Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Wednesday, October 25, 2017

    चालू घडामोडी 24 ऑक्टोबर2017(टेक्स्ट)

    Views
    🔹जपानची राजधानी टोकियो सर्वात सुरक्षित शहर

    जपानची राजधानी टोकियो हे जगातील सर्वात सुरक्षित, तर पाकिस्तानची व्यापार राजधानी कराची हे सर्वात असुरक्षित शहर आहे. द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटने सेफ सिटी इंडेक्स २०१७ जाहीर केली आहे.

    या इंडेक्समध्ये सिंगापूर दुसऱ्या स्थानी, तर जपानमधील ओसाका तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे दिल्ली ४३ व्या क्रमांकावर तर मुंबई ४५ व्या क्रमांकावर आहे.

    सुरक्षित शहराच्या सूचीमध्ये ६० आणि फ्रान्समधील एकाही शहराचा समावेश करण्यात आला नाही. सर्वाधिक सुरक्षित १० शहरामध्ये आशियातील आणि युरोपचा दबदबा कायम आहे.

    जगातील टॉप टेन सुरक्षित शहरे - टोकियो जपान, सिंगापूर सिंगापूर, ओसाका - जपान, टोरँटो कॅनडा, मेलबर्न ऑस्ट्रेलिया, ऍमस्टरडॅम नेदरलँड, सिडने ऑस्ट्रेलिया, स्टोकहोम स्वीडन, हाँगकाँग हाँगकाँग, झुरिच स्वित्झर्लंड, या शहराचा समावेश आहे.

    जगातील टॉप टेन असुरक्षित शहरे - कराची पाकिस्तान, यंगून म्यानमार, ढाका बांगलादेश, जकार्ता इंडोनेशिया, हो ची मिन्ह सिटी - व्हिएतमान, मनिला - फिलिपाइन्स, कारारस - व्हेनेझुएला, क्योटो जपान, तेहरान इराण, कैरो इजिप्त या देशाचा समावेश आहे.

    🔹आग्रा एक्सप्रेस वेवर हवाई दलाचा युद्धाभ्यास

    उत्तर प्रदेशमधील आग्रा एक्सप्रेस वेवर हवाई दलाच्या विमानांचा सराव सुरू झाला आहे. युद्ध किंवा युद्धसदृश्य कारवायांसाठी सज्ज राहण्यासाठी हवाई दलाकडून हा सराव केला जात आहे. विशेष म्हणजे यंदा हवाई दलाचे सी-130जे सुपर हर्क्युलिस हे वाहतुक विमानदेखील आग्रा एक्सप्रेस वेवर उतरले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सरावाला सुरूवात झाली असून या सरावामध्ये एकूण 20 विमानांचा समावेश आहे.

    वाहतूक विमान सी-130 जे सुपर हर्क्युलिसने टचडाऊन करताच अग्रा एक्सप्रेस वेवर हवाई दलाच्या सरावाला सुरूवात झाली. हर्क्युलिस विमानाने लँडिंग केल्यावर त्यातून गरूड कमांडो एक्सप्रेस वेवर उतरले. यानंतर संपूर्ण रनवे ताब्यात घेतला. यानंतर साडे तीन किलोमीटरच्या पट्टय़ात हवाई दलाची विमाने उतरण्यास सुरूवात झाली. कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याचा अभ्यास म्हणून हवाई दलाची विमाने उतरण्यास सुरूवात झाली. कोणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्याचा अभ्यास म्हणून हवाई दलाकडून आग्रा एक्सप्रेस वेवर सराव सुरू आहे. वाहतुक विमान सी-130 जे सुपर हर्क्युलिस सरावाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

    🔹शिंजो अबे यांच्या आघाडीचा मोठा विजय

    जपानमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडले. या निवडणुकीत पंतप्रधान शिंजो अबे यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या (एलडीपी) काँझर्व्हेटिव्ह आघाडीने दोन-तृतीयांश बहुमत प्राप्त केले. या विजयामुळे मोठे निर्णय घेण्यासाठीचा अबे यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबे यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.

