रंथांतून जग समजून घ्यायचे. आपले विचार लिहून बघायचा प्रयत्न करायचा. व्याख्यानमालांवर लक्ष ठेवून चांगले विषय असतील तर त्यांना हजेरी लावायची. सगळ्याच गोष्टींमध्ये भरपूर रस घ्यायचा. या सर्व गोष्टी करायला पदवीपूर्व काळात वेळ असतो. पदवीनंतर या परीक्षांचा विचार केल्यावर स्पर्धेची मानसिकता व दृष्टीकोन विकसित व्हायला जो वेळ लागतो. तो आधीच तयारी सुरू केली तर वाचवता येतो.

    प्रत्येक स्पर्धापरीक्षा वेगळी असल्याने त्यांचा वेगळा अभ्यास असतो.

    आता बहुतेक स्पर्धापरीक्षांचे रूप सारखे होत चालले आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक परीक्षांची तयारी करता येते. फक्त प्रत्येकात जे वेगळे आहे त्याची वेगळी फाइल बनवायची व त्या परीक्षेच्या आधी त्या फायलीची उजळणी करायची.




    दुसऱ्या विद्यापीठाची पदवी चालते का?होय. अगदी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी चालते.


    मराठी भाषेतून या परीक्षा देता येतात का?हो आयएएसची परीक्षा मराठीतूनही देता येते. महाराष्ट्रातून मराठीतून परीक्षा देऊन उच्चपद प्राप्त करणाऱ्यांची मोठी परंपराच आहे. जसे भूषण गगराणी, विश्वास नांगरे-पाटील, अजित जोशी, नुकताच आयपीएस झालेला प्रतीक ठुबे. बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यासाठी इंग्रजीचा सराव करावा लागतो, पण तो फारसा कठीण नसतो.


    महाराष्ट्राबाहेर काम करावे लागते का?जर परराष्ट्र सेवेत असाल तर देशाबाहेरही काम करावे लागते. एक यशस्वी विद्यार्थी नितीन येवला अफगाणिस्तानात काम करत आहे. खरोखर ते तितके कठीण नसते. सरकार सर्व प्रकारच्या सुविधा पुरवते. महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर काम करण्याचा मुद्दा प्रामुख्याने प्रशासकीय सेवा (आयएएस), पोलिस सेवा (आयपीएस) व परराष्ट्र सेवा (आयएफएस) यांना लागू होतो. बाकी सर्व सेवांची नेमणूक आपल्याच राज्यात होते. त्यामुळे या मुद्द्याचा बाऊ करण्याचे कारण नाही.


    निवड होण्यासाठी लाच द्यावी लागते का?हा एक अगदी सामान्य गैरसमज आहे. या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) अशा तटस्थ व पारदर्शक पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांकडून घेतल्या जातात. त्यांची व्यावसायिकता व सचोटी वादातीत असते. गेल्या अनेक वर्षांचा निकाल पाहिल्यास इतक्या सामान्य घरातील मुले यशस्वी झालेली दिसतील की, हा गैरसमज तिथेच गळून पडेल. नितीन जावळे आयएएस होण्यापूर्वी घाटकोपरला झोपडपट्टीसारख्या ठिकाणी एका खोलीत रहायचा. मी स्वत: त्याच्या घरी गेलेलो आहे.


    अभ्यास खूप कठीण असतो का?अभ्यास कठीण असे म्हणता येणार नाही, पण विषयांमध्ये विविधता असते. प्रश्न विचारताना चालू घडामोडींशी जोडून प्रश्न विचारले जातात. त्यामुळे काहींना या परीक्षा अनाकलनीय व कठीण वाटतात. पण प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास केल्यास कठीण काहीच नाही. उलट या परीक्षांच्या अभ्यासातून जितके शिकायला मिळते ते इतर कोणत्याही कोर्समधून मिळत नाही. अगदी एमबीए, सीए, लॉ अशा कोर्सेसपेक्षाही या परीक्षांतून जास्त शिकायला मिळते. यातून व्यक्तिमत्वाची जी जडणघडण होते, ती अतुलनीय असते.


    परीक्षेत यश मिळतेच याची खात्री काय?जर मनापासून अभ्यास केला असेल तर पदप्राप्ती होईलच असे आपण म्हणू शकतो. पण धोका तर असतोच. पण धोका कुठे नसतो? 'If you fail to take a risk, then that itself is a biggest risk'.

    तुमचे इतर मित्रमैत्रिणी काट्याकुट्यातून पायवाटेने फिरत असताना, या स्पर्धा परीक्षा तुम्हाला मात्र एक्स्प्रेस वेवर आणून सोडतात. तर मग तयार आहात या भन्नाट प्रवासासाठी? आहे धमक हे शिवधनुष्य पेलण्याची? असेल तर यापुढे आपण या सदरातून या परीक्षांचे तंत्र व मंत्र उलगडत नेऊ. जर लॉगइन केले असेल तर हा परीक्षांचा चक्रव्यूह भेदायचा पासवर्ड तुम्हाला एकेका लेखातून मिळत जाईल. म्हणतात ना...


    मंझिले उन्ही को मिलती है

    जिनके कदमों में जान होती है।

    पंखोसे सें नही,

    हौसलोंसे उडान होती है।



    - भूषण देशमुख

    लेखक मुंबईच्या राज्य प्रशासकीय व्यवसाय मार्गदर्शन संस्थेमध्ये प्राध्यापक आहेत.



    source: http://maharashtratimes.indiatimes.com/

    No comments:

    Post a Comment