Current Affairs, Gk, Job Alerts, , School Info, Competitive exams ; History , Geography , Maths, History of the day, Biography, PDF, E-book ,

Youtube Channel

  • Videos click here
  • Breaking

    Sports

    Translate

    Views

    नामदार गोपाळ कृष्ण गोखले



    ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अद्वितीय संकल्पना भारतात मांडणारे; सार्वजनिक जीवनात स्वत: ही संकल्पना आचरणात आणणारे एक ‘आदर्श भारतसेवक’! 


                         ’झाले बहु होतील बहु; परंतु या सम हा’ ही उक्ती ज्यांच्या बाबतीत सार्थ ठरते असे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सुरुवातीच्या काळातील मवाळ, सनदशीर नेते व आदर्श भारतसेवक म्हणजे नामदार गोपाळ कृष्ण गोखले होत. 



                        रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक या खेड्यात जन्मलेल्या गोखले यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही

    येथेच झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे वडीलबंधू गोविंदराव यांनी स्वत:चे शिक्षण सोडून आणि त्यांच्या वहिनींनी स्वत:चे दागिने विकून केलेल्या त्यागामुळे त्यांचे उच्च शिक्षण कोल्हापूरचे राजाराम कॉलेज व मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज येथे होऊ शकले.



                         १८८४ मध्ये बी.ए. (गणित) पदवी घेऊन जानेवारी, १८८५ मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व, फर्ग्युसन कॉलेजमध्ये अध्यापन, १८९५ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्ती असा प्रवास सुरू असतानाच भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला. सार्वजनिक सभेचे सचिव म्हणूनही त्यांनी काही काळ कार्य केले. शेतकर्‍यांचे कर्ज, दुष्काळ व सावकारांचा त्रास आदी विषयांचा सखोल अभ्यास करून सरकारकडे निवेदने पाठवणे, त्याबाबत पाठपुरावा करणे-अशामहाराष्ट्रातील शेतकर्‍यांविषयक करण्यात येणार्‍या कार्यात त्यांनी शिस्त निर्माण केली. त्यामुळे त्यांच्या निवेदनांना सर्वत्र मान्यता मिळाली.



                        १८८९ मध्ये कॉंग्रेसच्या व्यासपीठावर केलेल्या पहिल्या भाषणापासून त्यांचा कॉंग्रेसशी संबंध प्रस्थापित झाला. आयुष्याच्या अखेरीपर्यंत ते कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले. कॉंग्रेसचे ते राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून गणले जात. डिसेंबर, १९०५ मध्ये बनारस येथे भरलेल्या कॉंग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी कॉंग्रेसचे कार्य भारतात व इंग्लंडमध्येही केले. भारताच्या सेवेसाठी तरुण त्यागी, निष्ठावान कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशाने १३ जून, १९०५ रोजी त्यांनी भारत सेवक समाजाची (The Servants of India Society) स्थापना केली. मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे सभासदत्व, सन १९०२पासून मध्ये केंद्रीय कायदेमंडळाचे सभासदत्व अशी अनेक मानाची पदे त्यांनी भूषविली. ते प्रदीर्घ काळ केंद्रीय कायदे मंडळाचे सभासद होते. सभागृहात अर्थसंकल्पावरील भाषणे गाजविणे हा तर त्यांचा हातखंडा होता.ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते.



                      त्या काळी भारतातील ब्रिटिश राज्याच्या वाढत्या खर्चाची चौकशी करण्यासाठी लॉर्ड वेल्बी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या आयोगासमोर गोखले यांची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली होती. या बुद्धिमत्तेच्या व गाढ व्यासंगाच्या आधारे दिलेल्या साक्षीमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध झाले.



                     न्यायमूर्ती रानडे यांच्या आर्थिक व राजकीय विचारांचा गोखले यांच्यावर विशेष प्रभाव होता. ते न्यायमूर्ती रानडे यांना आपल्या गुरुस्थानी मानत; तर गोखले यांच्या अंगी असलेल्या शुचिता, नैतिकता, तत्त्वनिष्ठता, सौजन्यशीलता व नि:स्वार्थी सेवावृत्ती आदी गुणांनी प्रभावित होऊन महात्मा गांधीजी त्यांना (गोखले यांना)  गुरुस्थानी मानत असत. गांधीजी त्यांना ‘महात्मा गोखले, धर्मात्मा गोखले’ म्हणत.



                    भारतात सर्वप्रथम कायद्याचे राज्य, शांतता, सुव्यवस्थेचे प्रस्थापन, आधुनिक विचारांचे केलेले बीजारोपण, देशात केलेल्या अनेक सुधारणा यांमुळे इंग्रजी सत्तेविषयी त्यांचे धोरण मवाळ होते. कोणतीही चळवळ कायद्याच्या चौकटीतून करणे, स्वदेशीच्या वापरातून आपल्या देशातील उत्पादनास चालना देऊन आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे असे त्यांचे विचार असत. गोपाळ गणेश आगरकरांनी सुरू केलेल्या ’सुधारक’ च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले यांनी काही काळ सांभाळली. सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार या वृत्तपत्रांतूनही त्यांनी लेखन केले.  वृत्तपत्रातील लिखाणाद्वारे ते समाजसुधारणांचा सतत पाठपुरावा करत.



                          ‘राजकारणाचे आध्यात्मिकरण’ ही अतिशय वेगळी (परंतु कोणत्याही स्तरावरील, क्षेत्रातील राजकारणात सर्वकाळ अत्यावश्यक असणारी) संकल्पना त्यांनी भारतात मांडली. राजकारण हे साधन शुचितेला महत्त्व देऊन, सेवाभावाने करायचे विशेष कार्य आहे , असे त्यांचे ठाम मत होते. चारित्र्य, नैतिकता, नि:स्वार्थी वृत्ती या सद्गुणांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, स्वत:चे आदर्श उदाहरणही तत्कालीन नेत्यांसमोर व जनतेसमोर ठेवले.



                   संपूर्ण आयुष्य राजकारणात राहूनही ’राजकारण’ न करता विशुद्ध सार्वजनिक जीवन जगणार्‍या या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी निधन झाले.