    जपानच्या प्रसारमाध्यमांनुसार अबे यांच्या आघाडीला 465 पैकी 312 जागांवर विजय मिळाला. शिंजो अबे यांनी सप्टेंबर महिन्यात संसद विसर्जित करून मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरला. या विजयामुळे अबे यांना जगातील तिसऱया क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देणे आणि उत्तर कोरियाच्या विरोधातील भूमिका बळकट करण्यास मदतच होईल.
    माझे मित्र शिंजो अबे यांचे निवडणुकीत दिमाखदार विजयासाठी अभिनंदन. अबे यांच्या नेतृत्वाखाली भारत आणि जपानचे संबंध आणखीन दृढ होतील अशी अपेक्षा करतो असे मोदींनी आपल्या संदेशात म्हटले.

    निवडणुकीतील रणनीति यशस्वी
    निवडणुकीत प्रचारावेळी अबे यांनी अवलंबिलेली उत्तर कोरियाला धडा शिकविण्याची आणि जपानला क्षेत्रीय शक्ती ठरविण्याची रणनीति यशस्वी ठरली आहे. निवडणुकीत देण्यात आलेल्या आश्वासनांनुसार उत्तर कोरियाला कठोरपणे सामोरे जाईन, यासाठी बळकट राजनयाची गरज असल्याचे अबे म्हणाले. अबे यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टीला कमजोर विरोधक असण्याचा लाभ झाला. त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले दोन्ही मुख्य पक्ष काही आठवडय़ांअगोदरच उदयास आले होते. काही आठवडय़ांच्या अगोदर टोकियोच्या महापौर युरियो कोइके यांनी पार्टी ऑफ होपची स्थापना केली. कोइके यांच्या पक्षाला 50 पेक्षा कमी जागा मिळाल्याचे वृत्त समोर आले.

    🔹अमेरिकेसोबतचा करार अखेर लागू

    भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान सर्वात मोठी सैन्य सहमती म्हणून ओळखल्या जाणाऱया लॉजिस्टिक्स एक्सचेंज मेमोरेंडम ऑफ ऍग्रिमेंट (लेमोआ) विदेशमंत्री रेक्स टिलसरन यांच्या भारत दौऱयादरम्यान लागू करण्यात आला. या कराराच्या अंतर्गत युद्धाभ्यास, प्रशिक्षण किंवा आपत्तीप्रसंगी मदतकार्यासाठी परस्परांच्या तळांवर सैन्यांना वाहतूक सहाय्य, पुरवठा आणि सेवा उपलब्ध करण्याची तरतूद आहे. विशेषकरून इंधनपुरवठा आणि दुरुस्तीकार्यासाठी कोणत्याही अडथळ्याशिवाय सुविधा मिळणार आहेत.

    या करारामुळे दोघांनाही एकमेकांच्या देशात सैन्यतळ निर्माण करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, तरीही हा मुद्दा राजकीयदृष्टय़ा संवेदनशील मानला गेला. भारतात दशकापर्यंत चाललेल्या चर्चेनंतर लेमोओवर मागील वर्षी ऑगस्टमध्ये स्वाक्षरी झाली असली तरीही तो लागू झाला नव्हता. परस्परांना खर्चाची रक्कम देण्याच्या मुद्यावर चर्चा रेंगाळली.

    रेक्स टिलरसन यांचा भारत दौरा मंगळवारी संध्याकाळी सुरू होईल. मागील महिन्यात अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांच्या दौऱयात हा करार लागू करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.

    अमेरिकेने भारताला संरक्षण सहकाऱयाचा दर्जा दिला आहे. विमानवाहू नौकेसाठी अमेरिकेने ईएमएएलएस यंत्रणा देण्याचा निर्णय घेतला. या यंत्रणेमुळे विविध वजनाची विमाने उड्डाण घेऊ शकतील.

    🔹देशात 73 वाघांनी यंदा गमाविला जीव

    यंदा देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या वाघांच्या मृत्यूंचे चिंताजनक आकडे समोर आले आहेत. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणानुसार 2017 मध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत 73 वाघांचा मृत्यू झाला. यापैकी सर्वाधिक वाघ मध्यप्रदेशात मृत्युमुखी पडले. 15 ऑक्टोबरपर्यंत या राज्यात 18 वाघांचा मृत्यू झाला. यानंतर कर्नाटकचा क्रमांक असून तेथे 14 वाघांना जीव गमवावा लागला.

    मध्यप्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशात देखील वाघांच्या मृत्यूची प्रकरणे समोर आली. यात वृद्धापकाळ किंवा आजार, वीजेचा धक्का, परस्परातील संघर्ष, रेल्वे-रस्ते अपघात आणि विष देऊन हत्येची कारणे सामील आहेत. प्राधिकरणानुसार 2016 मध्ये भारतात सर्वाधिक 100 वाघांचा मृत्यू झाला. तर 2009 ते 2015 पर्यंत दरवर्षी सरासरी 24 ते 72 वाघांचा मृत्यू झाला.

    मध्यप्रदेशात स्थिती चिंताजनक
    वाघांच्या मृत्यूप्रकरणी मध्यप्रदेशातील आकडेवारी मागील 5 वर्षांपासून चिंता करायला लावणारी आहे. अहवालानुसार 5 वर्षांमध्ये मध्यप्रदेशात 89 वाघांचा मृत्यू झाला, ज्यात 11 बछडय़ांचा समावेश आहे. तर यावर्षी आणखीन 18 वाघांचा मृत्यू तेथे झाला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दरवर्षी वाघांचा मृत्यू होणे सरकार, वन्यजीव अधिकाऱयांसाठी धोक्याचा इशारा आहे.

    मंगळयानाहून मौल्यवान दोन वाघ
    भारतीय-ऑस्ट्रेलियन संशोधकांच्या एका पथकाने केलेल्या अनोख्या विश्लेषणात मंगळयान प्रकल्पापेक्षा दोन वाघांचा जीव अधिक मौल्यवान असल्याचे समोर आले. दोन वाघांना वाचविणे आणि त्यांच्या देखभालीसाठी होणारा खर्च जवळपास 520 कोटी रुपये आहे. तर इस्रोच्या मंगळयानासाठी आलेला एकूण खर्च 450 कोटी रुपयांच्या आसपास आहे. अनुमानानुसार भारतात प्रौढ वाघांची संख्या 2226 आहे.

    🔹पंतप्रधान मोदींकडून रो-रो सेवेचे उद्घाटन

    देशातील पहिल्याच रो रो फेरी सेवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. गुजरातमधील भावनगर जिल्हय़ातील घोगा ते भडोच जिल्हय़ातील दहेज अशी ही सेवा आहे. या माध्यमातून एकाचवेळी 100 ट्रक्स एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणी एकाच वेळी वाहून नेता येणार आहेत. खंबातच्या आखातातून हा मार्ग तयार करण्यात आला आहे. या सेवेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला असून लवकरच इतर टप्पेही पूर्ण होतील.
    साऱया भारतासाठीच हा स्वप्नवत प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे गुजरातच्या जनतेची बऱयाच काळापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. बंदर विकास हे आपल्या सरकारचे ध्येय असून ‘पी फॉर पी’ अर्थात, पोर्टस् फॉर प्रॉस्पॅरिटी हा सरकारचा मंत्र असल्याचे मोदींनी प्रतिपादन केले.

    या प्रकल्पामुळे गुजरातमधील 25 लाख तरुणांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार आहे. तर भविष्यकाळात 1 कोटी रोजगार निर्माण करण्याची क्षमता यात आहे. गुजरातच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून भविष्यकाळात आणखी प्रकल्प हाती घेण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.

    🔹6 तासांपेक्षा अधिक वेळ ‘स्पेसवॉक’

    नासाच्या अंतराळवीरांच्या ‘एक्सपेडिशन-53’चे कमांडर रँडी ब्रेस्निक आणि फ्लाइट अभियंते जोइ अकाबा यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्पेसवॉक (अंतराळात चालणे) केला. हा स्पेसवॉक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (आयएसएस) बाहेर 6 तास 49 मिनिटांपर्यंत चालला.

    दोघांनी या कालावधीत आयएसएसचा रोबोटिक आर्म दुरुस्त केला आणि जळालेला फ्यूज बदलून ना हायडेफिनेशक कॅमेरा बसविला. स्पेसवॉक सकाळी 7.47 वाजता सुरु होत दुपारी जवळपास 2.36 वाजता संपला. 15 दिवसात नासाच्या अंतराळवीरांनी स्पेसवॉक करण्याची ही तिसरी वेळ आहे. या अगोदर त्यांनी 5 आणि 10 ऑक्टोबर रोजी स्पेसवॉक केला होता.

    दोघांनी अंतराळात तरंगणाऱया स्थानकाच्या ‘कँडार्म-2’ रोबोटिक आर्ममध्ये 5 ऑक्टोबर रोजी बसविण्यात आलेल्या कॅमेरा व्यवस्था बदलली. त्याचबरोबर रोबोटिक आर्ममध्ये बसविण्यात आलेल्या एंड इफेक्टरची दुरुस्ती केली. त्यात एक नवा रोडिएटर ग्रॅपल बार लावण्यात आला. ब्रेस्निकचा हा पाचवा स्पेसवॉक तर अकाबा यांनी तिसऱयांदाच अंतराळात पाऊल टाकले.

    नासाच्या अंतराळवीरांनी नायट्रोजनयुक्त जेटपॅक परिधान केला होता. हा जेटपॅक त्यांना परत स्थानकाच्या दिशेने पोहोचण्यास मदत करतात. अंतराळ स्थानकावर पुढील हालचाल 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर पुढील वर्षी जानेवारी देखील स्पेसवॉकची अपेक्षा वर्तविली जात आहे. सर्वाधिक मोठय़ा स्पेसवॉकचा विक्रम नासाचे अंतराळवीर जिम वॉस यांच्या नावावर आहे. त्यांनी 8 तास 85 मिनिटांपर्यंत स्पेसवॉक केला होता.

    🔹सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांचा राजीनामा

    भारताचे सॉलिसिटर जनरल रणजित कुमार यांनी नुकताच वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिला. कौटुंबिक कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

    जून 2014 मध्ये रणजित कुमार यांची सॉलिसिटर जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली होती. अलिकडेच त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना केंद्र सरकारने पुन्हा मुदतवाढ दिली होती. मात्र, मला आता कुटुंबियांना वेळ द्यायचा आहे, असे स्पष्ट करत रणजीत कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुकूल रोहतगी यांनीदेखील ऍटर्नी जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ रणजीत कुमार यांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. कुमार यांनी गुजरात सरकारसाठी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणात त्यांनी गुजरात सरकारची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली होती. घटनात्मक कायदे, नागरी सेवा, करासंबंधीच्या कायद्यांविषयीचे जाणकार म्हणून त्यांना ओळखले जाते.

    🔹देशातील निवृत्तीवेतन प्रणालीत सुधारणा

    गरिबांसाठी सुरू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेमुळे सामाजिक सुरक्षा वाढण्यास मदत झाली आहे. मेलबर्न मर्सर ग्लोबल पेन्शन इन्डेक्स 2017 मध्ये भारताची कामगिरी सुधारला आहे. 30 देशांसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये भारत 28 व्या स्थानी आहे. सलग सहाव्या वर्षी डेन्मार्क पहिल्या स्थानी आहे.

    भारताचे निर्देशांकातील स्थान 2016 च्या 43.4 वरून 2017 मध्ये 44.9 वर पोहोचला आहे. पोलंड, जर्मनी, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रिया, ब्राझील, चीन आणि अर्जेंटिना या देशांपेक्षा भारतातील निवृत्तीवेतन योजना अधिक स्थिर असल्याचे म्हणण्यात आले. स्थिरतेच्या बाबतीत भारताचे गुण 40.9 वरून 43.8 वर पोहोचले आहे. सरकारकडून या योजनेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि याचा लाभ अनेक स्तरातील लोकांना मिळत असल्याचे मर्सरच्या इंडिया बिझनेस लीडर प्रीती चंद्रशेखर यांनी म्हटले.

    पंतप्रधान वय वंदना योजनेमध्ये अनौपचारिक क्षेत्रातील लोकांना लाभ घेता येतो आणि वयाचे 60 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला ठराविक आर्थिक मदत करण्यात येत आहे. व्याजदरात कपात करण्यात येत असाता आणि बाजारपेठेत आर्थिक अस्थैर्य असूनही योजना योग्य दिशेने कार्यरत आहे. सामान्य नागरिकांमध्ये ही योजना लोकप्रिय होत आहे. पुढील काही वर्षात सामाजिक सुरक्षा सुधारण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले. जपान, ऑस्ट्रीया, इटली आणि फ्रान्स या विकसित देशातील निवृत्तीवेतन योजना स्थिर नाही आणि भविष्यात वयोवृद्ध नागरिकांसाठी ती मॉडेल म्हणून समोर येत नाही. हा निर्देशांक आंतरराष्ट्रीय पातळीवर निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासाठी उपयोगी येईल आणि अर्थव्यवस्था स्थिर होण्यास मदत होईल असे संस्थेचे अध्यक्ष जॅक्वास गॉलेट यांनी म्हटले आहे.

    🔹डेन्मार्कमध्ये श्रीकांत अजिंक्य

    भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने या वर्षातील तिसरे सुपरसिरीज प्रिमियर बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळविताना कोरियाच्या अनुभवी ली हय़ुन द्वितीयचा एकतर्फी पराभव करून 750,000 डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या डेन्मार्क ओपन सुपरसिरीज स्पर्धा जिंकली. महिलांमध्ये माजी वर्ल्ड चॅम्पियन रॅटचानोक इंटेनॉनने जपानच्या विद्यमान विजेत्या अकाने यामागुचीचा पराभव करून जेतेपद पटकावले.
    आपल्यापेक्षा बारा वर्षांनी मोठा असणाऱया हय़ुनविरुद्ध श्रीकांतने पूर्ण वर्चस्व राखत केवळ 25 मिनिटांत 21-10, 21-5 असा विजय मिळविला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावर असणाऱया श्रीकांतने हय़ुनला वरचढ होण्याची अजिबात संधी दिली नाही. श्रीकांतने या वर्षात ऑस्ट्रेलिया व इंडेनेशिया सुपरसिरीज स्पर्धा जिंकल्या आहेत. महिला एकेरीत इंटेनॉनने जागतिक पाचव्या मानांकित यामागुचीचे कडवे आव्हान 14-21, 21-15, 21-19 असे परतावून लावत या वर्षातील पहिले अजिंक्मयपद मिळविले.

    🔹आशिया चषक हॉकीत भारत तिसऱयांदा अजिंक्य

    भारताने दहा वर्षांच्या खंडानंतर आशिया चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद मिळविताना रविवारी झालेल्या अंतिम लढतीत मलेशियावर 2-1 अशा गोलफरकाने मात केली. भारताने तिसऱयांदा या चषकावर नाव कोरले असून यापूर्वी 2003 व 2007 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळविले हेते.

    पाकिस्तानने दक्षिण कोरियाचा 6-3 असा धुव्वा उडवित तिसरे स्थान पटकावले.
    सुपर फोर फेरीमध्ये भारताने मलेशियावर 6-2 अशी एकतर्फी मात केली होती. पण अंतिम सामन्यात मलेशियाने सुधारित कामगिरी करीत भारताला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. एका गोलाची आघाडी टिकवून ठेवण्यासाठी शेवटच्या काही मिनिटांत भारताला बराच संघर्ष करावा लागला. भारतातर्फे रमणदीप सिंगने तिसऱया व ललित उपाध्यायने 29 व्या मिनिटाला गोल नोंदवले तर मलेशियाचा एकमेव गोल 50 व्या मिनिटाला शाहरिल साबाहने नोंदवला. आकाशदीप सिंगला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला.

    मलेशियाला मात्र फक्त एकदाच भारतीय क्षेत्रात मुसंडी मारता आली होती. भारताने यापूर्वी 2011 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. पण त्यावेळी कोरियाकडून पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

    ▪️अंतिम क्रमवारी

    विजेता - भारत
    उपविजेता - मलेशिया
    तिसरे स्थान - पाकिस्तान
    चौथे स्थान - द.कोरिया
    पाचवे स्थान - जपान
    सहावे स्थान - बांगलादेश
    सातवे स्थान - चीन
    आठवे स्थान - ओमान.

    🔹‘पाइक विद्रोह’ हे पहिलं स्वातंत्र्ययुद्ध

    ओडिशामध्ये सन १८१७मध्ये घडलेल्या ‘पाइक विद्रोहा’ची नोंद इतिहासाच्या पुस्तकांत पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून केली जाईल आणि हे बदल पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलात येतील, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जाहीर केले .

    पाइक विद्रोहाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जावडेकर यांनी ही घोषणा केली. यानिमित्त केंद्राने २०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही जावडेकर म्हणाले. सध्या सन १८५७मध्ये ब्रिटिश लष्करातील भारतीय सैनिकांनी पुकारलेला लढा हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला लढा मानला जातो. पण त्यापूर्वी ४० वर्षे हा लढा उभारण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी खराखुरा इतिहास शिकावा या दृष्टिकोनातून ब्रिटिशांविरुद्धचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध, अशी पाइक विद्रोहाची नोंद इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत केली जाईल, असे जावडेकर म्हणाले.

    ओडिशामधील राजे गजपती यांच्या पदरी पाइक जमातीमधील लोकांचे दल असे. हे नागरिक राजाला गरज असेल तेव्हा युद्धभूमीवर जाऊन लढाई करत, तर शांततेच्या काळात शेती करत. पाइकांनी सन १८१७मध्ये जगबंधू विद्याधर यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात लढा पुकारला होता. संपूर्ण ओडिशामध्ये या लढ्याचे लोण पसरले होते. हा संघर्ष सन १८२५पर्यंत चालला. मात्र, ब्रिटिशांनी तो चिरडून टाकला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी यापूर्वी यासंर्भात केंद्राला पत्र लिहून पाइक विद्रोहाला पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाचे स्थान मिळावे, अशी विनंती केली होती.

    🔹७५ टक्के कीटक नष्ट: कारण अद्याप अस्पष्ट

    अलीकडच्या काळात युरोप आणि अमेरिकेत फुलपाखरू आणि भुंग्यांची संख्या कमी होत असल्याचे संकेत वैज्ञानिकांना मिळत होते. मात्र आता हाती आलेल्या पक्क्या पुराव्यांतून दिसणारे वास्तव अधिक भयावह असल्याचे कीटक शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. संरक्षित क्षेत्रातील कीटकांची संख्या देखील तब्बल ७५ टक्क्यांनी घटली असून त्याची कारणे अंधारातच आहेत.

    जर्मनीतील क्रेफिल्ड येथील कीटक शास्त्रज्ञांच्या चमुने जर्मनीतील ६३ विविध संरक्षित प्रदेशातील कीटकांची गेल्या २७ वर्षांची आकडेवारी जमा केली. या चमुचे नेतृत्व मार्टिन सोर्ग आणि हेन्झ श्वॉन यांनी केले. ही माहिती जमा करण्यासाठी उडणाऱ्या कीटकांना खास जाळ्यात अडकवून त्यांचे वजन करून त्यांची नंतर तुलना करण्यात आली. त्यातून कीटकांच्या संख्येत तब्बल ७६ टक्के घट झाल्याचे आढळून आले.

    उन्हाळ्यात नेहमी कीटकांची संख्या वाढते. तथापि या काळातही सर्वाधिक म्हणजे ८२ टक्के घट झाल्याचे दिसले. या माहितीचे विश्लेषण करणाऱ्या रेडबाउड विद्यापीठाचे कास्पर हॉलमन यांनी सांगितले की हे कीटक संरक्षित आणि उत्तमरित्या जतन केल्या गेलेल्या नैसर्गिक प्रदेशातील आहेत. तरीही हे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात घटले आहे, ही धक्कादायक बाब आहे. यातील आव्हानात्मक तसेच चिंताजनक बाब म्हणजे ही संख्या इतकी घटलीच कशी याबाबतीत कोणतेही स्पष्टीकरण सापडत नाही. हवामानातील बदल, जमीनरचनेतील बदल आणि वृक्ष आणि झुडपांच्या जातीत झालेले बदल याचा संदर्भ लावला तरी त्याचे उत्तर हाती येत नाही. ऋतुंच्या दरम्यान होणारे हवामानातील बदल आणि वर्षांच्या दरम्यान नैसर्गिकरित्या होणारे बदल यामुळे त्यात थोडा फरक पडू शकतो. तथापि, सातत्याने आणि वेगात खाली येत चाललेला हा कल कोणत्याही मार्गाने स्पष्ट होत नाही. १९८९ सालापासून जर्मनीतील ६३ निसर्ग उद्यानातील कीटकांची संख्या ७५ टक्क्यांनी खाली आली आहे. ही संख्या घटत असल्याचा अंदाज असला तरी ती इतक्या मोठ्या प्रमाणात खाली येत असल्याची माहिती पहिल्यांदाच स्पष्ट होत आहे.

    संपूर्ण निसर्गचक्र अन्नासाठी या कीटकांवर अवलंबून असते, कारण ते घडवून आणत असलेल्या परागणाच्या प्रक्रियेमुळेच सगळ्यांना अन्नप्राप्ती होते. कीटक संपणे म्हणजेच ही अन्नसाखळी धोक्यात येणे आहे. त्यामुळे कीटकांचा असाच विनाश होत राहिला तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही. त्याहून गंभीर बाब म्हणजे नेमके कारण उलगडत नाही. कारण नाही कळले तर त्यावर उपाययोजनाही करणे कठीण असते.

    🔹इंटरनेट होणार सुपरफास्ट

    मंद इंटरनेट किंवा गर्दीच्या वेळात इंटरनेटचा वेग मंदावणे या बाबी इंटरनेट युजर्ससाठी डोकेदुखी ठरतात. मात्र इंटरनेटच्या वेगाशी संबंधित या समस्या येत्या काळात कालबाह्य होण्याची शक्यता आहे. सातत्याने वेगवान ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवण्याची क्षमता असलेले नवीन हार्डवेअर शास्त्रज्ञांनी विकसित केले असून दहा हजार मेगाबिट्स प्रतिसेकंद (एमबीपीएस) या पेक्षाही अधिक वेगाने आणि तरीही अल्प खर्चात इंटरनेट सेवा पुरवण्याची क्षमता या नवीन तंत्रज्ञानात आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

    ‘अल्ट्राहाय डेफिनिशन व्हिडीओ, ऑनलाइन गेम आदी अॅप्लिकेशन्ससाठी २०२५पर्यंत सध्याच्या शंभर पट अधिक वेगवान इंटरनेटची आवश्यकता भासणार आहे. भविष्यात मोबाइलची संख्या आणि अन्य स्मार्ट उपकरणांसाठी ५जी इंटरनेट सेवा यामुळे बँडविड्थला मर्यादा पडणार आहेत. मात्र या नवीन ऑप्टिकल रिसीव्हर तंत्रज्ञानाने या आव्हानांवर मात करता येईल,’ असा विश्वास या संशोधन पथकाचे प्रमुख आणि इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे सीझर एरकिलिंक यांनी व्यक्त केला. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या पथकामध्ये इंग्लंडमधील केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतील संशोधकांचाही समावेश आहे.

    इंटरनेट युजर्सना त्यांच्या सेवा पुरवठादाराशी जोडणाऱ्या ऑप्टिकल अॅक्सेस नेटवर्कमध्ये वापरासाठी सुलभ रिसीव्हरची निर्मिती या संशोधकांनी केली आहे. ऑप्टिकल फायबर लिंकच्या क्षमतेचा पूर्णपणे वापर करण्यासाठी वेगवेगळ्या तरंगलहरी, रंग आणि प्रकाश या माध्यमातून माहितीचे प्रसारण केले जाते. एकाहून अधिक युजर्समध्ये बँडविड्थ विभागली जाऊ नये, म्हणून एका युजरसाठी निर्धारित तरंगलहर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या पॉलिना बेवेल यांनी सांगितले.

    स्वस्त, लहान रिसीव्हर
    सद्यस्थितीतही अत्यंत संवेदनशील हार्डवेअरचा वापर करून हे शक्य आहे, मात्र त्याची किंमत प्रचंड असल्याने दोन देश किंवा शहरांना जोडणाऱ्या नेटवर्कमध्येच त्यांचा वापर शक्य होता. नवीन सुलभ रिसीव्हरमध्ये या जुन्या रिसीव्हरच्या सर्व क्षमता एकवटल्या असल्या, तरी ते स्वस्त, सोपे आणि लहान आहेत. त्यासाठी फायबर अॅक्सेस नेटवर्कमध्ये विशिष्ट कोडिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वायरलेस संपर्कामध्ये सिग्नल विरणे टाळण्यासाठी त्यांचा वापर केला जात असे.

    🔹‘आयओटी’ची ‘रिइन्व्हेन्ट’ परिषद मुंबईत

    इंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात आयओटी ही काळाची गरज आहे. आयटी उद्योगातील पारंपरिक रोजगारांना ओहोटी लागलेली असतानाच आयओटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. या क्षेत्राचा परिचय करून देण्यासाठी १६ व १७ नोव्हेंबर या दोन दिवसांत येथे ‘रिइन्व्हेन्ट’ परिषद होणार आहे. याचे आयोजन व्यवसाय, सेवा, उत्पादनांसाठी सल्ला देणाऱ्या अमेरिकेतील आघाडीची मानांकन संस्था असलेल्या रोचेस्टोन संस्थेने केले आहे.

    नवसंशोधन व नव उद्योजकांचा देश म्हणून जगाचे लक्ष भारताकडे वेधून घेतले जात असताना, ‘रिइन्व्हेन्ट’मध्ये आयओटी आणि नवसंशोधन क्षेत्रातील नवनवीन घडामोडी सादर केल्या जाणार आहेत. या दोन दिवसीय जागतिक परिषदेची नोंदणी सुरु झाली असून यात क्षेत्रनिहाय प्रदर्शने, ‘आर्टिफिशियल एक्सपिरियन्स झोन’सह प्रदर्शन व चर्चासत्र, प्रमाणपत्रांसह कार्यशाळा, ‘आयओटी फोरम’ आणि ‘राऊंडटेबल’ यासह अनेक गोष्टी असणार असून जागतिक पातळीवरील विविध उद्योगातील तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत.

    परिषदेत अडोब सिस्टीम्सचे उपाध्यक्ष गोविंद बालकृष्णन, न्यू स्कूल अमेरिकाचे सीआयओ आनंद पद्मनाभन, ग्लासगो विद्यापीठातील कार्डिओव्हॅस्क्युलर जिनोमिक्स आणि थेराप्युटिक्स डॉ. संतोष पद्मनाभन, एअरोस्पेस आणि एव्हिएशन सेक्टर स्किल कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. पीटर इमॅन्युएल, ओरॅकल कन्सल्टिंगचे मोहन नटराजन आदी मार्गदर्शन करतील.

    या परिषदेत आयओटीचे परिणाम आणि हवाई वाहतूक क्षेत्र, स्मार्ट सिटी, कृषी, ऑटोमेशन, व्यवसायातील कार्यक्षमता, शिक्षण आणि शिकणे, बँकिंग व वित्तीय क्षेत्र, नियमन आणि गव्हर्नन्स, उत्पादनांचे नवसंशोधन, मोबिलिटी आणि टेलिकॉम यासारख्या क्षेत्रांमध्ये झालेल्या नवसंशोधनांवर चर्चा केली जाणार आहे.

    No comments:

    Post a Comment